मागोवा नी सांगावा : ...आणि क्रांतीची मशाल धगधगत राहिली

अठरा जूनला पडलेली ठिणगी, पारतंत्र्याला भस्मसात करेपर्यंत क्रांतीच्या मशालीत धगधगत राहिली.
Goa Liberation Movement
Goa Liberation MovementDainik Gomantak

सुशीला सावंत मेंडीस

Goa Liberation Movement : अठरा जून १९४६ रोजी मडगावच्या त्या ऐतिहासिक घटनेनंतर गोव्यात आणि गोव्याबाहेर, गोवा मुक्तीसाठी काय घडामोडी घडल्या यावर फारसे लिहिले गेले नाही. त्या दिवसाच्या घटनेचा गोव्याच्या इतिहासावर खूप मोठा प्रभाव पडला, ज्याची परिणती शेवटी गोवा मुक्तीमध्ये झाली. दुसऱ्याच दिवसापासून २३ जूनपर्यंत दररोज गोव्यातील विविध भागांत, शहरांमध्ये तसेच खेड्यापाड्यात निषेध सभा झाल्या.

१९४६च्या घटना

आंदोलनाला पाठिंबा म्हणून गोव्यात १९ जून रोजी व्यापारी व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. हा हरताळ बहुतांश गावांमध्येही पसरला. लोहिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी दुपारी एक मोठी मिरवणूक घोषणा देत पणजी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली.

पोलिसांनी लोकांना बेल्टने बेदम मारहाण केली आणि रतन खंवटे, शशी बांदोडकर असे काही जण जखमी झाले. लक्ष्मीकांत भेंब्रे, विनायक मयेकर, इवाग्रिओ ज्योर्ज, दास बोरकर आणि जे. एम. शहा यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. फोंडा, म्हापसा आणि मडगाव येथेही अशीच निदर्शने झाली.

२० जून रोजी लोहिया यांना कुळ्याच्या सीमेवर सोडण्यात आले. त्याच दिवशी सकाळी महापालिका चौकात मिरवणूक काढण्यात आली, ज्याला त्या दिवसापासून ‘लोहिया मैदान’ असे नाव देण्यात आले. टी. बी. कुन्हा, बर्था मिनेझिस ब्रागांझा, व्यंकटेश वैद्य आणि सँचेस डी सूझा हे काही जण जमावाला संबोधित करत होते.

बाकीबाब बोरकर यांनी ‘डॉ. बोस्सा, डॉ. बोस्सा उठून चलूंक लाग’ हे गीतही तयार केले. २१ रोजी सकाळी प्रभातफेरी निघाली आणि संध्याकाळी जाहीर सभा होती. पुरुषोत्तम काकोडकर, एनियो पिमेंटा, उपेंद्र तळावलीकर, उमाबाई शिराळी हे वक्ते होते. ‘वंदे मातरम्’ हे गाणे मोठ्याने गायले गेले.

२२ जून रोजी फोंडा आणि वास्को येथे जाहीर सभा झाल्या. फोंडा येथील चर्चसमोर झालेल्या बैठकीला पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मणराव सरदेसाई, उपेंद्र तळावलीकर, सांचेस डी सौझा, कार्लोस पायर्स आणि इव्हाग्रिओ जॉर्ज वक्ते म्हणून लाभले. वास्कोत प्रचंड मिरवणूक मुख्य रस्त्यावरून निघाली आणि एका टप्प्यावर पोर्तुगीज सैन्याच्या एका तुकडीने हल्ला केला.

डी. ए. देसपांडे आणि जेराल्ड परेरा यांनी उपस्थितांना संबोधित केले. २३ जून रोजी मडगाव येथे कोमुनिदाद इमारतीच्या व्हरांड्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. आणखी एक सभा चिंचिणी येथे आयोजित करण्यात आली होती आणि त्याला क्रिस्तोेव्हाओ फुर्ताडो, जुझे मारिया फुर्तादो, लक्ष्मीकांत भेंब्रे आणि अरमांडो परेरा यांनी संबोधित केले होते.

Goa Liberation Movement
मर्मवेध : लुटालूट!

३० जून रोजी मडगावमध्ये जेथे बैठक होणार होती त्या भागाला घेराव घालण्यासाठी आफ्रिकन सैनिकांना पाठवण्यात आले होते. बर्था मिनेझिस ब्रागांझा आणि टी. बी. कुन्हा यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ‘जय हिंद’च्या जोरदार घोषणांनी दुमदुमलेली सभा अखेर पोर्तुगिजांनी बलपूर्वक उधळली.

पुढील काही महिन्यांत म्हापसा, डिचोली, म्हार्दोळ, कार्मोणा, जांबावली आणि कुंकळ्ळी येथे सभा आयोजित करण्यात आल्या. चांदोर स्मशानभूमीत १० जुलै रोजी लुईस डी मिनेझिस ब्रागांझा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक बैठक आयोजित करण्यात आली होती. तरुण मुलींनी ‘वंदे मातरम्’ गायले. या स्मशानभूमीत जमलेल्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

पुढील काही दिवस पोर्तुगिजांनी अटकसत्र आरंभले. टी. बी. कुन्हा यांना १२ जुलै रोजी अटक करण्यात आली आणि पोर्तुगालला हद्दपार करण्यापूर्वी आग्वाद किल्ल्यावरील तुरुंगात टाकण्यात आले. भास्कर भंडारी यांना १३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. अटकेच्या निषेधार्थ आणि तीनपेक्षा जास्त व्यक्तींच्या सभांना बंदी घालण्याच्या आदेशाचा अवमान करत १८ जुलै रोजी मडगाव येथे प्रभातफेरी झाली व लोहिया मैदानावर लोक प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र जमले.

म्हापसा बैठकीत श्रीकांत साहूकर, प्रभाकर दलाल, मुकुंद गावकर आणि शिवाजी डाकेरकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांची दडपशाही सुरू असतानाही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मडगाव, सावर्डे, काकोडा आणि जांबावलीमध्ये सभा, बैठका सुरूच होत्या.

११ ऑगस्ट रोजी गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये लिहिले, लोहियाचे राजकारण माझ्यापेक्षा वेगळे असले तरी, गोव्याला गेल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो’. १८ ऑगस्ट रोजी गोव्यातील शेकडो कामगार लोंढा येथे गेले. लोहिया नेपाळमधील राजकीय चळवळीत व्यग्र असल्याने त्यांनी त्यांचे सहकारी अशोक मेहता यांची नियुक्ती केली.

लोंढा येथे दोन मतप्रवाह पाहायला मिळाले : एक मतप्रवाह गोवामुक्तीसाठी थेट कारवाई करावी, असा होता; तर दुसरा मतप्रवाह भारत सरकारकडून मदतीची वाट पाहावी, असा होता. मतभेद मिटले आणि राष्ट्रीय कॉंग्रेस (गोवा) अस्तित्वात आली. यावेळी डॉ. रामा हेगडे, लक्ष्मीकांत भेंब्रे, डॉ. नारायण भेंब्रे, इवाग्रिओ जॉर्ज, नीळकंठ कारापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

१८ सप्टेंबर रोजी लक्ष्मीकांत भेंब्रे यांनी सत्याग्रह केला आणि त्यांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्याच दिवशी लोहिया यांनी आपला दुसरा गोवा दौरा जाहीर केला. प्रत्येक गोमंतकीय पुरुषाला भरावा लागणाऱ्या लष्करी करावर त्यांनी टीका केली.

२८ सप्टेंबर रोजी ते गोव्यात दाखल झाले आणि लागलीच कुळे येथील रेल्वे स्टेशनवर त्यांना अटक करण्यात आली. या दिवशी मडगावमध्ये पोलिसांनी ५ हजारांहून अधिक लोकांच्या जमावावर लाठीचार्ज केला. लोहिया यांना आग्वाद तुरुंगात ठेवण्यात आले होते.

गोव्याच्या मुख्य न्यायमूर्तींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लोहिया यांनी गोव्याच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्यामुळे त्यांना बेकायदेशीर तुरुंगवासासाठी पोर्तुगीज सरकारने माफी मागावी अशी मागणी केली. २ ऑक्टोबर रोजी पोर्तुगिजांनी लोहिया यांना गोव्यातील ब्रिटिश वाणिज्य दूताच्या उपस्थितीत सीमेवर सोडले आणि पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्या पुन्हा प्रवेश करण्यावर बंदी घातली.

