ISL 202021 Mumbai Citys weight in ISL playoff match heavy 
क्रीडा

ISL 2020-21: आयएसएल`च्या प्ले-ऑफ लढतीत मुंबई सिटीचे पारडे जड

गोमंतक वृत्तसेवा

पणजी ः संघातील दोघा प्रमुख खेळाडूंचे निलंबन, तसेच काही खेळाडूंच्या दुखापतीची चिंता यामुळे एफसी गोवा संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीचे खडतर आव्हान असेल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी होणाऱ्या लढतीत सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीचे पारडे जड राहील. निलंबन संपवून ह्युगो बुमूस परतणार असल्याने मुंबईच्या संघाची ताकद वाढणार आहे. दुसरीकडे निलंबनामुळे एफसी गोवा संघ हुकमी मध्यरक्षक आल्बर्टो नोग्युएरा व बचावपटू इव्हान गोन्झालेझ यांच्या सेवेस मुकेल. नोग्युएरा याने स्पर्धेत सर्वाधिक आठ असिस्ट नोंदविले आहेत. एफसी गोवा संघ यंदाच्या स्पर्धेत सलग 13 सामने अपराजित आहे, पण मुंबई सिटीविरुद्ध त्यांना पूर्ण ताकद पणास लावावी लागेल. आयएसएल स्पर्धेच्या सात मोसमाच्या इतिहासात एफसी गोवा सहाव्यांदा उपांत्य फेरीत खेळत आहे.

``आम्हाला स्वतःवर विश्वास राखत आणि नियोजनानुसार खेळावे लागेल. भावना, दबाव यावर नियंत्रण राखत मैदानावर उतरणे आवश्यक आहे. साहजिकच सामन्यातील निर्धारित 90 मिनिटांतील खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित राहील,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी गुरुवारी सांगितले. खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न आहेच, शिवाय दोन प्रमुख खेळाडू निलंबित असले, तरी संघ निवडताना अडचणी येतील असे वाटत नाही. उत्कृष्ट संघ मैदानात उतरविण्याचा प्रयत्न असेल, असे फेरांडो यांनी नमूद केले.

सर्जिओ लोबेरा हे एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक आहेत. या संघाच्या प्रशिक्षकपदावरून गतमोसमात डच्चू मिळाल्यानंतर या स्पॅनिश प्रशिक्षकाने मुंबई सिटीचे प्रशिक्षकपद यशस्वीपणे सांभाळत या संघाला लीग विनर्स शिल्डचे मानकरी बनविले, तसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठीही पात्रता मिळवून दिली. साखळी फेरी विजेतेपदानंतर आता लोबेरा यांचे लक्ष्य आयएसएल करंडकाचे राहील. स्पर्धेत सलग 12 सामने अपराजित राहिल्यानंतर मुंबई सिटीची कामगिरी घसरली, पण नंतर ओडिशा एफसीवर 6-1 व एटीके मोहन बागानवर 2-0 फरकाने विजय मिळवत मुंबई सिटीने लीग विनर्स शिल्डवर नाव कोरले. एफसी गोवाविरुद्धही हाच धडाका कायम राखण्याचे लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा निर्धार असेल. यंदाच्या मोसमात पहिल्या टप्प्यात इंज्युरी टाईम गोलमधील पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटीने एफसी गोवास नमविले, तर दुसऱ्या टप्प्यात एफसी गोवाने इंज्युरी टाईम गोल नोंदवून मुंबई सिटीस बरोबरीत रोखले होते.

दृष्टिक्षेपात...

- आमने-सामने ः 16 सामने, एफसी गोवा विजयी ः 7, मुंबई सिटी विजयी ः 5, बरोबरी ः 4

- यापूर्वी प्ले-ऑफ फेरीत ः 2018-19 मोसमात एफसी गोवा मुंबई सिटीविरुद्ध गोलसरासरीत 5-2 फरकाने विजय, मुंबई येथे एफसी गोवा 5-1 फरकाने, तर फातोर्डा येथे मुंबई सिटी 1-0 फरकाने विजयी

- यंदाच्या मोसमात ः 25 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे मुंबई सिटी 1-0 फरकाने विजयी, 8 फेब्रुवारी 2021 रोजी बांबोळी येथे एफसी गोवाची मुंबई सिटीशी 3-3 गोलबरोबरी

- साखळी फेरीत मुंबई सिटीचे 12, तर एफसी गोवाचे 7 विजय

- यंदा सलग 13 अपराजित लढतीत एफसी गोवाचे 5 विजय, 8 बरोबरी

- यंदा स्पर्धेत मुंबई सिटीचे सर्वाधिक 35, तर एफसी गोवाचे 31 गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT