Goa Ganesh Chaturthi: पन्नास वर्षांपूर्वीची गणेशचतुर्थी

गणपतीची खोली शेणाने सारवणे, त्याला ठेवण्याचा बाक वा टेबल धुऊन साफ करणे, माटोळीसाठी छताला दोऱ्या बांधणे ही कामे रात्रीच्या फावल्या वेळेत केली जायची.
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiDainik Gomantak

प्रमोद प्रभुगावकर

दीड दिवसाच्या गणपतीनंतर शनिवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. आता क्रमाक्रमाने सात, नऊ व अकरा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांचे बाप्पा आपल्या घरी रवाना होतात व त्यानंतर 21 दिवसांचे मोजकेच उत्सव राहतात.

खरे तर पाच, सात नऊ दिवसांचे गणपती हे खासगी म्हणजे घरगुती असतात, तर अकरा दिवसांचे सार्वजनिक वा अधिकतम पोलीस स्टेशनवरील असतात. केवळ गोवाच नव्हे तर संपूर्ण कोकण पट्टीतील गणेचतुर्थी हा सर्वांत मोठा व उत्साहाने भरलेला उत्सव असतो व हा उत्साह वर्षागणिक वाढताना दिसत आहे.

विशेषतः गोवा मुंबई मार्गावरील वाहनांच्या लांबलचक रांगा तसेच गोव्याकडे सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांत होणारी वाढ त्याची प्रचिती आणून देत असते. चाकरमाने चतुर्थीची तयारी कित्येक महिन्याआधीपासून करत आलेले असतात. त्यावरून चतुर्थी सण लोकांच्या हृदयाशी जोडलेला असतो हेच स्पष्ट होते.

गोव्यातसुद्धा या उत्सवाच्या काळात गावागावांत संचारलेला उत्साह तेच दाखवत असतो. एरवी कामधंद्यानिमित्त परगावात म्हणजे गोव्याच्या विविध भागांत असलेली कुटुंबे या सणासाठी दोन दिवस अगोदर घरी परतत असतात व त्यामुळे एरवी असलेली स्मशानशांतता जाऊन गजबज सुरू झालेली पाहायला मिळते.

आठवडाभर ही गडबड पाहायला मिळते व नंतर सारा ग्रामीण भाग पुन्हा नीरव शांततेत जात असतो. पण या उत्सवकाळांत तयार झालेली ऊर्जा गावकऱ्यांना तसेच उत्सवानिमित्त गावात आलेल्यांना वर्षभर म्हणजेच पुढील वर्षांतील गणेशचतुर्थीपर्यंत पुरत असते हा आजवरचा अनुभव आहे.

पण घरगुती असो वा सार्वजनिक असो, या उत्सवांत आता एक प्रकारचा कृत्रिमपणा आलेला जाणवतो. उत्सवाची तयारी असो वा अन्य कार्यक्रम असोत, त्यात हा कृत्रिमपणा दिसतो. मला माझे बालपण आठवते. साधारण 65-70च्या दशकांतील या उत्सवाचे स्वरूपच वेगळे होते. प्रत्येक जण त्यात झोकून देत असे.

त्यावेळी आजच्यासारखी आरास वा माटोळी वा देखावा स्पर्धा नसायच्या की सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रस्थही नव्हते. पण या उत्सवाची तयारी प्रत्येक घरांत आत्मीयतेने केली जायची. नारळी पौर्णिमा म्हणजेच ‘सुतापुनव’ झाली की प्रत्येक घरांत ‘चवथीच्या वज्या’ची तयारी सुरू व्हायची व गोकुळाष्टमी झाली की चतुर्थीसाठी साफसफाईची लगबग व्हायची.

गणपतीची खोली शेणाने सारवणे, त्याला ठेवण्याचा बाक वा टेबल धुऊन साफ करणे, माटोळीसाठी छताला दोऱ्या बांधणे ही कामे रात्रीच्या फावल्या वेळेत केली जायची. त्या काळात गावांत वीज पोहोचली नव्हती व कंदिलाचा प्रकाश त्यासाठी चालायचा.

गणपती व गौरी महादेवासमोर लावायचे तेलाचे दिवे, समया घासून पुसून लखलखीत करण्याचे कामही व्हायचे. मला आठवते की आमच्या गणपतीच्या खोलीला एक लहानशी खिडकी होती व ती बंद केली तरी दाराला एक खाच होती व त्यावर शेणाने कागद लावून ती बंद केली जायची यावरून त्या वेळच्या एकंदर स्थितीची कल्पना यावयाची.

गणपती तसेच गौरीच्या पत्री जमविणे ही आम्हा मुलांसाठी त्यावेळी पर्वणी असायची. त्यावेळी चतुर्थीला आजच्याप्रमाणे आठवडाभर शाळेला सुट्टी नसायची, की बाजारात तयार पत्री मिळत नसे, त्यामुळे तृतीयेच्या दिवशी लवकर उठून आम्ही पत्री गोळा करायला जायचो.

