Goa Monsoon : सखे गं, वैरीण झाली नदी...

व्यवस्थित भूजलपुनर्भरण झाले नाही तर भूगर्भातील पाण्याचा साठा आपण गमावून बसू हे निश्चित!
Goa Monsoon
Goa MonsoonDianik Gomantak

डॉ. संगीता साेनक

Goa Monsoon : द्वापरयुगात गोकुळाष्टमीला कृष्णजन्माच्या वेळी यमुनेला पूर आल्याच्या कथा आपण वाचतो. तसेच काही दिवसांपासून आग्र्यात यमुना नदी दुथडी भरून वाहत असल्याची चित्रे अनेक माध्यमातून सारखी आपल्या डोळ्यांसमोर येत आहेत. यमुना नदी अशी का रुसली?

यमुना वा भारताच्या अन्य भागांतील इतर नद्याच नाहीत तर आपल्या गोव्यातील अनेक नद्यांचीही हीच परिस्थिती आहे. घराबाहेर पडलो की सगळीकडे नुसते पाणीच पाणी दिसते. काही दिवसांपूर्वी आपण पावसाची अगदी व्याकूळ होऊन तिष्ठतेने वाट पाहत होतो, हे आपल्यालाच खरे वाटत नाही. कधी पाऊसच नाही, कधी अवेळी पाऊस तर कधी अतिवृष्टी. असे का घडते? निसर्गाचे वरदान असलेला हा पाऊस आपल्यासाठी कोप का ठरतो?

माझ्या लहानपणी आमच्या साखळीच्या वडिलोपार्जित घरात आम्ही पाटाचे, म्हणजे पाण्यासाठी बांधलेल्या कालव्याचे पाणी वापरत असू. वाळवंटी नदीच्या पैलतीरावर आमचे एकच घर आहे. घराच्या मागे डोंगर. डोंगराच्या पायथ्याशी कुळागर. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी एका मोठ्या तळीत साठवण्याची व्यवस्था होती.

या वरच्या मोठ्या तळीतून हे पाणी खाली बांधलेल्या अजून एका तळीत सोडले जायचे आणि तिथून पाटात. तेव्हा तेथे नळाची सोय नव्हती. पावसाळ्यात साठवून ठेवलेले हे पावसाचे पाणी एवढ्या मोठ्या कुटुंबाला आणि कुळागरातील झाडांना वर्षभर पुरायचे.

Goa Monsoon
Monsoon Update - गोव्यातील जवळपास सर्व धरणे भरली | Dams almost full across Goa | Gomantak TV

तेव्हा सगळीकडेच पावसाचे पाणी साठवण्याची आणि वापरण्याची व्यवस्था होती. विशेषतः ही कुळागरे आणि त्यात तयार केलेले पाण्याचे पाट ही तर खास गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे.

आम्ही घर बांधायला घेतले तेव्हा पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची तरतूद करावी, अशी खूप इच्छा होती. पण काही कारणांमुळे जेवढे पाहिजे होते तेवढे जमले नाही. लहानपणाच्या आठवणी मात्र मनात कायम कोरलेल्या आहेत.

तसे आजही आपण कुठल्याही देवळात गेलो की बाहेर पाण्याने भरलेली तळी दिसते. पावसाचे पाणी साठवून ठेवायची आणि वर्षभर वापरायची पर्जन्यजल संधारण प्रणाली (रेन वॉटर मॅनेजमेंट सिस्टम) भारतात अनेक ठिकाणी प्राचीन काळापासून दिसून येते.

आजकाल मात्र आपल्या गोव्यात सगळीकडे बांधकाम झालेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरायला खूप कमी मोकळी जागा शिल्लक राहिली आहे. हे पर्जन्यजल जलप्रस्तरापर्यंत (एक्विफर) पोहोचणे आवश्यक आहे, पण ते पोहोचत नाही.

Goa Monsoon
Goa News: गणेशमूर्ती तयार करण्यात कारागीर व्यस्त |Artisans busy preparing ganesh idols | Gomantak Tv

म्हणून पावसाळी हंगामात होणारे भूजलपुनर्भरण (ग्राउंड वॉटर रीचार्ज) आता कमी होऊ लागले आहे. पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धती नष्ट करून निसर्गाचे वरदान आपण रुसव्यात बदलले आहे.

