Gomantak Editorial: नवा अंक, कथा तीच

ज्या लष्कराच्या कुबड्यांवर पाकिस्तानचे पंतप्रधानपद क्रिकेटपटू इम्रान खान यांनी संपादले, त्याच्याशीच पंगा घेतल्यामुळे ते तुरुंगाची हवा खात आहेत.
Gomantak Editorial
Gomantak EditorialDainik Gomantak

Gomantak Editorial: पाकिस्तानात चालते ती लष्कराची सत्ता आणि मर्जी! लष्कराच्या इच्छेवर तेथील लोकशाही तरते आणि गुंडाळलीही जाते. ज्या लष्कराच्या कुबड्यांवर पाकिस्तानचे पंतप्रधानपद क्रिकेटपटू इम्रान खान यांनी संपादले, त्याच्याशीच पंगा घेतल्यामुळे ते तुरुंगाची हवा खात आहेत.

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा, अप्रामाणिकपणाचा आरोप आहे. त्यांचे दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानात जल्लोषात स्वागत झाले. एवढेच नव्हे तर चार आठवड्यांकरता परदेशात उपचारासाठी गेलेले शरीफ चार वर्षांनंतर खास विमानाने मायदेशी आल्यानंतर कायदेशीर सोपस्कार ‘इतमामात’ पार पडले.

त्यांना अटकेपासून २४ ऑक्टोबरपर्यंत संरक्षणही मिळाले. त्यामागे मोठा ‘संरक्षक हात’ निश्‍चितच असणार! लष्कराच्या पाठबळावर सत्तेवर येऊ पाहणारा पाकिस्तानातील प्रत्येक नेता आधीच्या लोकांनी देशाची वाट कशी लावली, याचा पाढा वाचतो.

शरीफही त्याला अपवाद नाहीत. तेथील जनतेला एका भ्रमनिरासातून दुसऱ्या भ्रमनिरासाकडे असाच अनुभव गेली अनेक वर्षे घ्यावा लागत आहे. ‘‘पाकिस्तानचे अर्थकारण रसातळाला नेले, पाकिस्तानी नागरिकांचे जिणे हराम झाले, ते इम्रानखान यांच्यासारख्या राज्यकर्त्यांमुळे’’अशी टीका त्यांनी केली.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष क्लिंटन यांच्या पाच अब्ज डॉलरच्या आमिषाला ठोकरत पाकिस्तानी जनतेशी इमान कसे राखले, असे सांगत स्वतःची पाटी कोरी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्नही शरीफ यांनी केला. उपस्थितांना भावनिक साद घालत पकिस्तानी जनतेच्या हितासाठी झटण्याची ग्वाहीदेखील दिली.

पण शरीफ यांचे बंधू शाहबाज यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच पाकिस्तान मुस्लिम लीगचे (पीएमएल-एन) सरकार सत्तेवर असतानाच वेगाने अर्थव्यवस्थेची घसरण झाली व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी-शर्तींना शरण गेल्यावर अब्जावधीचे आर्थिक फेररचनेचे पॅकेज मिळाले, याचा त्यांना सोईस्कर विसर पडला.

पाकिस्तानचे तीनदा पंतप्रधानपद भूषवलेल्या शरीफ यांनी एकदाही मिळालेल्या सत्तेची मुदत पूर्ण करता आलेली नाही. ते २०१३मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण पनामा पेपर्स प्रकरणात बेहिशेबी मालमत्ता, बनावट कंपन्यांद्वारे गैरव्यवहार आणि परदेशात मालमत्ता जमावल्याच्या आरोपांनी त्यांचा पिच्छा पुरवला.

२०१७मध्ये ते सत्ताच्युत झाले. न्यायालयाने अप्रामाणिकपणाचा ठपका ठेवत निवडणूक लढवण्याला, सरकारी पद स्वीकारण्याला हयातभर मनाई केली. तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या. त्याला चुकवत ते दुसऱ्यांदा विजनवासात गेले. पाकिस्तानच्या राजकारणानेही आता कूस बदलली आहे.

