Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Chhatrapati Shahu Maharaj : शाहू महाराजांनी ह्या कृषिप्रधान देशातील शेतीचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी राधानगरी येथे धरण बांधले व पाटबंधाऱ्याची व्यवस्था केली.
Shahu Maharaj
Shahu Maharaj Dainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासात ह्या देशात जे राजे होऊन गेले त्यांचा लघुत्तम सामाईक विभाज्य ( लसावि) काढल्यास त्याचे रुप विलासी, उधळे, ऐदी, व्यसनी, अंधश्रद्ध, लोकपराङमुख असे आहे. ह्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज हे आपल्या कर्तृत्वाने उजळून जातात.

भारतीय इतिहासात सम्राट अशोक, बादशहा अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी अहिल्याबाई होळकर, बडोद्याचे संभाजीराव गायकवाड, म्हैसूरचे कृष्णराज वोडियार आणि कोल्हापूरचे शाहू महाराज हे मोजकेच राजे आपल्याला आढळतात. पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. शाहू महाराज हे Post dated राजे होते. ते काळाच्या आधी जन्मलेले होते. शाहू महाराज दूरदर्शी व भविष्यदर्शी राजे होते.

प्रजेच्या शिक्षणासाठी दक्ष असलेला हे भारतीय इतिहासातील पहिले राजे होते. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीचे व मोफत शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळा काढल्या. ग्रामीण भागांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृहे बांधली. त्यात मोफत जेवणाची व्यवस्था होती.

कोल्हापूर राज्याचा शिक्षणावरचा खर्च महसूलाच्या ६ % होता. आज अर्थशास्त्रज्ञ राष्ट्रीय उत्पन्नाचा ६ % वाटा शिक्षणावर खर्च करावा असे सांगतात. भारतात हे प्रमाण २ % पेक्षाही कमी आहे. ह्या गोष्टीवरून शाहू महाराजांचे महात्म्य लक्षात यावे. शिक्षणापाठोपाठ सार्वजनिक आरोग्याकडे शाहू महाराजांनी लक्ष पुरवले. संस्थानात रस्त्याचे जाळे उभारले. कोल्हापूर - मिरज रेल्वे सुरू केली.

शाहू महाराजांनी ह्या कृषिप्रधान देशातील शेतीचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी राधानगरी येथे धरण बांधले व पाटबंधाऱ्याची व्यवस्था केली. धरणातील पाण्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. शेतकऱ्यांनी शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा ह्यासाठी महाराजांनी आवर्जून प्रयत्न केला.

शाहू महाराजांनी सहकारी चळवळीची गरज ओळखून संस्थानात सरकारी बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. संस्थानात त्यांनी कापड गिरण्या, गुळांची गुऱ्हाळे सुरू करण्यास चालना दिली.

उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना शाहू महाराजांनी सर्वतोपरी मदत केली. कामगार चळवळीमागे शाहू महाराज ठामपणे उभे राहिले. त्यांनी वतनदारी पद्धत बंद केली. वेठबिगारी संपुष्टात आणली. कुलकर्णी पद रद्द केले व गरीब रयतेची ह्या अन्यायी व्यवस्थेतून सुटका केली. राज्यातील उधळपट्टीला व भ्रष्टाचाराला त्यांनी आळा घातला.

शाहू महाराज पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकी होते. त्यांचा फलज्योतिषावर विश्वास नव्हता. समुद्र पर्यटनानंतर प्रायश्चित घ्यायला त्यांनी नकार दिला. छत्रपती शाहू महाराज हे हिंदू - मुस्लीम ऐक्याचे समर्थक होते. शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी अथक प्रयत्न केले. दलितांबरोबर त्यांनी स्वतः सहभोजन केले. गावागावातील विहिरी दलितांना खुल्या केल्या. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य दिले.

शाहू महाराजांच्या आर्थिक पाठिंब्यामुळेच बाळासाहेब ''मूक नायक'' हे पाक्षिक काढू शकले. तत्कालीन पुरोगामी विचारवंत प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या कार्याला शाहू महाराजांनी सक्रिय पाठिंबा दिला. सत्यशोधक समाज, आर्य समाज, थिओसोफिकल सोसायटी ह्यांचे ते आश्रयदाते होते.

शाहू महाराजांचे अतुलनीय कर्तृत्व म्हणजे त्यांनी शिक्षणात व रोजगारीत दलितांना व मागासवर्गीयांना ५० % आरक्षण दिले. लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांच्या पुरोगामी उपक्रमावर केसरीतून सातत्याने टीका केली. टिळकांची कर्मठ व सनातनी भूमिका शाहू महाराजांना फारच त्रासदायक ठरली.

असे असले तरी शाहू महाराज व लोकमान्य टिळक ह्यांना उभयतांविषयी आदर होता. वैचारिक मतभेदाची छाया त्यांनी वैयक्तिक मित्रत्वाच्या नात्यावर पडू दिली नाही.

शाहू महाराजांचे एकमेव वैगुण्य म्हणजे त्यांना स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला नाही. ते नेहमीच ब्रिटीशाना एकनिष्ठ राहिले. ब्रिटीश राणीला व युवराजाला मुजरा करताना त्यांचा आत्मसन्मान दुखावला नाही. अर्थात यामागे एक वैचारिक भूमिका होती. ब्रिटीश राज्य गेले तर सत्ता ब्राह्मणांच्या हाती पडेल, त्यापेक्षा ब्रिटीश परवडले. आधी सामाजिक सुधारणा व मग राजकीय स्वातंत्र्य ही विचारधारा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासली. पण अरविंद घोष, लोकमान्य टिळक ह्यांच्या स्वातंत्र्य चळवळीला शाहू महाराजांनी गुप्तपणे आर्थिक मदत केली.

शाहू महाराज हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. क्रियावीण वाचाळता व्यर्थ आहे हे त्यांना माहीत होते. छत्रपती शाहू महाराजांनी साहित्य, संगीत, नाटक व कुस्ती ह्या कलांना नेहमी प्रोत्साहन दिले. बालगंधर्व, केशवराव भोसले, अंजनीबाई, मोगुबाई ह्यांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली. ह्यामुळे कोल्हापूर ही कलानगरी बनली.

छत्रपती शाहू महाराजांना ४२ वर्षांचे अल्पायुष्य लाभले. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, बालकवी, श्रीनिवास रामानुजन, युसूफ मेहर अली, गोपाळकृष्ण गोखले, स्वामी विवेकानंद ह्या सर्व कर्तृत्ववान लोकांना अल्पायुष्याचा शाप का असावा हे गूढच आहे! कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज हे जातपात, धर्म, प्रादेशिकता ह्यांच्या पलीकडे जाणारे अनन्य साधारण असे राजे होते. पुण्यश्लोक शाहू महाराजांचे पुण्यस्मरण करुया.

(शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती समारंभात केलेल्या भाषणावर आधारित लेख)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com