I League
I League  
क्रीडा

I-League : आय-लीग विजेतेपदाची उत्कंठा वाढली

दैनिक गोमन्तक

पणजी : यावेळच्या आय-लीग फुटबॉल विजेतेपदाची उत्कंठा वाढली आहे. विजेता संघ आता स्पर्धेच्या शेवटच्या फेरीअंती निश्चित होईल. रविवारी कोलकाता येथे गोव्याचा चर्चिल ब्रदर्स आणि मणिपूरचा टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला, तर कल्याणी येथे गोकुळम केरळा एफसीने महम्मेडन स्पोर्टिंगला 2-1 फरकाने नमविले, त्यामुळे आता तीन संघ करंडकासाठी दावेदार आहेत.

चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ यांच्यातील बरोबरीनंतर या दोन्ही संघांचे समान 26 गुण झाले. गोकुळम केरळाचेही स्पर्धेतील आठव्या विजयामुळे 26 गुण झाले आहेत. शेवटच्या फेरीत येत्या शनिवारी (ता. 27) शेवटच्या फेरीत गोकुळम केरळासमोर ट्राऊ संघाचे आव्हान असेल, तर चर्चिल ब्रदर्स पंजाब एफसीविरुद्ध खेळेल. त्या लढतीनंतर 2020-21 मोसमातील आय-लीग विजेता संघ निश्चित होईल. गोकुळम केरळा व ट्राऊ संघाचा गोलफरक +11, तर चर्चिल ब्रदर्सचा गोलफरक +4 आहे.

कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर चर्चिल ब्रदर्सचा स्लोव्हेनियन आघाडीपटू लुका मॅसेन याने 28व्या मिनिटास पेनल्टी गोल केला, नंतर 43व्या मिनिटास कर्णधार के. फाल्गुनी सिंग याने ट्राऊ संघाला बरोबरी साधून दिली.

चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ संघातील पहिल्या टप्प्यातील सामनाही गोलबरोबरीत राहिला होता. एकंदरीत प्रत्येकी 14 लढतीनंतर या दोन्ही संघांची ही स्पर्धेतील पाचवी बरोबरी ठरली. चर्चिल ब्रदर्सला मागील दोन लढतीत अनु्क्रमे गोकुळम केरळा (0-3) व महम्मेडन स्पोर्टिंग (1-4) या संघाकडून हार पत्करावी लागली होती, त्यामुळे हा संघ दबावाखाली होता. रविवारी बरोबरीचा एक गुण मिळाल्यामुळे आय-लीगमधील तिसऱ्या विजेतेपदाच्या त्यांच्या आशा कायम राहिल्या.

संधी गमावल्या

चर्चिल ब्रदर्सने सुरवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास मॅसेन याचा नेम चुकल्यामुळे गोव्यातील संघाला आघाडी मिळू शकली नाही. सामन्याच्या 19व्या मिनिटास ट्राऊ संघाचा गोलरक्षक अमृत गोपे याच्या अफलातून चपळाईमुळे चर्चिल ब्रदर्सचा क्लेव्हिन झुनिगा गोल नोंदवू शकला नाही. त्यानंतर 23व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या ब्राईस मिरांडा याने सोपी संधी दवडली. अखेरीस 28व्या मिनिटास दोन वेळच्या माजी विजेत्यांना यश मिळाले. मॅसेन याने पेनल्टी फटका मारताना चूक केली नाही. विश्रांतीस दोन मिनिटे बाकी असताना मणिपूरच्या संघाने बरोबरी साधली. ट्राऊ संघाच्या बिद्यासागर सिंग याने चर्चिल ब्रदर्सवर चढाई करताना बचावपटू हम्झा खैर व कीनन आल्मेदा यांना चकवा देत फाल्गुनी सिंग याला चेंडू पास केला. यावेळी ट्राऊ संघाच्या कर्णधाराने चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकास सहजपणे चकविले. 

चर्चिल ब्रदर्सला उत्तरार्धातही संधी होती. 54व्या मिनिटास वेंडेल सावियो याचा फटका गोलपट्टीस आपटल्यानंतर रिबाऊंडवर क्लेव्हिन झुनिगा चेंडूवर ताबा राखू शकला नाही. नंतर 56व्या मिनिटास मॅसेन याच्या फटक्याची दिशा भरकटली. सामना संपण्यास एक मिनिट असताना ट्राऊ संघाने सामना जिंकण्याची आयती संधी होती, पण बिद्यासागर याचा प्रयत्न चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक शिबिन राज याने यशस्वी होऊ दिला नाही. 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सची सलग 2 पराभवानंतर पहिली बरोबरी

- सलग 5 सामने जिंकल्यानंतर ट्राऊ सघाला प्रथमच बरोबरीचा गुण

- पहिल्या टप्प्यातही चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ संघात 1-1 गोलबरोबरी

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेन याचे स्पर्धेत 10 गोल

- गोकुळम केरळाच्या डेनिस अँटवी याचेही 10 गोल, ट्राऊ संघाच्या बिद्यासागर सिंग याचे सर्वाधिक 11 गोल
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT