Blog: खांडोळ्याचा महागणपती

फोंडा तालुक्यातल्या खांडोळा गावात महागणपतीचे मंदिर गेल्या सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक कालखंड उभे आहे.
Khandola Mahaganpati
Khandola MahaganpatiDainik Gomantak

राजेंद्र केरकर

फोंडा तालुक्यातल्या खांडोळा गावात महागणपतीचे मंदिर गेल्या सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक कालखंड उभे आहे. तेथील गर्भगृहात दर्शनी मूर्तीच्या मागे उजव्या बाजूला जी मूर्ती आहे, तिच्याशी शेकडो वर्षांच्या इतिहास आणि संस्कृतीची परंपरा संबंधित आहे.

१९६९साली जेव्हा या ऐतिहासिक मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला, तेव्हा प्रत्यक्ष देवाने भक्तांच्या स्वप्नी प्रकट होऊन आपली स्थापना मुख्य मूर्तीच्या मागे करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार नव्या गणपतीच्या पाषाणी मूर्तीच्या मागे ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे.

Khandola Mahaganpati
Flower Rate Rises: गोव्यात चतुर्थीनिमित्त फुलांना मागणी वाढली, दरही चढे

मांडवी नदीकिनारी वसलेला पूर्वाश्रमीचा खांडोळा गाव कृषी आणि बागायती पिकांची समृद्धी अनुभवत आलेला आहे. कष्टकरी जाती जमातींचे वास्तव्य इथे आहे. एका बाजूला मांडवीचा भरती ओहोटीचे नैसर्गिक चक्र अनुभवणारा किनारा, तर गावातल्या छोट्या मोठ्या टेकडी आणि पठारावरून प्रवाहित होणारे असंख्य छोटे ओहळ, निर्झर यामुळे ‘सुजलाम्’ असलेला हा गाव ‘सुफलाम्’तेचा वारसा मिरवत आलेला आहे.

मृण्मयी रूपातली सातेरी आज देवी शांतादुर्गा ग्रामदेवी म्हणून पुजली जात आहे. या गावात तिसवाडी आणि बार्देशातल्या जुन्या काबिजादीतली दैवते पोर्तुगीज अमदानीत येऊन स्थायिक झाली आणि खांडोळ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.

पावसाळ्यात सर्द शेतजमिनीबरोबर खाजनातल्या खारभूमी क्षेत्रात क्षारतेशी संघर्ष करत चवदार तांदळाच्या गोट्याची निर्मिती इथल्या कष्टकऱ्यांनी केलेली आहे. हिवाळ्यात वायंगणी भातशेतीबरोबर भाजीपाला, कडधान्ये, कांदा, मिरची यांची मुबलक पैदास करून खांडोळ्याला ‘अन्नदाता गाव’ म्हणून नावलौकिक मिळवून दिला होता. त्यामुळे धनधान्याची सुबत्ता मिरवणाऱ्या खांडोळ्यात महागणपतीचे झालेले आगमन सुखदायक ठरले होते.

वर्षाचे बारा महिने हिरव्यागार वृक्षवेलींचे वैभव लाभलेला खांडोळा गाव तिसवाडी, बार्देश महालात ख्रिस्तीकरणाच्या छळवादाची शिकार ठरलेल्या लोकांना आश्रयस्थान झाला होता. घरदार, शेतीवाडी, धार्मिक आणि सांस्कृतिक संचिते हरवून नैराश्याच्या गर्तेत फसलेल्या लोकांसाठी आनंदवर्धक ठरला होता.

स्वधर्म, स्वाभिमान यांचा त्याग करून, ख्रिस्तपंथाची दीक्षा घेऊन ज्यांनी आपण पोर्तुगिजांचे मिंधे होण्यास मान डोलावली, त्यांना राज्यकर्त्यांनी शेतजमिनीच्या मालकी दिल्या. विरोध करणाऱ्यांना अत्यंत क्रूरपणे हालअपेष्टांना समोर जाण्यास भाग पाडले होते. त्यामुळे महागणपतीचे संस्थान खांडोळ्यात शांतादुर्गा, रवळनाथ, लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण आदी दैवतांसह लोक इथे स्थानापन्न झाले.

Khandola Mahaganpati
Ganesha Temple: चोहोबाजूंनी कुळागारांनी वेढलेला तळ्यातला गणेश

आदिलशाही, शिवशाही आणि त्यानंतर मराठ्यांचे मांडलिक असणाऱ्या सौंदेकरांच्या सत्तेखाली असणाऱ्या खांडोळ्यात हिंदू धर्मीयांना आश्रय लाभला. त्यामुळे, महागणपती गोवाभरातल्या गणेशभक्तांसाठी श्रद्धा केंद्र ठरला आणि त्याच्या कृपासावलीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांनी धन्यता मानली.

चौदाव्या शतकात बहामनी साम्राज्यात जेव्हा मूर्तिभंजकांनी उच्छाद मांडला, तेव्हा तिसवाडीतल्या एळा येथे असलेल्या गणपतीच्या देवालयातली मूर्ती भाविकांनी मांडवी नदीच्या पाण्याने चोहोबाजूने वेढलेल्या दीपवती बेटावरच्या नावेली गावात आणून सुरक्षित स्थळी ठेवली. विजयनगर साम्राज्यातल्या माधव मंत्री यांनी गणपतीच्या मंदिराची उभारणी इथे केल्याचे सांगण्यात येते.

