Patna Station Hotel Fire: बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्टेशनजवळील पाल हॉटेलमध्ये आज (गुरुवारी) भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. सर्वजण राज्याबाहेरचे असल्याचे सांगितले जात आहे. डझनहून अधिक लोकांना जखमी अवस्थेत पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अनेकजण 80 ते 90 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीत उपचार सुरु आहेत.
मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. मृत आणि जखमींच्या संख्येबाबत अधिकृत वक्तव्येही समोर आली आहेत. पाटणा शहर एसपी सेंट्रल यांनी सांगितले की, या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जळालेल्या आणि जखमी अवस्थेत 18 जणांना पीएमसीएचमध्ये नेण्यात आले, त्यापैकी 12 जणांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये मोठ्याप्रमाणात लोक उपस्थित होते. डीजी फायर शोभा अहोटकर यांनी सांगितले की, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरु केले. अग्निशमन दलाच्या 51 बंबांच्या मदतीने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. हॉटेल (Hotel) आणि आजूबाजूच्या इमारतींमधून 45 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी अग्निशमन दल अजूनही जळालेल्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, रात्री 11 वाजता ही आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. गॅस सिलिंडरमुळे लागलेली आग वेगाने पसरली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी (Employees) अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. काही वेळातच आग संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली आणि आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली.
अग्निशमन दल दोन तुकड्यांसह प्रथम पोहोचले. आग भीषण असल्याने जवळच्या अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक कंकरबाग, लोदीपूर अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एकूण 51 फायर इंजिनच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ओव्हर ब्रिजच्या वर आणि खाली जाम होता. आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली. पाल हॉटेलशिवाय पंजाबी नवाबी आणि बलवीर सायकल स्टोअरलाही आग लागली. राज्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 30 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.