Noise Pollution : व्यवस्थेचे बहिरेपण

Noise Pollution : केवळ कानच नव्हे तर संवेदनाच बधिर करून टाकणारा हा कोलाहल अव्याहत सुरूच राहिला.
Noise Pollution
Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ . मनोज सुमती बोरकर

आवाज नियंत्रित ठेवणे किती आवश्यक आहे, याची जाण व जाणीव लोकनियुक्त प्रतिनिधींना आली तरच कुठे तरी किनारपट्टी भागांतील लोक व लुप्तप्राय होणारे संरक्षित प्राणी सतत होणार्‍या आवाजाच्या भीषणतेपासून वाचतील!

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नववर्षाच्या पार्ट्या, किनारी भागातील लोकांच्या कानांचे पडदे फाटेपर्यंत कर्णकर्कश्श किंकाळत राहिल्या. केवळ कानच नव्हे तर संवेदनाच बधिर करून टाकणारा हा कोलाहल अव्याहत सुरूच राहिला.

कधी गल्ल्या ओसंडून वाहणारी गर्दी, तर कधी अरुंद रस्ते आणखीनच अरुंद करणारे बेशिस्त पार्किंग. कुठे न धांबणारा वाहनांचा धूर, तर कुठे कान ठणकवणारे हॉर्न. व्यापारी, फिरते विक्रेते, ड्रग पॅडलर, मालिशवाले, बार, पब, मदिरेसाठी तहानलेले लोक, संगीतरजनी, लखलखते दिवे, वखवखलेल्या नजरा आणि तशातच बेहोष, बेधुंद होऊन बेफाम नाचणारे लोक. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात साजरे होणारे नववर्ष!

आंग्ल वर्षातील शेवटच्या दिवशी तप्त दिनकराचा लोहगोल अरबी समुद्रात हळूहळू वितळत असताना नवीन वर्षाच्या आशा शीतलतेने पल्लवीत करणारा रजनीचा नाथ, त्या वर्षीच्या शेवटच्या रात्रीची गूढरम्यता संयमाने वाढवत हळूहळू दाखल होतो.

एकाचवेळी विरह आणि आतुरता यांचा संगम करणारी ही शांत क्षणांची ठेव आयुष्यभर मर्मबंधात साठवून ठेवावी, अशीच असते. पण, गेल्या काही वर्षांत कुठल्याही सरत्या वर्षाने व नववर्षाने हे रोमांच अनुभवलेच नाहीत.

त्याऐवजी गोंगाट, कचरा आणि प्रदूषण हेच आमच्या नशिबी आले आहे. उजाडलेल्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पहुडलेल्या रिकाम्या बाटल्या, पाकिटे आणि रस्त्याच्या कडेला नशेत झिंगून पडलेले लोक. रेतीवर उमटलेल्या असभ्यतेच्या खुणा पाहून मन विषण्ण होते.

आनंद साजरा करण्यासाठी आलेले जाताना दु:ख, क्लेश देऊन जातात. किनारपट्टीत वास्तव्यास असणरे लोक या नृत्य आणि संगीताच्या विरोधात उभे ठाकतात, पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करतात, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवाहन करतात आणि कुठेही दाद मिळत नाही, हे लक्षांत येताच न्यायालयाचा दरवाजाही ठोठावतात.

आपल्याच राज्यातील लोकांना याचा अतोनात त्रास भोगावा लागतो, हे माहीत असूनही प्रशासकीय यंत्रणा मात्र या

‘इव्हेन्ट’च्या भलत्याच प्रेमपाशात अडकते. परवाने देण्यासाठी घातलेल्या अटी कागदावरच राहतात. ‘काहीतरी कारवाई केली’, हे दाखवण्यापुरतीच कारवाई केली जाते. कडक नियमांचे पालन ‘अर्थ’पूर्ण रीतीने सौम्य केले जाते. तगडे सुरक्षा-रक्षक, बाउन्सर, जास्त अडथळे असतील तिथे लोक जास्त पैसे देऊन सहभागी होऊ इच्छितात.

ड्रग्ज, मदिरा आणि मदिराक्षी या त्रयीत काहींची इतकी त्रिस्थळी यात्रा होते की, प्रसंगी १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्याची पाळी येते. अमली पदार्थांचा अंमल तरुणांवर इतका प्रभाव टाकतो की, योग्यालाही दुर्लभ असलेली ‘निर्वाण’पदी पोहोचवणारी समाधी त्यांना सहज साध्य होते.

गेल्या काही वर्षांत येथे घडलेल्या अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे घडलेल्या दुर्घटना हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, याची कल्पना आकडेवारीवरून येते. शवागारातून आपल्या मुलांचे पार्थिव देह घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना परदेशातून गोव्यात यावे लागत आहे.

जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचा, लोकप्रिय व्यक्तीचा बळी या अमली पदार्थांपायी जातो, तेव्हा माध्यमे आणि राज्ययंत्रणा लक्ष देतात. अन्यथा असे किती बळी या अमली पदार्थांच्या सेवनातून गेले आहेत, याची गणती करणेही कठीण आहे.

ध्वनिप्रदूषणाचे दृश्य परिणाम सहज दिसत नसल्याने त्याचे गांभीर्य लोकांना व प्रशासकीय यंत्रणेला कळत नाही. पाणी दूषित झाल्यास बदललेल्या रंगावरून किंवा तरंगणाऱ्या पदार्थावरून ओळखता येते. दाटलेल्या धुक्यावरून, धुरकट वातावरणावरून हवा प्रदूषित झाल्याचे सहज लक्षांत येते. शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आपले ओंगळवाणे रूप नजरेस आणून देतो.

