संसदेत (Goa Assembly Session) नुकतेच संमत झालेल्या नारळ उत्पादन (Coconut production) आणि गुणवत्तेच्या अभिवृध्दीसंदर्भातील कायद्याच्या मसुद्याचा गोव्याला नियोजनबद्धरीत्या लाभ करून देणे शक्य आहे. आज राज्यभर विकासाच्या गोंडस नावाखाली जे प्रयत्न केले जातात, त्याऐवजी येथील शेतकरी आणि बागायतदारांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि कायद्यांचा विनियोग करून दिला तर त्यामुळे भूमिपुत्रांचे (Bhumiputra) खऱ्या अर्थाने सशक्तीकरण शक्य आहे.
गोव्यातील किनारपट्टीवरची भूमी ही नारळ उत्पादनासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध असून, आज नानाविध संकटांच्या लाटेखाली येथील बागायतदार संघर्ष करत आहेत. त्यामुळे नवीन क्षेत्र नारळ लागवडीखाली आणण्यासाठी आणि बागायतदारांचे आर्थिक उत्पन्न वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध सुविधा पुरविण्याची उद्दिष्टे असलेला हा कायदा राज्याला लाभदायी होण्यास प्रामाणिक प्रयत्नाची नितांत गरज आहे.
भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण खात्यामार्फत केरळमधील कोची येथे १२ जानेवारी १९८१ रोजी नारळ विकास मंडळ कार्यान्वित झाले. बंगळुरू, चेन्नई आणि पाटणा येथे प्रादेशिक कार्यालये, तर भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद आणि पोर्टब्लेअर येथे राज्यस्तरीय कार्यालयांमार्फत हे मंडळ कार्यरत आहे. गोव्यातले सध्या २५,७३० हेक्टर क्षेत्रफळ नारळ लागवडीखाली असून, येथील सरासरी उत्पादन हेक्टरी ५७५० नग आहे. २०१६च्या आकडेवारीनुसार गोव्यात १२४ कोटी नारळाचे उत्पादन होत असताना, आजपर्यंत केंद्र सरकारतर्फे गोव्याला मंडळावर प्रतिनिधित्व आणि स्वतंत्र कार्यालय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत.
विविध उत्पादनांना मिळावे प्राधान्य
नारळ विकास मंडळातर्फे गोव्यात नव्या कायद्यानुसार लागू करण्यात येणाऱ्या योजना आणि सवलतींचा अधिकाधिक लाभ करून देण्याबरोबर येथील पारंपरिक लागवडीच्या तंत्रासोबत सेंद्रीय खताच्या वापरावर भर देण्याची गरज आहे. गोव्यातील नारळांचा वापर दैनंदिन स्वयंपाकाबरोबर तेल निर्मितीसाठी प्रामुख्याने केला जातो. खोबऱ्यापासून मिठाई, लाडू, कॅंडी आणि तत्सम खाद्यपदार्थांबरोबर गूळ, साखर, साबण आदी उत्पादनांना प्राधान्य देणे शक्य आहे. कोवळ्या नारळाचे पाणी, त्यातली मलई, गुळ-खोबरे यांच्या विक्री केंद्राची स्थापना करणेही शक्य आहे.
हस्तकला कारागिरांनाही मिळावे व्यासपीठ
पर्रा-म्हापसा येथील सिद्धहस्त कारागीर विजयदत्ता लोटलीकर यांनी नारळापासून तयार केल्या जाणाऱ्या खाद्यान्नांपासून विविधांगी कलाकृतींची माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. करवंटीपासून विलोभनीय समईची कल्पकपणे निर्मिती करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गोव्याला स्थान मिळवून देणाऱ्या या प्रतिभाशाली कारागिराच्या कलागुणांचा उपयोग करून घेण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणे शक्य आहे. वेलिंग गावातल्या शालिनी कांता गावडे यांच्यासारख्या प्रतिभाशाली हस्तकारागिरांची प्रतिभा उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.