पखाला भात ते भाताची पेज

भाताच्या पेजचे ओरिसा, महाराष्ट्र- गोवा इथपर्यंतचे बंध बघून याचा अन्य भागांत शोध घ्यावासा वाटला आणि लक्षात आलं की, भारतभार हाच पदार्थ वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

काही पदार्थ असे असतात कि त्यावरून गावांची आठवण होते. फक्त तो पदार्थ किंवा फक्त ते गाव, परिसर लक्षात राहत नाही तर त्यासोबत अनेक गोष्टी जोडल्या जातात.

२००६ साली ओरिसातील राऊरकेला या गावात एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मुक्काम होता. हे गाव ओरिसा -झारखंड आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवरील गाव. या सीमावर्ती भागातील गावांमधून मोठ्या संख्येनं शालेय मुली दिल्लीला पळून गेल्या होत्या.

झारखंड -छत्तीसगड आणि ओरिसाच्या सीमावर्ती भागातून काही हजारांच्या संख्येनं अल्पवयीन मुली पळून जातात. दिल्ली आणि भारतभरातील वेगवेगळ्या भागात घरकाम करायला जाण्याचं त्यांना मोठं आकर्षण असतं. पुण्यातील 'दृष्टी स्त्री अध्ययन आणि संशोधन केंद्र' यांचा हा प्रकल्प होता.

वर्षभर या तीन राज्यांत प्रवास करून, मुलींना भेटून त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरु होतं. जंगलांत वसलेली गावं, अतिशय दुर्गम भागातील आदिवासी पाडे, संथाली लोकांचा 'मयूरभंज' जिल्हा, ओरिसातील अशा वेगवेगळ्या भागात त्यावेळी जाणं झालं.

फिल्डवर्क सुरु असताना दुपारचं 'जेवण' हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय असायचा. हा सगळा असा भाग होता की इथं रेस्टोरंट - हॉटेलची अपेक्षा करणं मूर्खपणाचं लक्षण ठरायचं. कधीतरी खूप अनपेक्षितपणे यातल्याच कोणत्यातरी पाड्यावर, एखाद्या गावात जेवण व्हायचं. वीस मार्चला 'पखाला भात' दिवस साजरा झाला आणि यानिमित्ताने ओरिसात केलेल्या कामाची आणि तिथं खाल्लेल्या पदार्थांची आठवण आली. हे पदार्थ असे होते की त्यांचं साधर्म्य गोव्यातील काही पदार्थांशी होतं.

'रंगामती' नावाच्या गावात मी पहिल्यांदा पखाला भात खाल्ला आणि मला आपल्या घरात बनवल्या जाणाऱ्या भाताच्या 'पेज'ची आठवण आली. सुंदर अर्थपूर्ण नाव असलेल्या रंगामती गावातून पळून गेलेल्या मुलींच्या घरी गेले होते.

गावातील शिक्षक आम्हाला या मुलींच्या घरी त्यांच्या पालकांशी बोलायला घेऊन जाणार होते. आमचं काम लवकर संपणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी घरी निरोप पाठवून आमची जेवायची व्यवस्था केली.

माती आणि शेणानं सारवलेलं त्यांचं घर उन्हाळ्यात थंड असल्याचं जाणवलं. आपल्या राजांगण घरासारखंच चौसोपी घर, घरातल्या चौसोपी अंगणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची रोपं, कारलं, भोपळा यांची वेल दिसली. स्वयंपाकघराला लागून असलेल्या पडवीत घरातील गृहिणीने आम्हाला जेवायला बोलावलं. त्या मातीच्या शेणानं सारवलेल्या जमिनीवरून चालताना पायांना थंडपणा जाणवत होता.

आमच्या प्रत्येकासमोर मोठा बाउल आणून ठेवला. त्यात पांढरा शुभ्र पातळ पदार्थ होता. जिरे, कोथिंबीर, मिरची घातलेली दिसत होती. या बाऊलच्या शेजारी चार-पाच प्रकारच्या छोट्या वाट्यांमध्ये एकात टोमॅटोचा खट्टा (चटणी), वांग्याचं भरीत, पालेभाजी, आणि तळलेली वडी (वेगवेगळ्या डाळींच्या मिश्रणाचे सांडगे) होते. मोठ्या बाऊलमधल्या पांढऱ्या शुभ्र पदार्थाला 'पखाला' भात म्हणतात असं समजलं. बाऊलच्या बाजूला ठेवलेल्या चटणी, भरीत, पालेभाजी यांच्यासोबत पखाला भात खायचं हे लक्षात आलं.

goa
Goa Crime News: हरमल येथे नऊ लाखांच्या अमली पदार्थांसह इस्रायली नागरिकाला अटक

पखाला भात जसा हातातून तोंडात जायचा त्यासोबत तोंडातून 'सुर्रर..' असा आवाज व्हायचा. पखाला भात हातानं खाताना शिस्त गळून पडली. शक्य तितका आवाज निघणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करून पखाला भात खाण्याचा प्रयत्न केला होता. त्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पखाला भात खाऊन पोटाला थंडपणा जाणवला. आपण भाताची पेज बनवतो. पण ती ताजी ताजी बनवलेली खातो.

पखाला भात अगदी याच्या विरुद्ध पद्धतीनं बनवून खातात. आदल्या दिवशी शिजवलेल्या भातात पाणी घालून रात्रभर तो भात तसाच ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये दही, जिरे, मीठ घालून मिसळून घेतात. मग आपल्या आवडीप्रमाणे यात लिंबाचा रस, कोणी कढीपत्ता, खिसलेलं आलं घालतात. नऊ दहा पद्धतीनं पखाला भात बनवला जातो. तसा वर्षभर हा भात बनवतात पण विशेष करून उन्हाळ्यात 'डिहायड्रेशन' पासून बचाव करण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो.

ओरिसातील पखाला भात ते गोव्यातील पेज पखाला भात खात असताना भाताच्या पेजची आठवण झालीच. पखाला भात दुपारी खाल्ला जातो आणि गोव्यात भाताची पेज रात्री खातात. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात पेज असते.

आमच्या गोमन्तक तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून पुरूमेंत फेस्त आणि तनिष्का तिठासारख्या उपक्रमांमध्ये अनेकजण उकड्या तांदळाची खरेदी करायला येतात. चोडण बेटावरील शेतकरी 'ज्योती' नावाच्या भाताची शेती करतात. याचा उकडा तांदूळ पेजसाठी चांगला असं अनेकजणींकडून ऐकलं होतं. लोक उकडा तांदूळ रोजच्या आहारात वापरू लागलेत.

उकड्या तांदळाची पेज पोषकमूल्य जपणारी असल्यामुळे रात्रीच्या जेवणात अनेकांची यालाच पसंती असते. भाताच्या पेजमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला त्यातून ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं अशा वेळी पेजेचं पाणी दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते. माझ्या आईकडे पेज बनवण्याची वेगळी पद्धत आहे. आई त्यामध्ये थोडे जिरे आणि एक-दोन चमचे मेतकूट घालते.

यामुळे पेजला वेगळी चव येते. भाताच्या पेजचे ओरिसा, महाराष्ट्र- गोवा इथपर्यंतचे बंध बघून याचा अन्य भागांत शोध घ्यावासा वाटला आणि लक्षात आलं की भारतभार हाच पदार्थ वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

अगदी पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील भाताच्या पेजचं अस्तित्व आहे. बंगालमध्ये याला 'पांता भात' म्हणतात तर छत्तीसगडमध्ये 'बोरभात', झारखंड मध्ये ''पानीभात'', आसाम मध्ये ''पोयटा भात'' म्हणतात. दक्षिणेकडील राज्यात देखील पेज बनवली जाते.

केरळमध्ये 'पाझम कांजी', आंध्रमध्ये 'सदी अन्नम' तर तामिळनाडू मध्ये 'पझेधु साधम' म्हणतात. जेव्हा केव्हा मानवाला सर्वात पहिल्यांदा तांदळाचा शोध लागला असेल त्यावेळी तांदळापासून जे काही पदार्थ बनवायला सुरुवात केली असेल त्यात 'पेज' हा पदार्थ नक्कीच असणार. भाताची पेज बनवणं ही अगदी मूलभूत पाककृती आहे.

आपल्याकडेही भाताची पेज नुसतीच खाल्ली जात नाही तर त्यासोबत लोणचं, खळातल्या-चेपणीच्या तोराची एखादी फोड, भाजलेला डांगर, भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा, एखादी पालेभाजी असा सगळा थाट असतो. गोवा वेल्हा, आगशी या गावांमध्ये याकाळात गावठी वांग्यांची शेती होते.

याभागातली स्थानिक मंडळी या गावठी वांग्याची भाजी करतात. कोणतेही मसाले न वापरता केलेली ही भाजी आणि उकड्या तांदळाची पेज, चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगड्याचा तुकडा आणि आताच्या काळात केलेलं कैरीचं ताजं ताजं लोणचं इतकं रात्रीच्या जेवणात मिळालं की बास. पण तरीदेखील मला ओरिसातल्या लोकांचं कौतुक वाटलं. 'पखाला भात' सारख्या पदार्थाला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलं.

ते फक्त 'पखाला भात दिवस' साजरा करत नाहीत तर पुरीच्या भगवान जगन्नाथाला दिवसातून तीन वेळा 'पखाला भाताचा' नैवद्य दाखवतात. आपल्यासारखे त्यांच्याकडेही भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण पखाला भात हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्या आवडणाऱ्या पदार्थावर एवढं भरभरून प्रेम करणारे ओरिसातले लोक निराळेच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com