संभाजी महाराजांचे धाडसी नेतृत्व

केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत संभाजी महाराजांनी त्यांचे कुशल नेतृत्व, जलद हालचाली आणि धाडसी स्वभावाने पोर्तुगीज व मोगल अशा दोन फौजांचा जबरदस्त पराभव करून संपूर्ण कोकण जिंकून घेतले.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj Dainik Gomantak
Published on
Updated on

सचिन मदगे

पोर्तुगीज- मोगल यांच्यात परस्पराना मदत करण्याविषयी तह झाला होता, पण पोर्तुगीजांचा मोगल किंवा मुसलमानांवर अजिबात विश्वास नहता. तेव्हा अगोदर व्हाईसरॉयने संभाजी महाराजांच्या राज्यातील असंतुष्ट वतनदारांना फितवले. त्यात लखम सावंत, केशव प्रभु, दुलबा नायक व सत्तरीचे राणे होते. उत्तरेत कुडाळपासून दक्षिणेत मिरजपर्यंतचे कोकण जिंकल्यानंतर ह्या प्रदेशाचे दोन भाग पाडून एक भाग पोर्तुगीजांना व एक भाग लखम सावंतांना देण्याचे ठरले होते. पेडण्याच्या केशव प्रभुने तर संभाजी महाराजांच्या राज्यांतल्या किल्ले, तोफा याविषयीची माहितीच पोर्तुगाीजांपर्यंत पोहोचवली होती. सत्तरीचे राणे अगोदरच पोर्तुगीज हद्दीतील कुंभारजुव्याला येऊन राहिले होते. फोंड्याचा दुलबा नायक आपल्या शिपायांसह दुर्भाट येथे येऊन मिळाला होता. बार्देशमधील रेवोडा - नादोडा येथील वतनदार राणे संभाजी महाराजांविरुद्ध लढताना कैद झाले होते. इतक्या वतनदारांचे सहकार्य मिळूनही पोर्तुगीजांचे कोकण जिंकण्याचे स्वप्न महाराजांच्या वेगवान हालचालींनी धुळीस मिळवले.

Chhatrapati Sambhaji Maharaj
लोणावळ्यातील ‘मम्मीज होमली फूड’

जुव्याच्या लढाईनंतर संभाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी तिथून माघार घेतली खरी, पण मोगली फौज अजूनही कोकणात पोहचली नसल्याने तोपर्यंत पोर्तुगीजांना अजून जेवढे चेपता येईल तेवढे चेपावे या उद्देशाने डिसेंबर १६८३च्या पहिल्या आठवड्यात बार्देश व सासष्टी या प्रदेशावर आपले पायदळ- घोडदळ पाठवून मडगाव कुंकळ्ळी, कोलवाळ, शापोरा हे किल्ले जिंकून घेतले. दोन्ही तालुक्यांत कुठेही पोर्तुगीजांच्या सैन्याने प्रतिकार केला नाही. पोर्तुगीजांनी तिसवाडी बेटाला आपल्याच नौदलाचा वेढा घालत बेटावर आश्रय घेतला. त्याशिवाय मुरगाव, आग्वाद व रेईश मागुश हे तीनच किल्ले पोर्तुगीजांनी राखले होते. मराठी फौजांनी सासष्टी व बार्देशमधील पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वास्तु ताब्यांत घेत लुटल्या आणि उद्ध्वस्त करून टाकल्या. अनेक पोर्तुगीजनिष्ठांना कैद केले. साष्टी व बार्देशमधील किल्ल्यावरील शेहेचाळीस तोफा, दारुगोळा व हत्यारे काढून आणली. महाराजांच्या या संकटामुळे व्हाइसरॉय हवालदिल झाला. खबरदारी म्हणून मौल्यवान वस्तु, बायका- मुलें यांची रवानगी मुरगावच्या किल्ल्यांत करून सकाळ- संध्याकाळ झेवियरच्या शवपेटीवर आपला राजदंड ठेवून संकट टळावे म्हणून प्रार्थना करत होता.

