लढाई लोकसभा निवडणुकीची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रव्यापी चेहरा, संघटन बळ व पैशांची ताकद या जोरावर निवडणूक लढवणारा भाजप ही लोकसभा निवडणूक सहज जिंकेल, असे वातावरण असतानाही, ज्या हिकमतीने कॉंग्रेस आणि छोटे प्रादेशिक पक्ष ही निवडणूक लढताहेत, त्यांच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे. भारतीय राजकारणाची खुबी हीच आहे की, येथे मतदार शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला कसलीही खात्री देत नाहीत. मोठमोठ्यांना धूळ चारतात.
Loksabha Election Goa
Loksabha Election Goa Dainik Gomantak

राजू नायक

काँग्रेस पक्ष गोव्यात मोठ्या हिकमतीने निवडणूक लढवतो आहे. त्यांच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे. वास्तविक निवडणूक जाहीर झाली, तेव्हाच कॉंग्रेस पक्ष चारी मुंड्या चीत झाला, अशी परिस्थिती होती. त्यांचे उमेदवार जाहीर होत नव्हते.

लाथाळ्या सुरू झाल्या होत्या. त्यांचे कार्यकर्ते जाग्यावर नव्हते. समित्या ढेपाळल्या होत्या. बुथ समित्यांचा तर पत्ताच नव्हता. त्यामुळे कॉंग्रेसचे मतदार आहेत; परंतु त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन आपल्याच उमेदवाराच्या नावापुढचे बटण दाबण्यासाठी जे संघटन कौशल्य लागते, त्याचा अभाव होता.

कॉंग्रेसने उमेदवाऱ्या जाहीर करायला एवढा उशीर लावला की आता निवडणूक का लढवता, पराभव स्पष्टपणे कबूल करा, असे राजकीय निरीक्षक म्हणू लागले होते.

दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेस पटकावणार, असे भाकित एका राष्ट्रीय वाहिनीने वर्तविले होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे महिलाच उमेदवार पाहिजे, असा आग्रह धरला. तेव्हा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी हात वर केले होते. आमच्याकडे महिला उमेदवार नाही. तेथे महिला उमेदवार जाहीर झाली तर आम्ही विजयाची खात्री देऊ शकत नाही, असा त्यांचा पवित्रा होता.

परंतु मोदीही इरेला पेटले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंना स्पष्टच सांगितले, ‘तुम्ही दक्षिण गोवा निवडणूक लढवा, राज्यसभेच्या रिकाम्या झालेल्या जागेवर आम्ही महिला उमेदवार पाठवू.’ त्यानंतर मात्र महिला उमेदवाराविषयी नकारार्थी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना तरणोपाय राहिला नाही. शेवटी पक्षाकडून नाव येण्यास विलंब होत असल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी पल्लवी धेंपे यांचे नाव दिल्लीतून जाहीर केले.

पल्लवींना अनपेक्षित घटकांकडून पाठिंबा लाभला. सारस्वत - जे मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर या पक्षाबाबत खूश नव्हते, त्यांच्या पाऊलखुणाही पुसल्या जात असल्याची चर्चा सुरू झाली होती, त्यांनी पल्लवी यांचे स्वागत केले. धेंपे घराण्याबद्दल आपुलकी असणारा एक वर्ग आहे. - फुटबॉलचे वेड असणारा ख्रिस्ती वर्ग आणि बरीचशी उद्योग घराणी यांनी पल्लवींना पाठिंबा दिला. त्यामुळे दक्षिण गोव्यात शून्यापासून सुरवात करावी लागेल - मतदारांना पल्लवींची ओळख करून द्यावी लागेल, नाखूश उमेदवारांच्या पाठीराख्यांना चुचकारावे लागेल, असा जो समज होता - तो दूर झाला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर होईपर्यंत पल्लवींचा प्रचाराचा पहिला टप्पाही पूर्ण झाला होता.

पहिल्या टप्प्यात त्यांनी ठिकठिकाणची मंदिरे, समाज मंदिरांना भेटी दिल्या. भाजपला आता गोमंतकीय मतदारांची मानसिकता समजून आली आहे. गोमंतकीय मतदार हा बाहेरून खूप बुद्धिमान, प्रगतीशील वाटतो; परंतु त्यांची मानसिकता ५० वर्षांपूर्वीच्या गोमंतकीयांसारखीच आहे.

