शिरगावच्या जत्रेत प्रगटलेली क्रांतिज्योत

आज एकविसाव्या शतकात स्त्रिया अजूनही जुन्या रूढी परंपरेत गुरफटून राहतात ते पाहिल्यावर स्वातंत्र्यापूर्वीच्या स्त्रिया जास्त निडर होत्या असं वाटतं.
Shrigao Fair
Shrigao FairDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

आज शिरगावाची जत्रा. लाखो भाविक धगधगत्या होमखंडात अग्निदिव्य करतात. अतिशय भक्तिपूर्वक व्रतस्थ रहातात. याच व्रताचा परिणाम म्हणून तप्त अशा निखाऱ्यावरून चालण्याची शक्ती त्यांना मिळत असावी. २८ एप्रिल १९५५ साली अशीच देवी लईराईची जत्रा भरली होती

हजारो भाविक अग्निदिव्य करण्यासाठी जमले होते. अशावेळी अचानक तिथे एक अग्निप्रभा प्रगटली. जणू देवी लईराईच वेगळ्या रूपात प्रगटली. धोंडांच्या हातात असलेल्या बेत कातज्ञऐवजी या तेजस्वी स्त्रीच्या हातात तिरंगी झेंडा होता. हजारो भक्तांसमोर निर्भिडपणे भारताचा तिरंगा फडकवत ही वीरबाला भारत माता की जय, जय हिंद अशा घोषणा देत समोर आली. क्षणार्धासाठी सगळीकडे शांतता पसरली.

हे नेमकं काय होत आहे ते तिथल्या भाविकांना समजायला थोडा अवधी गेला. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी ही तेजस्वी स्त्री जीवावर खेळून तिरंगा घेऊन उभी होती. तिथे असलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी अर्थातच तिला लागलीच अटक केली.

ही तेजस्वी स्त्री म्हणजेच आशाताई फडके होय. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या शेजारच्या महाराष्ट्रातून आलेल्या आशाताई. खरं म्हणजे याही गोवेकर. आपल्या भगिनी सुधाताई जोशी यांच्या प्रेरणेने बुलढाण्याहून आल्या होत्या. त्यांचे बंधुराजही या स्वातंत्र्य सत्याग्रहात सामील होते. आशाताईना अटक करून आग्वाद तुरुंगात नेण्यात आले.

Shrigao Fair
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

तिथे त्यांच्या भगिनी सुधाताई अटकेत होत्या. अाशाताईना या रूपात बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अभिमानाने त्यांचा उर भरून आला. स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावून उतरणाऱ्या कित्येक कुटुंबापैकी एक म्हणजे सुधाताई यांचे कुटुंब. १९४६ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांना अटक झाल्यानंतर धिटाईने पुढे होऊन भाषण सुरू ठेवणाऱ्या वत्सला किर्तनी, सुधाताई जोशी, सिंधू देशपांडे, आशा फडके यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोवा काँग्रेस आणि आझाद गोमंतक दल अशा संस्थांबरोबर कित्येक स्त्रियांनी काम केले. सुधाताई आणि आशाताई यांचे तुरुंगात खूप हाल झाले.

पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या सगळ्याबद्दल आपण फक्त कल्पनाच करू शकतो. परंतु कसा सहन केला असेल या स्त्रियांनी हा अत्याचार? कुठल्या प्रेरणेने अगदी गृहिणी असलेल्या या स्त्रिया पुढे आल्या होत्या? त्यावेळी स्त्रियांवर कित्येक बंधने होती. प्रचलित रूढी होत्या. या सगळ्यांचाच भेद करून या स्त्रिया एका अर्थी लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर पडल्या होत्या.आपला संसार, मुलेबाळे यांना मागे टाकून जणू तुळशीपत्र ठेवून या स्त्रियांनी सत्याग्रहात भाग घेतला.

आज एकविसाव्या शतकात स्त्रिया अजूनही जुन्या रूढी परंपरेत गुरफटून राहतात ते पाहिल्यावर स्वातंत्र्यापूर्वीच्या स्त्रिया जास्त निडर होत्या असं वाटतं. या स्त्रियांना शिक्षणही जेमतेम असायचे. घराबाहेर पडायची संधी कमीच. तरीही एका ध्येयासाठी त्या घराबाहेर पडल्या. आज एखाद्या चांगल्या समाजकार्यासाठी बोलावले तरी स्त्रिया अनेक कारणे देऊन येत नाहीत. हे का करायचे असा प्रश्न विचारतात.त्यावेळी वाईट वाटते.

आज किंवा दरवर्षी देवी लईराईच्या प्रांगणात होमखंड पाहताना, भारताचा तिरंगा फडकल्याचा भास मला होत राहील. या ज्ञात अज्ञात विरंगनांना शत शत नमन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com