आमच्या पिढीचे बालपण कसे पावसाच्या पाण्यात हसत, खेळत, नाचत, बागडत गेले! तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगरावरून येणाऱ्या पर्जन्यजलाला वाहून नेण्यासाठी नाले असायचे. आम्हा लहान मुलांसारखेच पावसाचे पाणीही रस्त्याच्या कडेकडेने रमत-गमत, गात, गुणगुणत, नाचत, बागडत जायचे.

पावसात रस्त्याच्या कडेने चालताना हा मधुर जलनाद कानांना सुखावून जायचा. त्याकाळी जमिनीत झिरपणारे हे पाणी भूजल पातळी (वॉटर टेबल) भरून काढत होते. आता रस्ता वाढवताना आमच्या घराजवळील नाले बुजवून टाकलेत. त्यामुळे एरवी नाल्यातून नदीत जाणारे पाणी आता घराच्या अंगणात यायला लागलेय.

काही दिवसांपूर्वी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो होतो. गोव्याच्या किनारी भागात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण स्थानिक लोकांपेक्षा जास्त आहे. त्यांचा पाण्याचा वापरही जास्त असतो. किनाऱ्यावर पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या अनेक यंत्रणा बोअरवेल खोदून पाणी उपसतात.

Goa Monsoon
Goa Monsoon 2023: पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी; सखल भागात पूरजन्य स्थिती, धोका वाढला

सगळे नियम धाब्यावर बसवून खोदलेल्या या बेकायदेशीर विहिरी भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा करतात. एका बाजूने हा मोठ्या प्रमाणावर केलेला उपसा आणि दुसऱ्या बाजूने कमी झालेले जमिनीत झिरपणारे पाणी.

त्यामुळे भूजलाची अत्यंत वेगाने घट होते आहे. हे नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा उपसा भूजलपुनर्भरणाच्या प्रमाणापेक्षा कमी झाला पाहिजे.

गोव्यातील माती मुख्यतः जांभ्या (लेटराईट) खडकापासून बनलेली आहे. जांभ्याचा हा प्रस्तर सच्छिद्र (पोरस) आहे. म्हणून त्यात सामावलेला आपला भूजलस्तरही सच्छिद्र आहे. त्यामुळे गोव्यातील भूजलसाठा एकमेकांना जोडलेला आहे.

एका ठिकाणी पाणी उपसले की जवळील पाणी चहूबाजूंनी उपसा केलेल्या ठिकाणी येऊन जाते. परिणामतः जवळ असलेल्या विहिरी आणि भूजलस्तर कोरडे पडतात. तर किनाऱ्याजवळील भागात खारे पाणी आपल्या गोड्या पाण्यात मिसळून जाते आणि गोडे पाणी खारट करून टाकते.

Goa Monsoon
Dr. Ramani Goa Marathon 2023 : जगप्रसिद्ध रामाणी मॅरेथॉन यंदा 5 नोव्हेंबरला!

गोव्यातील किनारी भागात पर्यटनाचा ताण आहे तर अंतर्भागात खाणकामाचा ताण आहे. येथे खनिज उत्खननासाठी खूप खोल खोदले जाते, अगदी भूजल पातळीच्या खालपर्यंत. भूस्तरातून भळभळ वाहत खाणीत येणारे हे भूजल, सारखे बाहेर फेकले जाते. यामुळे आजूबाजूचा सच्छिद्र भूजलस्तर कोरडा पडतो.

गोव्यातील खाणपट्ट्यातील विहिरी आणि भूजलस्तर या खाणींमुळे कोरडे पडले. भूजलस्तर जवळ जवळ रिता झाला. हल्लीच एका बैठकीत (प्रिजेंटेशनमध्ये) ऐकले होते की साखळी डिचोलीला आता खारफुटीची झाडे दिसू लागली आहेत.

येथे समुद्राच्या भरतीचा आणि खाऱ्या पाण्याचा काही प्रभाव नव्हता. येथील जमीन आणि पाणी गोड्या पाण्याच्या प्रभावाखाली आहेत.

मला वाटते की अशा जागेवर वाढलेली ही खारफुटीची झाडे सूचित करतात की येथल्या जमिनीतील खारटपणा वाढतो आहे. या गोड्या पाण्यात खारटपणा येतो आहे. नियंत्रणाबाहेर जाण्याआधी ह्यावर कसून अभ्यास झाला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com