तो देवदेवस्की, व्रतवैकल्ये, सण-उत्सव यात पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने सहभागी होतो. ज्या गतीने गावागावांत मंदिर उभारली जात आहेत आणि काम धंदे सोडून लोक तेथे उत्सवात सहभागी होतात, ते पाहिले तर त्याच्या मानसिकतेचे आश्‍चर्यच वाटते. प्रत्येक गावात देवदेवतांचे उत्सव होतात व नोकरदार वर्ग दर महिना एक दोन दिवस रजा टाकून त्यात सहभागी होत असतो. (उत्सवात जुगार - मद्य यांनाही ऊत आलेला असतो, हे वेगळे सांगायला नको!)

माधव गडकरींनी ७० च्या दशकातील गोव्याच्या याच मानसिकतेबद्दल लिहिले आहे. बांदोडकर आपल्या प्रचार सभांमधून गावात मंदिरे उभारून देण्याचे आश्‍वासन देत असत. गडकरी त्यांना प्रश्‍न विचारीत, मंदिरांऐवजी शाळा काढा. बांदोडकरांनी त्यांचे कधी ऐकले नाही.

व्रतवैकल्ये व देवदेवस्कीचे गारूड समाजमनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, याचा प्रत्यय ख्रिस्ती मिशनरींनाही आला. धर्मांतर झाल्यानंतरही ख्रिस्ती बांधव चोरून हिंदू रितीरिवाज पाळत. त्यामुळे त्यांना इन्क्विझिशनचा प्रयोग करावा लागला. त्यानंतरही हिंदू धर्मातील रूढी-परंपरा त्यांनी सोडल्या नाहीत. त्यामुळे ख्रिस्ती धर्मात न मानल्या जाणाऱ्या अवसर - घाडी यासारख्या प्रथा येथे चालू राहिल्या.

आजही हा बडवाचार चालू राहिला आहे. आपल्या राजकीय व्यवस्थेने या वाईट प्रथेचे संगोपन केले. आपले समाजसुधारक आणि संतांनी अनिष्ट प्रथांचे उच्चाटन व्हावे म्हणून सर्वस्व वेचले. अंधश्रद्धा व असहिष्णुता या दोन्ही पद्धती हातात हात घालून चालत असल्याने समाजात वैज्ञानिक विचार रुजविण्यासाठी अजूनही चळवळी चालवाव्या लागतात, ही खरी शोकांतिकाच आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अशा चळवळी गाडून टाकण्याचा प्रयत्न होतो, या समाजकार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जातात, सनातनी प्रवृत्ती समाजात हात-पाय पसरवतात व अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजेच देव, धर्म व परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा अपप्रचार केला जातो.

माझे महाराष्ट्रीय पत्रकार मित्र मला नेहमी ऐकवत असतात की, शिक्षणाचे प्रमाण गोव्यात सर्वदूर असले तरी येथे मंदिरांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कैकपटींनी अधिक आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या/बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या मंदिरांची संख्या शेष भारतातील राज्यांपेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक आहे. दुर्दैव म्हणजे, मंदिरांनी समाज मंदिरांचे स्वरूप घेतलेले नाही. त्यांनी जातीय उतरंड आणखी घट्ट केली.

मंदिरे ताब्यात घेण्याची स्पर्धा वाढली, ही तेथील मालमत्तेवर नजर ठेवून व प्रागतिक विचारांचे सोडा, त्यांनी परस्पर वैमनस्यालाही खतपाणी घातले आहे. येथे गांधीजींचे उदाहरण देण्यासारखे आहे.

ते जन्माने हिंदू होते. देव-धर्मावर त्यांचा विश्‍वास होता; परंतु आपला धर्म इतर धर्मांचा व इतरांच्या धार्मिक समजुतींचा दुस्वास करायला शिकवत नाही, असे ते मानीत. निधर्मी तत्त्वापेक्षा ‘सर्व धर्म समभावाचा’ त्यांनी पुरस्कार केला. गरीब व दीनदुबळ्यांची सेवा करणे हाच खरा धर्म, अशी त्यांनी शिकवण दिली. गांधीजी व त्यांच्या खुन्यांची धर्माविषयीची शिकवण परस्परविरोधी आहे.

गांधीजींची हत्या त्यांच्या धर्माविषयीच्या शिकवणीमुळेच झाली. गांधीजींचा सर्व धर्म समभाव हा हिंदूंपेक्षा मुस्लिमांकडे अधिक झुकलेला आहे, असा आरोप त्यांच्या खुन्यांनी केला. आज गांधीजींच्या हत्येच्या ५० वर्षांनंतरही त्यांच्या विचारधारेला विरोध करणारे घटक आहेत. त्यांची आज राजकीय सोयीसाठी हिंदुत्ववादी घटक वाखाणणी करत असोत, ते इतर धर्मियांचा तिरस्कार करतात.

देशभर हिंसाचाराचा आगडोंब त्याच दुस्वासातून निर्माण होत आला आहे. धार्मिक सहिष्णुता व सामाजिक समता या तत्त्वाचा राजकारणातही पुरस्कार केला जात नाही. देशातील वातावरण बदलले आहे. रामाचे मंदिर उभारल्यावर जादा मते पैदा होतात. देशभरातील नेते पक्षभेद विसरून रामनवमीला मंदिरात जातात. गोव्यात तर त्यादिवशी सुटीही असते.

गोव्यात एक काळ असा होता की, उमेदवार निवडणूक अर्ज भरल्यावर प्रत्येक धर्माच्या एका मंदिरात जाऊन माथे टेकवून येत असत. आता तसे चालत नाही. प्रत्येक जाती-जमातींची वेगळी श्रद्धास्थाने आहेत. तेथे जावे लागते.

जांबावलीच्या दामोदर देवस्थानात पल्लवींना दोनवेळा जावे लागले. कारण पहिल्यांदा त्या गेल्या होत्या तेव्हा त्यांनी धावती भेट दिली होती. आम्हाला तुम्ही न भेटता कशा गेलात? असे सांगून त्यांना शिमगोत्सवाच्या काळात पुन्हा बोलाविण्यात आले.

एका ठिकाणी त्या गेल्या की, त्यांना दुसऱ्या ठिकाणचे आमंत्रण येई. देवापेक्षा सश्रद्ध लोकांचे राग लोभ अधिक. ५० वर्षांपूर्वी भाऊसाहेब बांदोडकरांनी ही गोमंतकीयांची मानसिकता पक्की ओळखली होती. त्यामुळे प्रचार सभेत तुमच्या गावात मंदिर उभारून देणार असल्याची ते घोषणा करीत.

बांदोडकरांनी शाळाही सुरू केल्या. प्रा. पराग पोरोब यांनी बांदोडकरांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे योग्य अवलोकन केले आहे. त्यांच्या मते, गोव्याच्या मुक्ततेनंतर बहुजन समाजाच्या ओळखीचा- अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. मंदिरे ही ओळख प्रस्थापित करण्याची - मानमरातब मिळविण्याची केंद्रे होती.

त्यामुळे खेडेगावात लोकेच्छेला मान देऊन मंदिरे उभारणे समजून घेता येते. राजे-महाराजेही आपल्या राज्यसत्तेला वैधानिकता मिळविण्यासाठी मंदिरे स्थापन करीत व त्या मंदिरांच्या नावे राज्यकारभार चालविण्यात येत असे.

अजून परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. मुरगाव तालुक्यातील एका ख्रिस्ती नेत्याने सोवळे नेसून पूजा केली. एवढेच नव्हे, तर भ्रष्टाचारी मार्गाने काळे धन वापरून डिचोली तालुक्यात एक फार्म खरेदी केला आहे. तेथे असलेल्या एका मंदिराचा कळस त्यांनी उभारून दिला. त्यामुळे त्या नेत्याला आता मंदिरात विशेष मान आहे.

त्यांच्या सांगण्याने मंदिरात कार्ये चालतात. धनिक समाजांनी पुरातन मंदिरांत मोठा दानधर्म केल्यानंतर त्यांना महाजनकी प्राप्त होत गेली. आजही काही वेगळे चालू नाही. मान आणि प्रतिष्ठा, गेलेली इभ्रतही मंदिरांमध्ये सढळहस्ते दानधर्म करून परत मिळविता येते. गोव्याचा एक माजी मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा फुटण्यासाठीही मी ‘प्रसादरूपी’ मान्यता मिळवितो असे बिनदिक्कत सांगत नाही का!

हिंदू धर्मातील हे अवडंबर येथील साधू-महात्मे आणखीनच वाढवून स्वत:चे स्तोम वाढवू लागले तर नवल ते काय? मध्यंतरी एक स्वामी स्वत:लाच उमेदवारी मिळवू पाहात असल्याची चर्चा असल्याने पक्षाचे खात्रीशीर उमेदवार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना धडकीच भरली होती.

कारण या स्वामीजींनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपासून स्फूर्ती घेतली आहे. योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिराचे ते प्रमुख पुजारी आहेत. १९९८ पासून ते लोकसभेवर निवडून येत आहेत. २००५ मध्ये त्यांनी धार्मिक शुद्धीकरणाची चळवळ राबवून पाच हजार लोकांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. ते आक्रमक हिंदुत्ववाद चालवितात.

त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता अनेक संत-महंतांना जे राजकारणात येऊन नशीब आजमावू पाहतात, (म्हणजे मुख्यमंत्री किंवा त्याहून मोठी पदे मिळवू पाहतात.) त्यांना आदर्शवत वाटली तर नवल ते काय! परंतु त्यानंतर त्या स्वामीजींना उपरती होऊन आपण सामाजिक कार्य आणखी जोमाने चालवू पाहतो, राजकारणात रस नाही, हे जाहीर करावे लागले. कारण भाजपशी संघर्ष करून उमेदवारी मिळवायलाही राजकीय चातुर्य आणि धूर्तपणा लागतो.

परंतु या सगळ्यांपेक्षा ख्रिस्ती धर्मगुरू आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांचे वक्तव्य मला अधिक शहाणपणाचे व वस्तुस्थिती गृहीत धरून ख्रिस्ती शिकवणीला अधिक जवळ जाणारे वाटले. ते म्हणाले, ७ मे रोजी वालंकिणीला ट्रेन जाणार असली, तरी प्रार्थनेपेक्षा मतदान करणे सर्वश्रेष्ठ आहे!

धर्म महत्त्वाचा आहे; परंतु अंधभक्त बनू नका! सश्रद्ध माणूस असणे वाईट नाही; परंतु गुरू किंवा बाबावर माझी श्रद्धा आहे. माझ्या घराण्याची देवता व धर्मावर माझी श्रद्धा आहे, इथपर्यंत ठीक; परंतु ‘‘चमत्कार व मंत्रांवर माझी श्रद्धा आहे, ती देशाच्या संविधानापेक्षा अधिक आहे,’’ इथवर मजल जाते तेव्हा प्रश्‍न निर्माण होतात.

देवावर श्रद्धा ठेवा, तुमचे सर्व प्रश्‍न क्षणात नाहीसे होतील असे सांगणे व त्याचे तंतोतंत पालन करणे धोेक्याचे. धर्माच्या शिकवणीलाही प्रश्‍न विचारता आला पाहिजे. तुमच्या विवेकावर धर्माने मात करता कामा नये, ही विचारधारा महत्त्वाची.

ख्रिस्ती समाजाच्या या राजकीय-सामाजिक जागृतीचा मी स्वत: नेहमी आदर करीत आलो आहे. मतदान कसे करावे, यासंदर्भात व्यवस्थित विवेचन चर्चच्या शिकवणीतून होते. काही आक्रस्ताळे पाद्री सोडले तर चर्चमधून मतदान कोणाला करावे, यापेक्षा मतदान कसे करावे, याचे व्यवस्थित धडे दिले जातात. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांना मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपलाही पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा केला व आपण त्यांच्या सूचनांचा आदर करतो, असा युुक्तिवाद केला. परंतु आर्चबिशपांनी आवाहन केल्यानंतर ख्रिस्ती बांधवांना कोणाला मतदान करायचे, याचा वेगळा खुलासा करायची गरज भासणार नाही.

कारण चर्चला स्पष्ट भूमिका आहे. त्या विचारधारेसुसंगत आवाहने चर्च १९६७ पासून करीत आली आहे. त्यासाठी जनमत कौल घेण्यात आला. तेव्हा चर्चने उजव्या शक्तिविरोधात ख्रिस्ती धर्मियांना एकवटले. आज तीच दुसऱ्या आवरणात हिंदू एकतेच्या स्वरूपात अवतरली आहे. ही हिंदुत्वाची व्याख्या चर्चने झिडकारणे स्वाभाविक आहे.

परंतु चर्च धर्मसंस्था धर्म-पाखंडी आहे, यातही तथ्य नाही. कॉंग्रेस पक्षातील बेबंदशाही- भ्रष्टाचार वाढला व गोव्याच्या अस्तित्वाला नख लावण्याची कारस्थाने सुरू झाली, तेव्हा पर्रीकरांनी मिशन सालसेत सुरू केले. तेव्हा चर्चने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. चर्चलाही तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा पर्रीकरांचा चेहरा धर्मनिरपेक्ष वाटला.

२०१२ मध्ये पर्रीकरांनी ‘सामाजिक अभिसरणा’ची मोहीम चालवली, तेव्हा पाच ख्रिस्ती आमदार त्यांना जिंकून आणता आले. एवढेच नव्हे, तर त्यानंतर २०१७ मध्ये भाजपचे १३ सदस्य जिंकून आले, त्यात सर्वाधिक सातजण ख्रिस्ती होते. परंतु जेव्हा पर्रीकरांना दिल्लीला जावे लागले, तेव्हा सर्वांत ज्येष्ठ सदस्य असूनही फ्रान्सिस डिसोझा यांना ते पद मिळाले नाही.

ख्रिस्ती म्हणूनच त्यांना हा अन्याय सोसावा लागला, ही भावना निर्माण झाली. ज्येष्ठ व अभ्यासू असूनही नीलेश काब्राल यांना डावलले गेले. ख्रिस्ती समाजाच्या मनात त्यामुळे भाजप हा केवळ हिंदूंचा पक्ष आहे, अशी भावना कोरली गेल्यास नवल नाही!

त्यात तथ्यही आहे; परंतु भाजपमधील पाखंडींना जी भीती ख्रिस्ती आमदारांचा वरचष्मा निर्माण झाल्यानंतर वाटली, ती कॉंग्रेसमधून आयात केलेले पक्षबदलू, भ्रष्ट व ‘लापीट’ आमदार बहुसंख्य झाले तरी ‘धक्का’ बसला नाही, हा खरा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. कारण विचारधारेतील पक्षाचे सध्या ‘जिंकणाऱ्या’ मशीनमध्ये रूपांतर झाले आहे. येनकेन प्रकारेण जिंकणे हे आता या पक्षाचे ध्येय बनले आहे.

Loksabha Election Goa
Goa Politics: अनुल्‍लेखाने खलपांना इशारा; मुख्यमंत्री म्हणाले, ‘म्‍हापसा अर्बन’ची फाईल पुन्‍हा उघडू

पक्षाच्या धोरणांशी फारकत नाही. आम्ही ध्येयधोरणांना बांधील आहोत, असे म्हणायचे आणि पक्षाचे जुने वैभव ‘केडर’ संपुष्टात आणायचे, हे चालू शकणार का? नेतृत्वाने पक्षाच्या संघटना प्रथम, नेते नंतर या तत्त्वाला पूर्ण हरताळ फासला आहे. एकेकाळी रा. स्व. संघाची विचारधारा तशीच होती.

आज इंदिरा गांधींना आदर्शरूप मानून भाजपने एका उमेदवाराभोवती सारी निवडणूक यंत्रणा उभी केली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही ‘मोदी की गॅरंटी’ला महत्त्व दिले आहे. ‘एक राष्ट्र, एक नेता’ असेच या निवडणुकीचे स्वरूप आहे. त्यामुळे उत्तर गोव्याचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाही ओळीने जिंकलेल्या सहाव्या निवडणुकीत मोदींच्या नावाने मते मागण्याची सोय होते. आपल्या प्रचाराचा भाग म्हणून ते ठिकठिकाणी फिरतात, तेव्हा लोक त्यांना प्रश्‍न विचारतात. तेव्हा ही निवडणूक मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आहे, असे ते सांगतात.

