अस्सल कोल्हापुरी चवीचे ‘थालीज अँड मोर’

थाळी म्हटले की असंख्य चवींची संगतीदेखील असायला हवी. एकाच थाळीत विविध प्रकारच्या चवीचे पदार्थ खाण्याचा आनंद मिळायला हवा. हेच सूत्र पकडून ''थाली अँड मोर''ने इथला मेनू तयार केला आहे.
kolhapur
kolhapurDainik Gomatnak

मनस्विनी प्रभुणे-नायक

कोल्हापूरच्या 'पांढरा-तांबडा' रश्‍श्‍याचे गोव्यात अनेक प्रेमी आहेत. गोवेकर मासळीचे भोक्ते असले तरी कधीतरी अधूनमधून मटण-चिकन खायला आवडतं आणि चांगल्या प्रतीचे मटण खाण्यासाठी ही मंडळी थेट कोल्हापूर गाठतात.

पोटभर मटण, पांढरा तांबडा रस्सा ओरपून, तृप्त ढेकर देऊन परत येतात. आजचा लेख या अशा मंडळींसाठी आणि ज्यांना हे पदार्थ आवडतात अशा खवय्यांसाठी आहे. मंडळींनो तुम्हाला आता पांढरा तांबडा रस्सा आणि मटण खाण्यासाठी कोल्हापूर गाठायची अजिबात गरज नाही. कोल्हापूरची खासियत असलेले सगळे पदार्थ आता पणजीतील 'मनोशान्ती' या हॉटेलमध्ये फेब्रुवारीत नव्याने सुरू झालेल्या 'थालीज अँड मोर' या रेस्टोरंटमध्ये मिळत आहेत.

अनेकांकडून इथल्या मेनूबद्दल ऐकायला मिळालं. मुख्य म्हणजे आमच्या ऑफिसमधली मंडळी एकदा जेवणासाठी तिथं गेली होती आणि तिथून आल्यापासून प्रत्येकजण तिथल्या पदार्थांचे कौतुक करत होते.

अस्सल कोल्हापुरी चव असलेल्या चमचमीत पदार्थांच्या शोधात अनेकजण असतात. गोव्यात ताजेताजे मासे आणि चिकनचे प्रकार चांगले मिळतात. पण मटणबाबत इथली मंडळी चोखंदळ असतात. मटणाचा दर्जा चांगला असला पाहिजे याबाबत आग्रही असतात. अशा मंडळींची काळजी 'थालीज अँड मोर'ने सोडवलीय.

कोल्हापुरी मिसळ

मिसळ म्हणताच आपोआप कोल्हापुरी मिसळ असं नाव तोंडावर येतं. रेस्टोरंट जरी थालीसाठी प्रसिद्ध असलं तरी इथं संध्याकाळी, सकाळी नाश्त्याचे उत्तम पदार्थ मिळतात. यात सर्वात वरच्या क्रमांकावर कोल्हपुरी मिसळ आहे. अस्सल कोल्हापुरी चव असलेली मिसळ खाण्याचा आनंद तुम्ही उपभोगू शकता.

आता बहुतेक सर्व रेसटॉरंटमध्ये मिसळ मिळते. पण ती खास अशी चव सर्वच मिसळला येत नाही. थाली अँड मोर मध्ये मिसळला ती अस्सल कोल्हापुरी चव मिळते. याव्यतिरिक्त घावणे आणि चटणी, अंडा घोटाळा, अंडा खांडोळी सारखे आगळेवेगळे पदार्थ नाश्त्याला मिळतात जे गोव्यात कुठेच मिळत नाही.

'थाली अँड मोर' मैत्रीची गोष्ट

असं म्हणतात की वाईट परिस्थितीतून बाहेर पडताच काहीतरी चांगलं जन्माला येतं. सुजित कुमार, अमित पाटील आणि संदीप प्रभुदेसाई हे तिघे मित्र एचडीएफसी बँकेत नोकरीला होते. कोरोनाच्या काळात निर्माण झालेली अनिश्चितता सर्वांनीच अनुभवली. याच काळापासून ''आपण काहीतरी वेगळं करूया'' या विचारातून या तिघांनी नव्या मार्गांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती आणि ते रेस्टोरंट सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले.

