प्राचीन वाकाटक राजवंश

वाकाटकची सत्ता दक्षिणोत्तर नर्मदेपासून तुंगभद्रा नदीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती ज्यात गोवा हे राजांच्या मांडलिकांमध्ये सामील होते.
goa
goaDainik Gomantak

सर्वेश बोरकर

वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते.

वाकाटक हे भगवान श्रीकृष्णांची पत्नी व विदर्भाची राजकन्या श्री रुक्मिणी मातेच्या वंशातील होते, इ.स. २५० ते सुमारे इ.स ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले.

वाकाटकची सत्ता दक्षिणोत्तर नर्मदे पासून तुंगभद्रा नदी पर्यंत आणि अरबी समुद्रा पासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती ज्यात गोवा हे राजांच्या मांडलिकांमध्ये सामील होते.राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात. या लेणींतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते.

वाकाटकांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल ते प्रसिद्ध आहे. वाकाटक राजे हे शिवोपासक होते, पण प्रभावती -गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.

वाकाटक राजवंशाचे नावही एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात आले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे,

अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरुवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे.

श्री विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. प्रवरसेन हा महापराक्रमी होता. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली.पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (इ.स २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते.

ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती.

हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता. दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता.

यमाळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली. विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागली.

तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) येथे असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंधनामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.

द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (इ.स. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.

नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्यभारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.

वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजयनामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (इ.स ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता.

त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ च्या सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com