पणजी : सांताक्रुझ हा पणजीनजीकचा मतदारसंघ. पणजी मतदारसंघातील काही प्रभाग सांताक्रुझ मध्ये येतात. आंतोनियो उर्फ टोनी फर्नांडिस हे सांताक्रुझचे विद्यमान आमदार एकेकाळचे बाबूश मोन्सेरातचे समर्थक म्हणून टोनी ओळखले जात असत. पण यावेळी त्यांना बाबूशचे समर्थन नाही. वास्तविक बाबूशना आग्नेल डिकुन्हा यांना भाजपची सांताक्रुझची उमेदवारी द्यायला हवी होती. पण भाजपने ही उमेदवारी विद्यमान आमदार टोनी यांना दिल्यामुळे बाबूशने सांताक्रुझमधून अंग काढून घेतले आहे.
खरे तर गेल्यावेळी टोनी हे कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांना बाबूशचे समर्थनही लाभले होते. पण 2019 साली बाबूशबरोबर त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यामुळे समीकरणे बदलली. 2017 साली टोनीने भाजपचे हेमंत गोलतकर यांच्यावर 642 मतांनी विजय प्राप्त केला होता. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले रुडाल्फ फर्नांडिस हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आता समीकरणे बदलली आहेत. टोनी फर्नांडिस हे भाजपचे उमेदवार आहेत, तर रुडॉल्फ हे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय अमित पालेकरांच्या रूपात ‘आप’ने जबरदस्त आव्हान उभे केले आहे.
सांताक्रुझ हा व्हिक्टोरिया फर्नांडिस ऊर्फ मामी यांचा बालकिल्ला म्हणून ओळखला जात असे. त्या या मतदारसंघातून तब्बल चारवेळा निवडून आल्या आहेत. 1994 ते 2007 पर्यंत सांताक्रुझवर मामींचेच राज्य होते. 1994 साली अपक्ष म्हणून तर 1999 ते 2007 पर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर मामी निवडून आल्या होत्या. मात्र 2012 साली बाबूश मोन्सेरात यांनी मामीचे पुत्र रुडाल्फ यांचा पराभव केला. गेल्या खेपेलाही त्यांचा पराभव झाला. आता ते तिसऱ्यावेळीही नशीब आजमावत आहेत. त्यांच्याबरोबर ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे ॲड. अमित पालेकर हेही रिंगणात आहेत. मुख्यमंत्री (CM) पदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यामुळे पालेकर यांना एकप्रकारे ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. आता हे ग्लॅमर प्रत्यक्षात उतरते की काय, हे बघावे लागेल.
भाजपचा दरवेळी निसटता पराभव
सर्वसाधारणपणे सांताक्रुझ हा कॉंग्रेसचा बालकिल्ला म्हणून गणला जातो. अजूनपर्यंत एकदाही येथे भाजप विजयी झालेला नाही. 2002 व 2017 साली भाजपला येथे निसटता पराभव स्वीकारावा लागला होता; पण अजूनही सांताक्रूझमध्ये (Santacruz) भाजपचा झेंडा फडकविला गेलेला नाही आणि टोनी यांची हीच मुख्य समस्या आहे. ते पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते असल्यामुळे त्यांना येथे भाजप कार्यकर्त्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.
कॅथलिक मतदारांची भूमिका महत्त्वाची
सांताक्रूझमध्ये कॅथलिकांबरोबर हिंदू मतांचाही भरणा असल्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. पण ही मते जरी भाजपची असली तरी ती टोनीकडे वळतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. कॅथलिक मतदार हे बहुधा कॉंग्रेसचे पाठीराखे असल्यामुळे त्यांचाही पाठिंबा मिळणे कठीण वाटते. त्यामुळे टोनीची अवस्था सध्या ‘ना बाबूशचा आधार, ना पक्षाचा भरोसा’ अशी दोलायमान झाली आहे.
तृणमूल कॉंग्रेसचेही उपद्रवमूल्य
त्यातच सांताक्रुझचे माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस हे तृणमूलतर्फे (TMC) रिंगणात असल्यामुळे टोनीची अवस्था अधिकच बिकट होऊ शकते. व्हिक्टर हे सांताक्रूझमधून 1989 मध्ये निवडून आले होते. त्यांचीही येथे वैयक्तिक अशी शक्ती आहे. आता ही शक्ती टोनींना चितपट करते, का रुडॉल्फना त्रास देते हे बघावे लागेल. गेल्या खेपेला मगोपचे प्रकाश नाईक यांना 2707 मते प्राप्त झाली होती. आता ही मते मगोपशी युती केलेल्या तृणमूलकडे वळतात की काय, बघावे लागेल. या उमेदवारांबरोबरच रिव्होल्युशनरी गोवन्सचे अजय खोलकर हे रिंगणात आहेत.
भाजपविरोधी लाटेचे फळ कॉंग्रेसला शक्य
सांताक्रुझमध्ये खरी लढत आहे ती भाजप, कॉंग्रेस, आप व तृणमूलमध्ये. भाजपविरोधी लाटेचे फळ कॉंग्रेसला मिळू शकते, अशी चिन्हे दिसताहेत. त्याचबरोबर ‘आप’ही विजयाचा ‘केक’ घेऊ शकतो की काय, यावरही तर्क-वितर्क सुरू आहेत. माजी आमदार व्हिक्टर हे 1989 सालच्या आपल्या यशाची पुनरावृत्ती करतात की काय, याकडेही लोकांचे डोळे लागून आहे. आता कोणाचे तर्क-वितर्क खरे होतात, धर्मसंकटात पडलेले टोनी यातून बाहेर पडतात की काय, कॉंग्रेस वा ‘आप’ सांताक्रूझचा गड सर करतात की काय, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार, हे निश्चित.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.