त्यातही अधिक पत्री व फुले जमविण्यासाठी आम्हा मुलांत स्पर्धा असायची. वाघचाफा तसेच कवासा मिळणे हे त्यावेळी महत्प्रयासाचे असायचे. पत्रीप्रमाणेच माटोळीसाठी विविध रानटी फळे जमविण्यावर आम्हा मुलांचा भर असायचा. एरवी आम्ही भुकेने तळमळायचो, पण चतुर्थीच्या दिवसात ती जाणवायची नाही. कारण वेगवेगळे पदार्थ त्या दिवसात मिळायचे.

Ganesh Chaturthi
Reservation for women: 33 टक्के आरक्षण ही महिलांसाठी मोठी उपलब्धी

आमच्याकडे माझे काका पूजा करायचे. त्यांच्याकडे जवळच असलेल्या आमच्या पुरुषाच्या देवळातील पूजेचे कामही होते, त्यांची काम करण्याची पद्धत संथ होती, त्यामुळे ते ती पूजा आटोपून दुपारी एक वाजेपर्यंत घरी यायचे व त्यानंतर घरात पूजेला सुरुवात व्हायची.

त्यामुळे आम्हांला त्या दिवसांत दुपारच्या जेवणाला तीन ते साडेतीन वाजत. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी आमची जेवणे चालू असताना लोक गणपती पाहायला येत. त्या काळात अशी एक पद्धत होती की त्या दिवशी प्रत्येकाने किमान पाच गणपतींचे दर्शन घ्यायला हवे.

त्यामुळे दुपारचे भोजन आटोपले की प्रत्येक जण दर्शनासाठी बाहेर पडत. माझे आजोळ गावातच, पण पाच कि.मी. अंतरावरील पेडे येथे व मी माझ्या सवंगड्यांबरोबर तेथे हमखास जायचो. वाटेतील सर्व घरांत, निदान परिचयाच्या घरांत आम्ही जायचो. जाताना फटाक्यातील फटाकड्या सोडवून उदबत्तीच्या आधारे त्या पेटवायची मजा अनुभवत असू.

ते दिवसच वेगळे होते! एकदा तर आम्ही पेड्याला जाताना घाणड्याबांध येथील साकवावरून जाण्याचे धाडस केले व वडीलधाऱ्यांची बोलणी खाल्ली. कारण त्या साकवाला धरण्याचे साधन (धरणे)नव्हते. त्यामुळे त्यानंतर पेड्याला भेट देण्यावर बंदी आली.

त्या काळात आजच्यासारखे मुलांना जास्त फटाके मिळत नसत. आमच्या घरी तर चतुर्थीला एक, पंचमीला दोन व विसर्जनाला एक मिळून चार फटाके व चंद्रज्योतीची एक पेटी मिळत असे.

त्यामुळे विसर्जनावेळी देवळात जी आतषबाजी चाले त्यावर आम्ही समाधान मानत असू! आणखी एक आठवण म्हणजे आमच्या घराकडे वळणावर एक जुना रोडरोलर होता, सुट्या केलेल्या फटक्याचे एकेक नग आम्ही पेटवून त्यात टाकत असू त्याचा बॉंबसारखा आवाज येई.

त्याचप्रमाणे भोक असलेल्या नारळाच्या करवंटीखाली फटका पेटवून सोडला की फटक्याच्या धक्क्याने ती उंच उडत असे व त्याचा आनंद अनुभवत असू. त्यावेळी बव्हंशी दीड दिवसांचा गणपती असे व पंचमीच्या दिवशी दिवस मावळण्यापूर्वी उत्तरपूजा करून विसर्जनासाठी मंदिराकडे मिरवणुकीने वाड्यावरील गणपती नेत.

Ganesh Chaturthi
Goa Garbage Issue: दवर्लीत कचऱ्यावरून नागरिकांत नाराजी

लवकर विसर्जन करण्याचे कारण म्हणजे त्यावेळी वीज नव्हती. आज मध्यरात्रीपर्यंत विसर्जन चालते व दारूकामाची आतषबाजीही होते, पण त्या वेळच्या त्या चतुर्थीची मजा आज येत नाही. कारण त्यात आलेला कृत्रिमपणा. सणासाठी मंडळी गावात येतात पण प्रत्येक जण आपणाला घरांत कोंडून घेऊन बसलेला दिसतो.

येताना सगळ्या तयार वस्तू घेऊन येत असल्याने त्या गोळा करण्यात वा जमविण्यात येत असलेली मजा चाखण्याची संधी कोणाला मिळत नाही. कधी एकदा सण संपणार व आपण कामाच्या ठिकाणी जाणार याचीच हुरहुर लागलेली असल्याने चतुर्थीतील मजाच हरवलेली दिसते.

हे असेच चालू राहिले तर आणखी काही वर्षांनी नव्या पिढीने, ‘हे वृक्ष कशाचे?’ असे चतुर्थीसंदर्भात म्हटले नाही म्हणजे मिळवले!

Ganesh Chaturthi
Panaji Dengue Cases: सावधान! पणजीत वाढताहेत डेंग्यूचे रुग्ण; खबरदारी घेण्याचे आवाहन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com