ISL
ISL 
क्रीडा

ISL 2020-21 : जमशेदपूरच्या मोहिमेची विजयी सांगता

दैनिक गोमन्तक

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धातील तीन गोलच्या बळावर जमशेदपूर एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेची सांगता विजयाने केली. उत्तरार्धात उसळी घेतलेल्या बंगळूर एफसीला 3 - 2 असे निसटते हरवून जमशेदपूरने स्पर्धेच्या साखळी फेरीत सहावा क्रमांक मिळविला.

सामना गुरुवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. जमशेदपूरने पूर्वार्धात तीन गोलची आघाडी घेतली. नायजेरियन स्टीफन एझे याने 16 व्या, सैमिन्लेन डौंगेल याने 34 व्या, तर स्पॅनिश डेव्हिड ग्रांडे याने 41 व्या मिनिटास गोल केला. बंगळूरने उत्तरार्धात मुसंडी मारली. बदली बचावपटू स्पेनचा फ्रान्सिस्को गोन्झालेझ याने 62 व्या, तर 71 व्या सुनील छेत्रीने सुरेख हेडिंग साधले. छेत्रीचा हा बंगळूरतर्फे सर्व स्पर्धांत मिळून शतकी गोल ठरला.

जमशेदपूरचा हा 20 लढतीतील सातवा विजय ठरला. त्यांचे 27 गुण झाले. बंगळूरला 20 लढतीत आठवा पराभव पत्करावा लागला. माजी विजेत्यांचे 22 गुण व सातवा क्रमांक कायम राहिला. आयएसएल स्पर्धेत प्रथमच बंगळूरची इतक्या खालच्या क्रमांकावर घसरण झाली. मोसमात जमशेदपूरने बंगळूरवर सलग दुसरा विजय मिळविला.

सामन्याच्या पूर्वार्धात तीन गोल नोंदवत जमशेदपूरने बंगळूरच्या आव्हानाची हवाच काढून घेतली. पहिली गोल सेट पिसेसवर झाला. ऐतॉर मॉनरॉय याने बॉक्सबाहेरून मारलेल्या फ्रीकिक फटक्यावर स्टीफन एझे याचा हेडर अचूक ठरला. पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकनंतर जमशेदपूरच्या खाती आणखी एका गोलची भर पडली. फारुख चौधरीच्या असिस्टवर सैमिन्लेन डौंगेल याने मोसमातील पहिला वैयक्तिक गोल नोंदविला. यावेळी डौंगेल याने अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करताना बंगळूरचा बचावपटू अजित कुमार याला गुंगारा दिल्यानंतर गोलरक्षक लाल्थुआम्माविया यालाही हतबल ठरविले. विश्रांतीस चार मिनिटे बाकी असताना ऐतॉर मॉनरॉयच्या फ्रीकिकवर डेव्हिड ग्रांडे याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे आयएसएल स्पर्धेत प्रथमच जमशेदपूरला पूर्वार्धातील खेळात तीन गोलची आघाडी संपादन करता आली.

उत्तरार्धात बंगळूरने जोरदार पुनरागमन साधले. तासाभराच्या खेळानंतर फ्रान्सिस्को गोन्झालेझ याने पराग श्रीवास याच्या असिस्टवर बंगळूरची पिछाडी एका गोलने कमी केली. परागच्या थ्रो-ईनवर जमशेदपूरच्या बचावफळीस चेंडू रोखता आला नाही. बदली स्पॅनिश बचावपटूने समयोचित हेडिंग साधत गोलची नोंद केली. त्यानंतर नऊ मिनिटांनी हुकमी स्ट्रायकर सुनील छेत्रीने बंगळूरची पिछाडी दोन गोलने कमी करताना हरमनज्योत खब्रा याच्या असिस्टचा लाभ उठविला. छेत्रीचे दणकेबाज हेडिंग रोखणे जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याला शक्य झाले नाही.

दृष्टिक्षेपात...

- स्टीफन एझे याचे मोसमातील 20 सामन्यांत 4 गोल

- सैमिन्लेन डौंगेल याचा मोसमात 1 गोल, एकंदरीत 79 आयएसएल लढतीत 9 गोल

- डेव्हिड ग्रांडे याचे मोसमातील 6 लढतीत 3 गोल, एकूण 14 आयएसएल लढतीत 4 गोल

- फ्रान्सिस्को गोन्झालेझ याचा 18 लढतीत 1 गोल

- सुनील छेत्रीचे यंदा 20 लढतीत 8 गोल, एकंदरीत 94 आयएसएल सामन्यात 47 गोल, सर्वाधिक गोल करणाऱ्यांत दुसरा

- बंगळूर एफसीतर्फे सर्व स्पर्धांत मिळून सुनील छेत्रीचे 100 गोल

- जमशेदपूरचे स्पर्धेत 21, तर बंगळूरचे 26 गोल

- पहिल्या टप्प्यातही जमशेदपूरची बंगळूरवर मात (1-0)
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT