Waterfall In Goa: कड्याकपारीमधून घट फुटती दुधाचे

धबधब्याच्या पाण्यात ओलेचिंब भिजणे हा एक सर्वांगसुंदर अनुभव आहे.
Waterfall In Goa
Waterfall In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता साेनक

Waterfall In Goa गोव्यातील पावसाळा अनुभवायचा असेल तर येथील धबधबे बघावे, त्यांच्या खळखळणाऱ्या पाण्यात भिजावे, उंचावरून कोसळणाऱ्या शुभ्र धारेखाली मनसोक्त आंघोळ करावी. गोव्यातील धबधबे हे एक नयनरम्य दृश्य आहे.

पावसाळ्यात गोव्यातील प्रमुख आकर्षण. येथील धबधब्यांचे नेत्रसुख घेतल्याशिवाय गोवा दर्शन अपूर्ण राहील. येथील काही धबधब्यांचा आम्ही मनसोक्त अनुभव घेतला आहे. त्यांपैकी एक वाळपई जवळचा पाल (पाली) येथील धबधबा.

हिरव्यागार वनराईने नटलेल्या म्हादई अभयारण्यात, डोंगरमाथा आणि नदी नाल्यातून, वर खाली दोन कि. मी. चढ उतार करत आम्ही गेलो. वाटेने जाताना नवीन फुटलेली झाडांची पालवी मनाला मोहवीत होती. पक्ष्यांची किलबिल चित्त वेधत होती. मधूनच नागमोडी वळणे घेऊन फोफावत जाणारी नदी खाली दिसत होती. खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कानांना सुखावत होता.

आम्ही पाल येथील जंगलात असलेल्या धबधब्यांजवळ पोहोचलो. या अरण्यात दोन धबधबे आहेत. आम्ही आधी वरच्या धबधब्यावर गेलो. डोंगरमाथ्यावरून खाली एका मोठ्या दगडावर कोसळणारा हा धबधबा, याला कॅस्केडिंग तर नाही म्हणता येत, पण शंकराच्या पिंडीवर होणाऱ्या दुग्धाभिषेकासारखा वाटत होता.

जणू स्वर्गातून कोसळणाऱ्या भागीरथी नदीच्या जोरदार प्रवाहाला आपल्या जटांत सामावून घेत या गंगेला अलगद पृथ्वीतलावर आणणारा शिवशंकरच या क्षीरसागराच्या रूपात समोर उभा ठाकलाय!

पाण्याचे तुषार अंगावर घेत आम्ही जवळ गेलो. पाण्यात भिजण्याचा मोह आवरणे शक्यच नव्हते. अगदी पायथ्याशी गेल्याबरोबर पाण्याच्या प्रवाहाचा जोर जाणवला. अंगावर धबधब कोसळणारे पाणी जास्त वेळ डोक्यावर घेणे शक्य नव्हते.

आम्ही धबधब्याच्या मागे असलेल्या दगडांवर बसलो आणि अंगावर उडणाऱ्या पाण्याच्या हलक्या तुषारांचा आनंद घेत राहिलो. आमच्यासारखेच अनेक लोक, विशेषतः तरुण मुले, तिथे धबधब्याचा आनंद घेत होते.

धबधब्याखाली भिजणे हा खरोखरच एक आल्हाददायक अनुभव आहे. बऱ्याच वेळानंतर आम्ही खाली आलो. खालचा धबधबाही अतिशय सुंदर होता. इथेही थोडा वेळ पाण्यात भिजायचा मोह आवरता आला नाही.

Waterfall In Goa
Portuguese In Goa: पोर्तुगिजांचे पाय गोव्याच्या मातीत कुणी रोवले?

धबधबे सहसा नदीप्रवाहाच्या वरच्या टप्प्यात तयार होतात. नदीच्या प्रवाहमार्गात असलेली निरनिराळी भूस्तररचना धबधब्यांच्या निर्मितीस प्रामुख्याने कारणीभूत आहे.

प्रवाहमार्गात असलेल्या वेगवेगळ्या (कठीण, मृदू) खडकांचे अस्तित्व, पर्वतमय पठार व मैदानी प्रदेशांच्या वर खाली असलेल्या सीमांतील उंचीचा फरक, किनारी भागात असलेले कडे, हिमप्रदेशात बर्फ वितळून तयार झालेली खोरी, प्रस्तरभंग (फॉल्ट) सारख्या भूगर्भीय प्रक्रिया ही धबधबे निर्माण होण्यामागची मुख्य कारणे आहेत.

गोव्याचे धबधबे अत्यंत सुंदर आहेत. म्हादई अभयारण्यातील दूधसागर, हरवळे, पासून ते नेत्रावळी येथील मैनापी, बामणबुडो हे धबधबे आणि त्यांचे फेसाळते पाणी आम्हांला नेहमी आकर्षित करते. अभयारण्यातून जाताना वाटेतील हिरवाई आणि विलोभनीय पर्वतरांगा आपल्याला नि:शब्द करतात. हे जलप्रपात म्हणजे निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार आहे.

पूर्वेला पश्चिमघाट आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांनी गोव्याला एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक देणगी दिली आहे. गोव्यातील प्रमुख नद्या पूर्वेकडच्या डोंगराळ भागात उगम होऊन पश्चिमेला अरबी समुद्रात विलीन होतात. समुद्रसपाटी आणि पश्चिमघाटातील डोंगराळ प्रदेश यामधील उंचीच्या फरकांमुळे गोव्यात ठिकठिकाणी अनेक जलप्रपात निर्माण झाले आहेत.

Waterfall In Goa
...आणि राशोल ओसाड पडले

नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या जोरामुळे मार्गातील खडकांची झीज होते. कठीण खडकांपेक्षा मृदू खडकांची झीज लवकर आणि मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी उंचीमध्ये फरक निर्माण होतो.

काही ठिकाणी खालील मृदू खडकांचा आधार गेल्यामुळे कठीण खडक खाली कोसळतो आणि तेथे एक कडा निर्माण होतो. या कड्यावरून कोसळणाऱ्या नदीच्या पाण्यामुळे एक जलप्रपात तयार होतो.

ह्या कड्यांची उंची कमी असेल तर नदीच्या पात्रात ‘धावत्या’ (रॅपिड्स) तयार होतात. जास्त उंची असली की मोठा धबधबा तयार होतो. सतत होणाऱ्या नदी पात्रांतील खडकांच्या क्षरणामुळे कालांतराने असे धबधबे मागे (नदीच्या उगमाच्या दिशेने) सरकत जातात.

भारतातील इतर ठिकाणी आणि भारताबाहेरीलही काही धबधब्यांचा आम्ही मनमुराद आनंद घेतला आहे. उत्तर भारतातील बहुतेक धबधबे बर्फ वितळून निर्माण झालेले आहेत. मेघालयातील ठिकठिकाणी उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे निव्वळ नेत्रसुखद होते.

भेडाघाटचा नयनरम्य धबधबा अमेरिकेतील नायगाराची आठवण करून देतो. याची उंची कमी असली तरी पाणी मुबलक, शुभ्र, फेसाळणारे असल्यामुळे हा धबधबा लक्षात राहतो.

Waterfall In Goa
उत्तरांनी निर्माण केलेले प्रश्‍न

भारताबाहेरील आमच्या आठवणीत राहिलेले धबधबे म्हणजे अमेरिकेतील नायगारा (नायग्रा) आणि नॉर्वेचा केजोस्फोसेन हा धबधबा. नायग्रा धबधब्याचे सौंदर्य अवर्णनीय आहे. शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्याच्या या जलप्रपाताने आम्हांला अगदी मंत्रमुग्ध केले होते.

कॅनडाच्या बाजूचा हॉर्स शू फॉलही अतिशय सुंदर होता. या दोन्ही धबधब्यांत बोटीतून पाण्याचे तुषार अंगावर घेत आम्ही चिंब भिजलो होतो. धबधब्यांच्या पाण्यात पाहिलेली पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्ये अविस्मरणीय आहेत.

अमेरिका-कॅनडाचे हे धबधबे भूगर्भीय हालचालींमुळे म्हणजे एकावर एक प्रस्तर चढल्यामुळे तयार झाले. नॉर्वेचा केजोस्फोसेन हा नेत्रदीपक धबधबा आम्ही फ्लाम ते लार्डेल या मार्गावर रेल्वेने जाताना पाहिला होता.

वाटेत थोडा वेळ ट्रेन या धबधब्याजवळ थांबते. आम्ही खाली उतरलो आणि डोळे भरून वरून येणारे हे शुभ्र फेसाळ पाणी पाहत राहिलो. हलके तुषार अंगावर झेलण्यात मजा येत होती.

धबधब्याच्या पाण्यात ओलेचिंब भिजणे हा एक सर्वांगसुंदर अनुभव आहे. हा अनुभव सर्वांनी, विशेषतः तरुणांनी, मनसोक्त जरूर घ्यावा. पण आजकाल फक्त सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करणे याच्यातच आपण आनंद मानू लागलो आहोत.

त्यामुळे अनेक अपघातही होतात. निसर्गाची देणगी मनमुराद अनुभवावी. मनसोक्त खेळावे, नाचावे, बागडावे. पण हे सगळे सुखद अनुभव जीवनात आनंद आणण्यासाठी. केवळ सोशल मीडियासाठी नकोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com