१५१०साली जेव्हा तिसवाडी आंफोस द आलबुकर्कने जिंकून घेतली तेव्हा त्याने मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आढळत नाही. परंतु त्याच्या मृत्यूनंतर मात्र ख्रिस्तीकरणाची प्रक्रिया अगदी सक्तीने राबवण्यासाठी आणि ख्रिस्ती झालेल्यांचे भारतीय धर्म आणि संस्कृतीपासून समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने इन्क्विझिशन संस्था अस्तित्वात आली. त्यांनी दीपवती बेटावरती मंदिरे पाडून, हिंदू देवदेवतांच्या एकापेक्षा एक सुंदर आणि मूल्यवान मूर्तींची तोडफोड आरंभली.

दि. ६ जानेवारी १५१५ रोजी आंद्रिया कोरिया यांनी आपल्या पत्रात पोर्तुगिजांनी दिवाडी बेटावरचे उद्ध्वस्त केलेले मंदिर लक्षणीय कलाकुसरीने युक्त आणि निर्दोष शिल्पकलेच्या नमुन्यांनी युक्त असल्याचे म्हटले आहे. दिवाडी येथील सेर्रा चर्चमध्ये मंदिराचे जे भग्न जीर्णावशेष आढळले होते, त्याच्यावरून मंदिराच्या भव्यतेची कल्पना येत असल्याचे म्हटले होते.

दि. १५ ऑगस्ट १५६० रोजी दिवाडी बेटावरच्या १,५१० जणांना सक्तीने ख्रिस्तपंथाची दीक्षा घेण्यास भाग पाडले. त्यावेळी किंवा त्याच्यापूर्वी नावेली येथील महागणपतीच्या संस्थानाचे स्थलांतर फोंडा तालुक्यातल्या खांडेपार गावात करण्यात आले.

परंतु कालांतराने ताळगावात स्थायिक झालेल्या नावेलकर गणेशभक्तांनी महागणपतीच्या मूर्तीचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ते खांडेपार येथे आले आणि तेथील खांडेपारकरांना कोणतीच कल्पना न देता दिवाळीच्या दिवशी मूर्ती जहाजात घालून गुपचूप नेली. याचा सुगावा जेव्हा खांडेपारकरांना लागला, तेव्हा ते मोठ्या शिताफीने पाठलाग करत आले.

त्यावेळी नावेलकर बाणस्तार येथे ही मूर्ती पुढे नेण्याच्या तयारीत असताना खांडेपारकरांना दृष्टीस पडले आणि दोन गटात भांडणतंटा झाला. शेवटी गणपतीची मूर्ती डिचोलीतल्या नार्वे गावात ठेवण्यावर एकमत झाले. कालांतराने जेव्हा खांडोळा येथील ग्रामसंस्थेने महागणपती संस्थानला १७४९साली भूमी देण्याचे निश्‍चित केले तेव्हा हे मंदिर खांडोळ्यात बांधण्यात आले.

दि. ३१ जानेवारी १९६९ रोजी गोवा मुक्तीनंतर भाविकांनी महागणपतीची नवीन पाषाणी मूर्ती तयार करून, तिची स्थापना केली आणि जुन्या मूर्तीचे तलावात विसर्जन करण्याचे ठरवले. परंतु मंदिराच्या भाविकांच्या स्वप्नात देवाचे दर्शन देऊन म्हणे जुनी मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्याची इच्छा प्रकट केली.

त्यामुळे ही मूर्ती आजही सुस्थितीत असलेली पाहायला मिळत आहे. गोव्यातल्या धार्मिक विध्वंसाच्या कारकिर्दीत तिसवाडीतल्या एका गावातले गणेशभक्त कर्नाटक राज्यातल्या भटकळ येथील शिराळीत सुमारे ४०० वर्षांपूर्वी स्थलांतरित झाले आणि तेथे महागणपतीसह महामायेच्या मूर्तीची स्थापना केली.

आज शिराळी येथे असलेले महागणपती संस्थान, तेथे स्थायिक झालेल्या मूळ गोमंतकीय गणेशभक्तांसाठी श्रद्धास्थान ठरलेले आहे. असे असले तरी खांडोळा येथे असलेले महागणपती संस्थान गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य प्रांतात विखुरलेल्या गणेशभक्तांसाठी आकर्षण बिंदू ठरलेले आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार असणारी येथील महागणपतीची मूर्ती देवत्वाबरोबर दिव्यत्वाचा आणि श्रद्धा अभिवृद्धीचा मानदंड ठरलेली आहे.

मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करताना, गोव्यात जुन्या मूर्तीचे विसर्जन करण्याची जी परंपरा आहे, तिला गणपतीने स्वप्नात येऊन मूर्तीची स्थापना करताना, जुन्या मूर्तीला कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्याकारणाने, या मूर्तीचे मंदिर व्यवस्थापन समितीने संवर्धन केले आहे. नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर, खरे तर जुन्या, भग्न मूर्ती पुरातत्त्व, खात्याकडे सुपूर्द करण्याची नितांत गरज असते.

त्यामुळे इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व अभ्यासक, संशोधकांना अशा मूर्तीशी निगडीत कला, कौशल्य आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यास साहाय्य होत असते. खांडोळा महागणपती संस्थानात शतकोत्तर इतिहासाचा वारसा सांगणारी मूल्यवान मूर्ती आज संरक्षित असल्याकारणाने तिच्या वैभवाचे दर्शन घेणे शक्य झाले आहे. मानवी जीवनात लोकधर्मातून जी संचिते कालांतराने दैवते म्हणून नावारूपाला आली,त्यांनी त्यांची सांस्कृतिक जडणघडण समृद्ध करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com