शरीफ यांच्याच पीएमएल(एन) आणि कट्टर विरोधक बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार चालवले. आधीचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अविश्‍वास ठरावाने केवळ पाडले असे नाही, तर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांना तुरुंगातही पाठवले.

पाकिस्तानात येत्या जानेवारीत सार्वत्रिक निवडणुका आहेत. सध्या काळजीवाहू सरकार कामकाज पाहाते. हे पाहता पाकिस्तानच्या राजकीय रंगमंचावर नवाझ शरीफ यांची झालेली एन्ट्री अर्थपूर्ण आणि राजकारणाची दिशा सांगणारी आहे.

डोईजड व अडचणीत आणणारे इम्रान खान आणि लोकशाही, नागरी सत्तेचा पुरस्कार करणारे शरीफ या दोन ध्रुवांना पाकिस्तानी लष्कर हाताळत आहे. सध्या नवाझ शरीफ यांना बहुधा लष्कर चुचकारत असावे, असे दिसते. अर्थात, नवाझ शरीफ किंवा शाहबाज यांचे लष्कर आणि त्याच्या उच्चपदस्थांशी सौहार्दाचे संबंध असणे यात काही नवीन नाही.

Gomantak Editorial
Purple Fest 2024 : ‘पर्पल फेस्त’ 2024 नियोजनावर होणार चर्चा ; अमेरिकन रॅप गायक स्पर्श शहाची आज खास उपस्थिती

राजकीय भवितव्य न्यायालयाच्या हातात असताना पुन्हा राजकारण करणाऱ्या शरीफ यांना आरोपांची पाटी कोरी केल्याशिवाय गत्यंतर नाही. तथापि, ज्या पद्धतीने त्यांना दिलासादायक पावले न्यायव्यवस्थेने उचलली, त्यावरून आरोपांचे किटाळही दूर होईल, असे वाटते. तसे झाल्यास आगामी निवडणुकीत ते आणि त्यांचा पक्ष इम्रान यांच्या ‘पीटीआय’पुढे आव्हान उभे करू शकतो.

अशा स्थितीत बिलावल भुट्टो यांच्या ‘पीपीपी’ची भूमिका महत्त्वाची असेल. अर्थात, आजच्या घडीला ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. शरीफ यांच्या गैरहजेरीत पक्षसंघटन विस्कळीत झाले आहे. ज्येष्ठ नेते सोडून गेले आहेत. शाहबाज यांच्या सरकारने पाकिस्तानची दैना केली. नागरिकांचे जगणे यातनामय केले.

त्याची उत्तरे द्यावीच लागतील. शरीफ यांच्या काळात विकासदर ५.८टक्के आणि महागाईचा दर चार टक्के होता; आज ते अनुक्रमे दोन टक्के आणि ३१टक्के आहे. त्यामुळे अर्थकारणाचा गाडा रुळावर आणावा लागेल. त्यांच्या कारकिर्दीत अनेक पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले होते. जी-२०मध्ये पाकिस्तानच्या सहभागाची तयारी त्यांनी केली होती.

तथापि इतिहास उगाळून पाकिस्तानी नागरिकांचे हलाखीचे जीवनमान बदलणार नाही, त्यासाठी ठोस कृतिकार्यक्रम शरीफ यांना द्यावा लागेल. शिवाय, दहशतवादी कारवाया, बाँबस्फोटांची मालिका, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आव्हान आहे. शरीफ सातत्याने भारताशी सौहार्दाची, समन्वयाची भाषा करतात.

गेल्या महिन्यांतही त्यांनी भारताची वाटचाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रशंसोद्‍गार काढले होते. तथापि, यावेळचे शरीफ लष्कराच्या कृपेने पुन्हा राजकारण करू पाहात आहेत. त्यामुळे त्यांची हीच भूमिका जर ते सत्तेवर आले तर राहील का, हाही प्रश्‍न आहे.

Gomantak Editorial
Organ Donation: दातृत्वाला सलाम ! 'त्या' 5 जणांच्या निर्णयामुळे 19 जणांना जीवदान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com