IMD Alert: कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात पारा 40 अंशांच्या पुढे; हवामान विभागाने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा

IMD Alert: गुजरातच्या भुजमध्ये 41.6, राजकोटमध्ये 41.1, अकोल्यात 41.5 आणि वाशीममध्ये 41.4 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला आहे.
IMD Alert
IMD AlertDainik Gomantak

IMD Alert: कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्यामुळे पुढील दोन दिवसांत भारतीय हवामान विभागाने (IMD) या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गुजरातच्या भुजमध्ये 41.6, राजकोटमध्ये 41.1, अकोल्यात 41.5 आणि वाशीममध्ये 41.4 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी या भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त होते, परंतु अद्याप उष्णतेची लाट निर्माण झालेली नाही. जेव्हा एखाद्या केंद्राचे कमाल तापमान मैदानी भागात किमान 40 अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात 37 अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते तेव्हा उष्णतेची लाट येते.

IMD ने म्हटले आहे की, 27-29 मार्च दरम्यान कर्नाटकातील काही भागांमध्ये, 27-28 मार्च रोजी गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ आणि 27 मार्च रोजी नैऋत्य राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 27-29 मार्च दरम्यान गुजरात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये रात्री उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. 27-28 मार्च रोजी कोकण, गोवा त्याचबरोबर 27-31 मार्च दरम्यान रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहेमध्ये उष्ण आणि दमट हवामान अपेक्षित आहे.

31 मार्चपर्यंत हिमाचलमध्ये हवामानात बदल होईल

दरम्यान, हिमाचल प्रदेशात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. शिमला येथील हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, 31 मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात खराब हवामानाची शक्यता आहे. राजधानी शिमलामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील. हवामानतज्ज्ञ संदीप शर्मा यांनी सांगितले की, काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे, तर मध्यम आणि उंच पर्वतीय ठिकाणी पाऊस आणि हिमवर्षाव अपेक्षित आहे. सखल आणि सपाट भागातही पावसाची शक्यता आहे. या काळात मुसळधार पाऊस आणि गारपिटीबाबत अनेक ठिकाणी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शिवाय, तापमानात काही प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील उना जिल्ह्यात सर्वाधिक 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

काश्मीर खोऱ्यात चार दिवस पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता

दुसरीकडे, पुढील चार दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळपासून गुरुवारपर्यंत वातावरण सामान्यतः कोरडे राहील, असे येथील हवामान केंद्राने सांगितले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हलका पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. 29 मार्च ते 30 मार्चच्या संध्याकाळी किंवा रात्री बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. 31 मार्च रोजी काही ठिकाणी हलका पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत हवामान कोरडे राहील. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी उन्हाळ्याची धग चांगलीच जाणवू लागली आहे. मे पर्यंत अल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

एल निनोचा भारतातील मान्सूनवर कसा परिणाम होतो?

दरम्यान, पॅसिफिक महासागरातील पेरुजवळील समुद्रकिनाऱ्याच्या तापमानवाढीच्या घटनेला 'एल निनो' म्हणतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, समुद्राच्या तापमानात आणि वातावरणातील बदल घडवून आणणाऱ्या सागरी घटनेला 'एल निनो' असे नाव देण्यात आले आहे. या बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा 4-5 अंश जास्त होते. जागतिक स्तरावर, एल निनोदरम्यान, दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आफ्रिका यांसारख्या ठिकाणी कोरडे हवामान राहते. तर भारतात एल निनोच्या काळात मान्सून कमकुवत होत असल्याचे आढळून आले आहे. एल निनो हवामानाच्या घटना गेल्या 70 वर्षांत 15 वेळा घडल्या आहेत, ज्यापैकी भारतात फक्त सहा वेळा सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गेल्या चार एल निनो वर्षांमध्ये, भारताला सतत दुष्काळी परिस्थिती आणि पावसाची तीव्र कमतरता यांचा सामना करावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com