मोगलांची सेना डिसेंबरच्या शेवटी कोकणाच्या जवळ येत आहे हे पाहून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडे तहाची बोलणी सुरू केली. त्या शहजादा अकबर व दुर्गादास राठोडसाठी मोगलसेना येणार होती, त्या दोघांना संभाजी महाराजांनी सुरक्षित अशा सह्याद्रीच्या कुशीतल्या दुर्गम भागात, भीमगडाच्या जंगलात नेऊन ठेवले व जानेवारी १६८४च्या पहिल्या आठवड्यात संभाजी महाराज रायगडाकडे निघून गेले. ७ जानेवारी रोजी शहजादा मुअज्जम रामघाट उतरून १९ जानेवारी रोजी डिचोली येथे पोहोचला आणि फेब्रुवारी अखेरीस तो फौजेसह परतीच्या वाटेने रामघाटातूनच निघाला. या काळात संभाजी महाराज व मोगल यांच्यात एकही लढाई झाल्याची नोंद इतिहासाच्या कुठल्याही साधनात सापडत नाही. तरीही लाखोंच्या संख्येने आलेल्या मोगल सेनेतले अर्ध्याहून अधिक सैनिक या भागात मृत्युमुखी पडले. यामागे उपवास आणि रोगराई ही कारणे होती. संभाजी महाराजानी मोगलांची संभावना नक्की कशी केली होती, याविषयीचे ऐतिहासिक संदर्भ आज मिळत नसले तरी एक अंदाज करता येतो की त्यानी गोव्यातील डिचोली, सत्तरी तसेच महाराष्ट्रातील मणेरी (दोडामार्ग) हा भाग पूर्णतः रिता करत मोगल फौजेला तेथे खाण्यासाठीचे धान्य किंवा जनावरांना चारा मिळणार नाही याची तरतूद केली असावी. औरंगजेबाने या फौजेसाठी सुरतेवरून अन्नधान्याची गलबते पाठवली होती ती महाराजांच्या नौदलाने लुटली. त्यातील अवघी चार-सहा गलबते पोर्तुगीजांच्या हद्दीतील कायसूव बंदरात पोहोचली. परंतु महाराजांच्या भीतीने त्यातील थोडीच रसद मोगलांपर्यत पोहोचली. शहजादा मुअज्जमने पोर्तुगीजांकडे अन्नधान्य व पैसे मागितले तर व्हाईसरॉयन हात वर केले.

Chhatrapati Sambhaji Maharaj
करपली पोळी! देशात गहू निर्यातीचा मुद्दा बनला गहन

अन्नधान्याच्या टंचाईने सैनिक उपाशी मरू लागल्यामुळे मोगल फौज परत रामघाटमार्गे जाऊ लागली. त्याच वेळी फौजेत रोगराई पसरून अनेक सैनिक, हत्ती, घोडे पटापट मरू लागले. त्यातून जीव वाचवत शहजादा औरंगाबादला पोहोचला. गोव्यातून जाताना मात्र या हताश शहजाद्याने डिचोलीतल्या पिळगावातील श्रीरामाचे मंदिर फोडले व सप्तकोटेश्वराला उपद्रव केला तसेच डिचोली व बांदा ही दोन व्यापारी गावे जाळून टाकली.

नोव्हेंबर 1683 ते जानेवारी 1684 या दोन महिन्यांच्या कालावधीत संभाजी महाराजांनी त्यांचे कुशल नेतृत्व, जलद हालचाली आणि धाडसी स्वभावाने पोर्तुगीज व मोगल अशा दोन फौजांचा जबरदस्त पराभव करून संपूर्ण कोकण जिंकण्याने पोर्तुगीज व मोगलांचे स्वप्न चक्काचूर झाले.

9 नोव्हेंबर 1683 ते 1684 च्या जानेवारीतल्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने संभाजी महाराज गोव्याच्या आसपास त्यांच्या राज्यातल्या डिचोली, फोंडा येथे होते. या काळात महाराजांनी अनेक लोकोपयुक्त कामे केली. फोंड्याच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या युध्दांत आपण तेथील अब्दुल्ला खान पिराला नवस केल्यामुळेच जय मिळाला अशी महाराजांच्या सैन्याची भावना होती. तिचा मान राखत महाराजांनी पिराच्या दिवाबत्तीची आणि वार्षिकोत्सवाची तरतूद करणारी सनद दिली. फोड्याच्या मुक्कामी असताना व्यापारी तीम नायक व त्यांच्या मुलाने महाराजांकडे येऊन विनंती केली की पूर्वी मुसलमानांच्या राज्यात नदीच्या तरी पार करण्यासाठी कर नव्हता. राज्य हिंदू झाल्यापासून कर द्यावा लागतो व व्यापाऱ्यांचे नुकसान होते. महाराजांनी ती विनंती ऐकून कर माफ करण्याची आज्ञा केली. ही आज्ञा शिलालेखात कोरून हडकोळण - बाणस्तरीच्या नदीतीरावर बसवली. फोंड्यातील कोटाची जागा सुरक्षित नसल्याचे महाराजांच्या लक्षात आले आणि त्यानी कोट पाडून शहराच्या लगतच उंच टेकडीवर नवा गड बांधायचे आदेश देत त्याला मर्दनगड असे नावही दिले. या काळांत महाराजांचे अधिकारी लोकांचे प्रश्न कसे सोडवत होते, याची माहिती 'शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे' या स.शं.देसाई लिखित संदर्भ ग्रंथात मिळते.

पोर्तुगीजांच्या आशियातील इतिहासातला सर्वाधिक लाजीरवाणा पराभव प्रथमच गोव्यात संभाजी महाराजांमुळे स्वीकारावा लागला. या आक्रमणातून केवळ फ्रान्सिस झेवियरच्या मृत शरीराच्या कृपेने आपण वाचलो अशी पोर्तुगीज श्रध्दा झाली आणि तेथून पुढे फ्रान्सिस झेवियरच्या पार्थिवाचे महात्म्य वाढले. नव्याने येणारा पोर्तुगीज गव्हर्नर अथवा व्हाईसरॉय झेवियरच्या शवपेटीवर आपला राजदंड ठेवून त्यांची प्रार्थना करून कारभाराची सूत्रे हाती घेऊ लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com