Dabolim Airport : दाबोळीचा बागुलबोवा नेहमीचाच

Dabolim Airport : दाबोळीची मुख्य समस्या आहे ती म्हणजे तो चोवीस तास नागरीवाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही कारण तो नौदलाकडे असतो. त्यामुळे विमान कंपन्यांची अडचण होते पहाटे पासून सकाळी उशीरापर्यंत तो नौदलाकडे असल्याने त्या वेळेतील विमाने मोपाकडे वळवली जाऊ लागली आहेत.
 Dabolim  Airport
Dabolim AirportDainik Gomantak

प्रमोद प्रभुगावकर

गोव्यात या दिवसात पुन्हा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद होणार अशी हाकाटी पिटली जात आहे.

एरवी अशी भिती व्यक्त करून लोकांमध्ये विशेषतः दक्षिण गोव्यातील लोकांत अस्वस्थता निर्माण करणा-यांमध्ये विशिष्ट मंडळींचा समावेश असतो पण आता सरकारांतील एका जबाबदार मंत्र्यानेही त्यांत भाष्य केल्याने त्याला एक वेगळे परिमाण लाभलेले असून त्यामुळे या बंदची हाकाटी करणा-या मंडळींच्या हातात एक नवे कोलित मिळाले आहे.

मंत्री मॅाविन गुदिन्हो यांनी कुठेच सदर विमानतळ बंद होणार असे म्हटलेले नाही. पण मोपाची कंत्राटदार कंपनी जीएमआर केंद्र सरकारवर मोठ्या विमान कंपन्यांनी मोपावर स्थलांतर करावे म्हणून दडपण आणत असल्याचा आरोप केला आहे व ते प्रकार चालू राहिले तर भविष्यात दाबोळीवरील विमान वाहतुक घटेल व तो बंद पडण्यासारखी वेळ येऊं शकते अशी शक्यता व्यक्त केली आहे.

आता जीएमआर केंद्रावर कसे दडपण आणूं शकेल याचे स्पष्टीकरण मॅाविन हे सत्ताधारी भाजपचे मंत्री असल्याने त्या बाबत स्पष्टीकरण मागायला हवे कारण तसे पाहिले तर तो गंभीर विषय असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तो सरकारला अडचणीत आणणारा ठरूं शकतो.

आता मोपा विमानतळ सुरु झाल्यावर दाबोळीवरील वाहतुक व उलाढाल खरोखरच घटली आहे की काय याचाही मागोवा घेण्याची गरज आहे पण तशी कोणतीच तसदी न घेता एकेक नेतेमंडळी निवेदने करत सुटली आहे.

दाबोळी विमानवाहतुक सुत्रांनी मात्र तेथून होणारी विमान वाहतुक व प्रवासी वाहतुक अंशतः घटलेली असली तरी ती एकंदर वाहतुकीला धरून असल्याचे व त्यामुळे तो विमानतळ बंद केला जाणार ही भिती अनाठायी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे केंद्रीय विमानवाहतुक मंत्रालयाने दाबोळीबाबत वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाकडेही लक्ष वेधले आहे.

त्यामुळे निवडणुकांच्या वेळी दक्षीण गोव्यातील लोकांमध्ये चलबिचल निर्माण व्हावी म्हणून तर मुद्दाम दाबोळीचे पिल्लू सोडले जात नाही ना असा संशय येणाच जागा आहे. तसे पाहिले तर 2007 पासून प्रत्येक निवडणुकीत दाबोळीचा मुद्दा ऐरणीवर राहिला आहे.

चर्चिल सारख्यांनी तर खासदारकीचा राजिनामा देऊन विधानसभा निवडणूक लढविली त्यासाठी सेव्ह गोवा पार्टीची स्थापना केली व दोन आमदारही निवडून आणले पण नंतर काही त्या मुद्दयाचा पाठपुरावा केला नाही. त्याच काळांत दुस-या विमानतळा साठींच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. अर्थात त्यावेळी सतेवर असलेल्यांचा त्यात पुढाकार होता व त्यांत नंतर चर्चिल सहभागीही झाले.

त्यानंतर जीएफडीओ म्हणजे गोवन्स फॅार दाबोळी ओन्ली ही संघटना स्थापन झाली. फादर एरेमितो रिबेलो हेच तिचे सर्वे सर्वा होते .तिने अनेक वर्षे तो मुद्दा लढविला दरम्यानच्या काळात झालेल्या पंचायत ते विधानसभा या निवडणुकांत त्यांनी हिरीरीने तो विषय उपस्थित केला पण लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही व तो तसाच पडून राहिला.

दाबोळीचे महत्व तसे पाहिले तर दक्षिण गोव्यातील लोकांना होते पण त्याच बरोबर राज्याला वाढत्या विमानवाहतुकीमुळे राज्याला नव्या विमानतळाची गरज आहे हेही पटत होते व तेच कारण मोपाला समर्थन मिळण्यामागे.

मोपा बरोबर दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील काही जागा पाहिल्या गेल्या होत्या पण त्या सर्व निकषांना उतरल्या नाहीत व त्यामुळे शेवटी मोपावर शिक्कामोर्तब झाले व आता तो सुरु होऊन वाहतुकही सुरु झाली आहे. त्याचबरोबर दाभोळीही पूर्ण क्षमतेने सुरु आहे.

दाबोळीची मुख्य समस्या आहे ती म्हणजे तो चोवीस तास नागरीवाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही कारण तो नौदलाकडे असतो. त्यामुळे विमान कंपन्यांची अडचण होते पहाटे पासून सकाळी उशीरापर्यंत तो नौदलाकडे असल्याने त्या वेळेतील विमाने मोपाकडे वळवली जाऊ लागली आहेत.

त्याच प्रमाणे दाबोळीवर एकाचवेळी अधिक विमाने पार्क करून ठेवताही येत नाहीत त्यामुळेच कंपन्या मोपाला जर पसंती देऊ लागल्या असल्या तर त्यांत त्यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही असे असतानाही दिवसभारात जर दाबोळीवर जवळपास शंभर विमाने उतरत असतील तर ते चांगलेच म्हणावे लागेल.

दाबोळीवरील विमानांची संख्या घटली तर त्याचा दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल अशीही एक भिती पूर्वीपासून व्यक्त होत आहे. गंमतीची बाब म्हणजे ही भिती हॅाटेलवाले वा पर्यटन व्यावसायिक नव्हे तर राजकारणी व्यक्त करतात.

खरोखरच असा कोणताही परिणाम यापूर्वी झालेला असेल तर त्याला हीच मंडळी जबाबदार आहे. कारण साधारण दोन हजार पर्यंतच्या दशकात या लोकांच्या बळावर या व्यवसायात जो धुडगूस घालण्यात आला होता की त्यांमुळे पर्यटकांनी आपला मोर्चा उत्तरेकडे वळविला होता. टुरिस्ट टॅक्सी, टुरिस्ट बसवाले यांचीही त्यासाठी साथ होती हे यापूर्वी वेळोवेळी उघड झाले होते. त्यामुळे ते प्रकार टाळण्याची खरी गरज आहे.

केवळ दाबोळीच्या नावाने ठणाणा करून भागणार नाही आजही गोव्यात येथील निसर्ग सौंदर्याच्या आकर्षणाने येणा-या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होते अशा तक्रारी आहेत. त्यात केवळ हॅाटेले , टॅक्सी वा अन्य व्यावसायिकच केवळ नव्हे तर एरवी प्रवाशांसाठी पायघड्या घालणा-या विमान कंपन्याही असतात.

त्यामुळे ऐन सीजनला वा विकएंडला एरवी काही हजार रु. असलेल्या विमान कंपन्याच्या तिकिटा दहा ते बारा पटीने वाढलेल्या असतात खरे तर हे चुकीचे आहे .

तीच गोष्ट हॅाटेल खोल्यांची असते ही पर्यटकांची पर्यायाने ग्राहकांची लुबाडणूकच नव्हे का, पण त्याबाबत कोणीच आवाज उठविताना दिसत नाही. कारण दाबोळी बंद होण्याचा असो वा अन्य कोणताही मुद्दा यांना पडूनच गेलेला नसतो. त्यांना फक्त राजकारणात रस असतो.

दाबोळीवरील विमानांची संख्या घटली तर त्याचा दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल अशीही एक भीती पूर्वीपासून व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com