लोहिया यांना गोव्यात येण्यावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ फोंडा, डिचोली, मडगाव, काणकोण येथे निषेध सभा घेण्यात आल्या. जरी लोहियांना गोव्यात येण्यास बंदी घालण्यात आली होती तरीही गोव्याच्या सीमावर्ती भागात त्यांच्या सभा, बैठका सुरूच होत्या. बेळगावच्या टिळकवाडी येथील डॉ. डी. जी.नाईक यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीला २०० हून अधिक कामगार उपस्थित होते.

जॉर्ज वाझ, मनोहर प्रभुदेसाई, नानासाहेब गोरे, अच्युत पटवर्धन, अशोक मेहता हे या बैठकीला उपस्थित होते. लोहिया यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या ८, १८ आणि २८ तारखेला टप्प्याटप्प्याने सत्याग्रह सुरू करण्यासाठी लढाऊ समित्या स्थापन करण्याची शिफारस केली. अनेकांनी प्रतिसाद दिला. डॉ. हेगडे यांनी १८ ऑक्टोबर रोजी मडगाव येथे, १८ नोव्हेंबरला मनोेहर प्रभुदेसाई यांनी चावडीत, साखळीत जॉर्ज वाझ यांनी, कुंकळ्ळीत ई. जॉर्ज यांनी, केपे येथे भेंब्रे यांनी, पणजीमध्ये लक्ष्मीकांत सरदेसाई यांनी, व्यंकटेश वेर्णेकर यांनी फोंडा येथे आणि डिचोलीत विनायक मयेकर यांनी सत्याग्रह केला. या सर्वांना तुरुंगवास किंवा हद्दपारीची शिक्षा भोगावी लागली.

लोहिया यांनी पोर्तुगीज विरोधाची मशाल कारवार, रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, नंदगड, हल्याळ, येलापूर आणि कुमठा येथे नेली. लोहिया यांनी सीमावर्ती गावात बंदी तोडून गोव्याच्या प्रदेशात प्रवेश करत, सभा-बैठका घेत आणि लवकरच निघून जात असत.

अनेकदा गोव्यातील लोक डोंगर आणि जंगलातून गुप्त मार्ग वापरून गोव्याबाहेरील सभांना उपस्थित राहत असत. गडहिंग्लज, सातार्डा, आरोंदा, बांदा येथे अधिक सभा झाल्या. लोहिया यांनी वेंगुर्ला, शिरोडा, कणकवली, कुडाळ आणि आंबोली येथे जनसभांना संबोधित केले. या सर्व बैठकांमध्ये स्वयंसेवक सत्याग्रह करण्यासाठी पुढे आले आणि या आंदोलनासाठी निधी गोळा करण्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर लोहिया यांनी ९ जानेवारी आणि १८ जून १९४७ रोजी मुंबईतील जिना हॉल येथे सभांना संबोधित केले. लोहिया यांनी चतु:सूत्री कार्यक्रम सांगितला :

१. गोव्यातील मागासलेल्या भागांचे उत्थान करण्यासाठी

२. स्वयंपाकी, वाकनीस आणि शिंपी म्हणून काम करणाऱ्या सर्वांसाठी शिक्षण

३. सर्व रचनात्मक उपक्रमांचे समन्वयन साधण्यासाठी संघटना तयार करणे

४. स्वयंसेवी संस्था.

लोहिया यांनी १९ जानेवारी १९४८ रोजी फोर्ब्स हॉलमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस (गोवा)च्या सभेला संबोधित केले. त्याच वर्षी १ जून रोजी त्यांनी एक प्रेस स्टेटमेंट जारी केले आणि त्याच वर्षी त्यांनी गोव्यात व्यक्तिस्वातंत्र्यांची गळचेपी होत असतानाही कारवाई करण्यास नकार देणाऱ्या यू. एन. आणि त्यांच्या मानवी हक्क आयोगावर टीका केली.

१८ जून १९४६ हा केवळ एक दिवस नव्हता, तर चार शतकांहून अधिक काळ पारतंत्र्यात सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीची ज्योत पेटवली. हीच ज्योत घेऊन असंख्य देशभक्त निघाले. त्यांनी तुरुंगवास भोगला, प्राणांची आहुती दिली आणि हा गोवामुक्तीचा क्रांतियज्ञ धगधगत ठेवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com