त्यामुळे या निवडणुकीत रोजगार, भाववाढ, आर्थिक असमानता किंवा भ्रष्टाचार, अनागोंदी आदी प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष हटविण्याची चांगलीच सोय झाली आहे. भाजपच्या निष्ठावान मतदारापलीकडे हिंदुत्ववाद हाही इश्‍यू नाही. नरेंद्र मोदींनी ‘नव्या भारताचे’ एक स्वप्न लोकांपुढे ठेवले आहे.

त्यामुळे राज्य पातळीवरील प्रश्‍नांपासून लक्ष हटवून विस्तृत व विकसित भारताकडे पाहून मतदान करा, असे बिंबविले जाते. स्थानिक पातळीवर अनेक प्रश्‍न आहेत. विशेषत: ज्या पद्धतीने भाजपने संधीसाधू, भ्रष्ट व कसलीही नीतिमत्ता नसलेल्या मंडळींशी हातमिळवणी केली, त्याबद्दल रोष आहे. प्रत्येक राज्यात नवे भागीदार त्यांनी शोधले.

विशेषत: कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातही ज्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपने आपले दरवाजे उघडले, त्यांच्या कारभाराबद्दल अनेक प्रश्‍न आहेत. याच नेत्यांविरोधात भाजपने जंग छेडली होती. दिगंबर कामत यांनी तर देवापुढे शपथ घेतली होती. आता त्यांनी कॉंग्रेस का सोडली, हे सर्वश्रुत आहे.

तर मग भाजपने ज्यांच्याविरोधात तीव्र आघाडी उघडली, त्यांनाच पक्षात का घेतले? याचे उत्तर स्पष्ट आहे. भाजपचे रूपांतर ‘जिंकणाऱ्या निवडणूक मशीन’मध्ये झाले असले तरी या पक्षाला २०२४ ची निवडणूक साधी सोपी वाटत नाही. सर्व निवडणूक सर्वेमध्ये भाजप निर्विवादपणे जिंकणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले असले तरी भाजप कोणताही धोका पत्करीत नाही. कारण भारतीय मतदाराचे चित्र वर्तविणे शक्य नाही.

तो मतदानाच्या पहिल्या रात्रीसुद्धा विचार करीत असतो. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा गृहमंत्री अमित शहा ते अक्षरश: घाम गाळत आहेत. गोवा हे चिमुकले राज्य; परंतु दोन्ही नेते गोव्यात प्रचार सभा घेणार आहेत.

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस पक्षाचे कौतुक अशासाठी की, तो लोकशाही तत्त्वांना जागला. त्या पक्षासह अनेक प्रादेशिक पक्षांसमोर जिंकू किंवा मरू, अशी स्थिती आहे. हे छोटे पक्ष भाजप संपवणार आहेत, याबद्दल त्यांच्या मनात तीळमात्र शंका नाही.

त्यामुळे भाजपला जिंकून येण्यापासून रोखणे हा त्यांच्यापुढचा सर्वांत मोठा मुद्दा आहे. त्या पक्षांचे अनेक नेते तुरुंगात आहेत किंवा सक्तवसुली संचालनालयाच्या भिंगाखाली आले आहेत. तरीही न डगमगता उभे राहिलेले उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन या नेत्यांच्या कामगिरीकडे राजकीय निरीक्षक डोळे लावून बसले आहेत. लोकशाही-संविधान वाचवा, ही त्यांची आर्त हाक कितीजण समजून घेतील, हासुद्धा त्यांच्यापुढचा प्रश्‍न आहे.

गोव्यातही ज्या पद्धतीने कॉंग्रेस उमेदवारांसाठी कॉंग्रेस व छोटे-मोठे पक्ष राबताहेत, ही वाखाणण्याजोगीच गोष्ट आहे. निवडणुकीत कोण तरी जिंकतो व हरतो; परंतु मोदींसारखी ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा, भाजपसारखा संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत ताकदवान पक्ष असताना त्यांच्यापुढे छाती पुढे काढून लढणारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, स्थानिक नेते यांचे कौतुक करावेच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com