एक बिहारचा, एक कोल्हापूरचा, एक गोव्याचा आणि तिघेही चवीने खाणारे. चवींची उत्तम जाण असणारे. गोव्यात 'फिशकरीराईस' थाली मिळणारी अनेक रेस्टोरंट आहेत. यातलेच एक रेस्टोरंट बनण्यापेक्षा यापेक्षा काहीतरी वेगळे रेस्टोरंट सुरु करूया असं ठरवून या तिघांनी 'थालीज अँड मोर' सूरू केलं.

तिघांचे भौगोलिक वेगळेपण बघता या तिघांच्या खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण लक्षात येते. सुजित कुमार यांनी 'अहूना' चिकन आणि सध्या सर्वत्र प्रसिद्ध असलेले 'चंपारण मटण' बनवयाला सुरुवात केली आहे. बिहारमधील चंपारण भागात मातीच्या हंडीमध्ये खडे मसाले वापरून मटण बनवण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. ''थालीज अँड मोर'' मध्ये गोव्यातील खवय्यांना हे चंपारण मटण मिळेल तर संदीप प्रभुदेसाई हे गोव्याचे असल्यामुळे येथे चांगल्या प्रतीची ''फिशकरीराईस'' थाली देखील मिळते.

थालीज अँड मोर

या नावावरून इथल्या मेनूची संकल्पना लक्षात येते. अनेकांना थाळी म्हटले की भरपूर पदार्थ असे वाटते. थाळी म्हटले की असंख्य चवींची संगतीदेखील असायला हवी. एकाच थाळीत विविध प्रकारच्या चवीचे पदार्थ खाण्याचा आनंद मिळायला हवा. हेच सूत्र पकडून 'थाली अँड मोर'ने इथला मेनू तयार केला आहे.

मटण थाली, चिकन थाली, अंडा थाली आणि शाकाहारी थाली या चार विभागांमध्ये इतक्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आहे की इथं गेल्यावर वेगवेगळ्या पदार्थांचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. मटण सुका, मटण मसाला, मटण ड्राय, मटण ड्राय फ्राय, मटण मिंट, मटण लाहोरी, मटण लांबा इतके वेगवेगळे पर्याय एकाच ठिकाणी मिळणे हे मटण खाणाऱ्या खवय्यांसाठी खास आहे. चिकनमध्ये मात्र चिकन खरडा, चिकन मॅग्नेट या थोड्या वेगळ्या पदार्थांचा समावेश आहे.

इथली चिकन-मटण स्पेशल थालीदेखील आकर्षक असून यात चिकन/मटण ड्राय फ्राय, चिकन/मटण मसाला, तांबडा-पांढरा रस्सा, चपाती/भाकरी, पुलाव, सोलकढी, सलाड आणि आम्रखंड किंवा फ्रुटखंड इ. मिळतात. एवढे सारे प्रकार म्हणजे खाणाऱ्यांची पर्वणीच. इथली शाकाहारी थालीदेखील तेवढीच चविष्ट आहे.

पिठलं, भरल्या वांग्याची भाजी, आणखी एक सिझनल भाजी, चटणी, भात, डाळ, गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती मिळते. रेस्टोरंट सुरु होऊन दोन महिने झालेत, पण मटण थाली खायला येणाऱ्याइतकेच शाकाहारी थाली खायला येणारेदेखील आहेत. अस्सल महाराष्ट्रीयन आणि त्यातही कोल्हापुरी चव असलेली शाकाहारी थाली मिळणे 'थाली अँड मोर' मुळे सोपे झाले आहे. 'थाली अँड मोर' मध्ये अस्सल कोल्हापूरवरून आलेले आचारी आहेत. त्यांनीच बनवलेला मसाला इथल्या पदार्थांत वापरला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com