त्यामुळे होणारे परिणामही सहज जाणवतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेला आवाज दिसत नाही व त्यामुळे होणारे परिणामही सहज नजरेस येत नाहीत.

वाहतूक, उद्योग, यांत्रिकीकरण, इलेक्ट्रॉनिक संगीत, इतकेच कशाला अगदी आपल्या स्वयंपाकघरातील भांड्यांची आदळआपटही ध्वनिप्रदूषण करू शकते. ध्वनिप्रदूषण सापेक्ष असते. काही कानांसाठी कर्णप्रिय असलेले संगीत, इतरांसाठी ध्वनिप्रदूषण असू शकते. तसेच, आवाजाविषयी असलेली सहन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी होत जाते.

त्यामुळे ज्या आवाजाने आपल्याला त्रास होत नाही, तोच आवाज वृद्धांसाठी प्रचंड त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. आवाजाचे एक वस्तुनिष्ठ परिमाण आहे जे डेसिबलमध्ये मोजले जाते. परंतु त्याचे परिणाम व्यक्तिगणिक वेगळे आहे.

सामान्यत: एखादे संभाषण ६० डेसिबलवर होते, तर रॉक-कॉन्सर्टच्या ध्वनिलहरी ११० डेसिबल पार करून जातात. फटाक्यांची आतषबाजी १४५ डेसिबलची पातळी गाठू शकते!

असह्य आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने आतील कानाच्या कॉक्लीयाला इजा होऊ शकते आणि श्रवणशक्ती कमी होऊ शकते. कायमचा बहिरेपणादेखील नशिबी येऊ शकतो. श्रवणशक्ती कमी होणे हा संगीतकारांना भेडसावणारा व्यावसायिक धोका असल्याचे मत श्रवणतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

वैद्यकीय संशोधकांनी नॉर्वेमधील सक्रिय रॉक संगीतकारांवर केलेल्या अलीकडील अभ्यासात तरुण, प्रौढ रॉक संगीतकारांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण ३८% इतके नोंदवले आहे. ज्या संगीतकारांनी सर्वांत जास्त संगीतरजनीचे कार्यक्रम केले होते त्यांची श्रवणशक्ती कमी झाली होती आणि सुमारे २०% रॉक संगीतकारांच्या कानाच्या आत सतत होणारा अनाहत नाद म्हणजेच ‘क्रॉनिक टिनिटस’ नावाचा आजार होता.

मी शाळेत शिकत असताना शिक्षक वर्गात आले की आम्हांला ’पिन ड्रॉप सायलेन्स’ ठेवायला सांगायचे. आजच्या गोंगाटाच्या वातावरणात पिन सोडाच, पेन पडले तरी आवाज ऐकू जाईल, इतकी शांतता राखणे खरोखरच शक्य आहे का?

खूप वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये वाचलेल्या, ‘हिअरिंग इन टोडास ऑफ साऊथ इंडिया’ या अहवालाने मी थक्क झालो होतो. निलगिरीमध्ये राहणाऱ्या ९० वर्षांच्या टोडा व्यक्तीची श्रवणक्षमता शहरातील तरुणांइतकीच असते, असे त्या अहवालात म्हटले होते! शहरातील गोंगाटाचा आपल्यावर होणारा परिणाम यातून अधोरेखित होतो.

जास्त डेसिबलचा आवाज सतत कानांवर आदळत राहिल्यास उच्च रक्तदाब, कोरोनरी हृदयरोग आणि स्ट्रोक यासारखे हृदयाशी व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात.

निद्रानाश, लक्ष न लागणे आणि एकंदर मानसिक कार्यक्षमता कमी होणे यासह अनेक मानसिक विकारही होऊ शकतात. वय वाढत जाते, तसतसा याचा धोकाही वाढत जातो. एका वर्षापूर्वी चीनमध्ये केलेल्या एका अभ्यासात, गर्भधारणेदरम्यान जास्त डेसिबलच्या आवाजामुळे नवजात अर्भकांमध्ये कमी वजन असणे, वेळेआधी प्रसूती आणि गर्भपात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या वर्षीही कडक निर्बंध घातले होते. परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आवाजाची पातळी गाठली जात आहे का, यावर लक्ष ठेवावे व उल्लंघन होत असल्यास कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही आधीपासून लावून धरली होती.

पण, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. मोरजी आणि मांद्रे येथील ‘टर्टल नेस्टिंग झोन’मध्ये होणारे ध्वनिप्रदूषण व घालून दिलेल्या आवाजाच्या पातळीचे वारंवार होणारे उल्लंघन अजिबात क्षम्य नाही

या भागात परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजाची पातळी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वनविभागाने नोंदवणे व योग्य ती कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

या पर्यावरण-संवेदनशील स्थळांतील कासवांच्या प्रजनन क्षमतेवर प्रमाणाबाहेर आवाजाचा व प्रकाशाच्या तीव्र झोतांचा विपरीत परिणाम होतो. लुप्तप्राय प्रजातिंच्या आधीच कमी होत असलेल्या संख्येत लक्षणीय घट होणे ही निसर्गाची व पर्यावरणाची प्रचंड मोठी हानी आहे.

Noise Pollution
konkani Language In Goa: गोव्याची अधिकृत बोलली जाणारी भाषा: कोकणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com