वसुंधरेच्या पोटात असणाऱ्या पातळ पाण्याने अनेक परिसंस्था जन्मास आल्या. कृमी, कीटक, मासळी, पक्षी, सरपटणारे प्राणी, जनावरे, झाडे, माणूस हे सर्वजण एक दुसऱ्या परिसंस्थेचे भाग बनले. परिसंस्थेमुळे अन्नसाखळ्या एकमेकांशी संबंधित आहेत. पक्षी झाडावरील फळे खातो आणि पाण्यातील मासळी खातो.
गवत, झाडे, झुडपे, स्वतःच अन्न तयार करतात आणि आपली ऊर्जा कीटक, शेळी, मेंढी, हरण, ससा, गाय यांना पुरवतात, त्यांची ऊर्जा कोल्हा, लांडगा, तरस घेतात. त्यांच्याकडील ऊर्जा वाघ, सिंह, चित्ता, बिबटा, गरुड, गिधाड हे घेतात. त्यानंतर ती ऊर्जा विघटकांची पातळी गाठते; म्हणजे मृतप्राणी, सूक्ष्मजीव जिवाणू यांचे विघटन वनस्पती करतात. ही संकल्पना चार्ल्स एल्टन या शास्त्रज्ञाने १९२७साली प्रथम मांडली. या सर्व घटनांचा संबंध पाण्याशी येतो.
आपण बेडकांना सहज पाहतो, पण त्यांचे काम फार मोठे आहे. त्यांचे मुख्य अन्न खेकड्यांची अंडी, कीटक व कृमी. खेकडे भात पिकाची नासाडी करतात. काटेरी साळुंदर कंदमुळे, फळे, फुले खाते आणि आपल्या विष्ठेतून फळांच्या बिया जंगलात पसरवते.
साळुदंर जंगलाची परिसंस्था वाढवते. हे सर्व प्राणी, ते ज्यासाठी निसर्गात आहेत तेच कार्य इमानेइतबारे करत आहेत. माणूस काय करतो? विचार करणे, तो साठवणे, त्याचा विकास करणे, जे आहे त्याचे जतन व संवर्धन करणे हे माणसाचे निसर्गातील प्रयोजन आहे. इतर सर्व प्राणी सृजनशील आहेत व माणूस सर्जनशील आहे. पण, या अतिरिक्त शक्तीने माणूस आपल्याला हवे तसे निसर्गाचे नियम वाकवण्याचे, वाकले नाहीत तर मोडण्याचे काम करतो. सर्जन कशाचे करत असेल, तर प्रदूषणाचे!
प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचे अशुद्धीकरण होय, गलिच्छ, दूषित, अशुद्ध याला लॅटीन भाषेत ‘पोल्युटस’ म्हणतात. प्रदूषण हे पृथ्वीवर पूर्वीपासूनच चालू आहे. मानवाने जेव्हा कोळशाचा शोध लावून अग्नी पेटवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून जास्त प्रदूषण होण्यास सुरुवात झाली.
घोड्याच्या विष्ठेतून बाहेर पडणारा वायू, भूकंप अशा नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. जसजसा मानवी कार्याचा विस्तार झाला तशी प्रदूषणात वाढ झाली. प्रदूषण चार प्रकारांत होते : वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, आणि जलप्रदूषण. सर्वांत घातक जलप्रदूषण.
तलाव, ओहळ, नदी, समुद्रातील पाण्यात त्रासदायक अनावश्यक घटक वाढल्याने ते सर्व जैवविविधतेला अपायकारक ठरतात. जमिनीवर वावरणाऱ्या जिवापेक्षा जास्त जीव पाण्यातच राहतात. निर्मळ वाहणारे झरे, ओहळ, तलाव, नदी यांत कारखान्याचे सांडपाणी, मानवीय मलमूत्र, रसायने सोडल्यास हे घटक पाण्यात विरघळून पाण्यातील प्राणवायू कमी होतो.
जलचर, प्राणी मरून जातात. आज सर्वच ठिकाणच्या मानवी वस्त्यांत रात्री उजेडाचा झगमगाटात दिसतो. त्यामुळे आकाशातील चंद्राचे चांदणे अगर तारेही नीट दिसत नाहीत. याचा वाईट परिणाम पक्षी, कासव अशा प्राण्यावर होतो. त्यांना प्रवासाच्या दिशा सापडत नाहीत.
कासवाची पिल्ले चंद्राच्या प्रकाशात मार्गक्रमण करतात. शरद ऋतूत पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लांब प्रकाशाकडे पाहा, तो स्वर्गीय ठिकाणाकडून आलेला वाटतो. रात्रीचे चंद्राच्या चांदण्यात ओहोळाच्या काठाने अगर शेताच्या बांधावरून चालताना चंद्रास पाहिल्यास तो आपल्याबरोबर चालल्याचा भास होतो.
मात्र एखाद्या वाहणाऱ्या ओहोळाच्या पाण्यात झाडाचे पिकलेले पान पडले तर ते पान वाहून नेण्याचे काम पातळ पाणी करते. पाणी हे पाण्याकडे धावते. त्या पाण्याला आपल्या कुशीत घेऊन पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत सूर्याला आपल्यातील पाणी खेचण्यास मदत करते. हा प्रकार चंद्र आपले पिठूळ चांदणे देत पाहतो. आश्विन महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत येणाऱ्या पौर्णिमा मोठ्या मनोज्ञ असतात.
त्या पृथ्वीला भिन्न, भिन्न प्रकारचा उजेड देत कथाविश्व रंगवतात. त्यातला कुठला मोहक आणि कुठला कमी हे कसे समजायचे हे आपल्याला समजत नाही. मात्र त्या त्या महिन्यातल्या पौर्णिमांचे वातावरण वेगळेच रम्यपण देते. सृष्टीच्या विकासास चंद्र सूर्याचा हातभार मोठाच लाभला आहे.
तलाव, ओहळ, नदीत तीन प्रकारच्या अन्न साखळ्यांची परिसंस्था असते. प्रथम मोठी वनस्पती, दुसरी कुजलेली वनस्पती आणि तिसरी शेवाळ वनस्पती. कुजलेल्या वनस्पतीचे भक्षण अपृष्ठवंशीय प्राणी करतात, तसेच ते मासे, बगळे, चतकोर यांना आपले भक्ष्य बनवतात.
निरंकाल गावाकडून माझा प्रवास कोडार ओहोळाच्या उगमाकडील भागातून सुरू झाला. कोडार ओहोळाचा उगम सिद्धनाथ पर्वताच्या उत्तर बाजूने त्याच्या पायथ्याकडील बेतोडा गावच्या चाफाळ परिसरातील घळीत होतो. तिथून कुळागराला पाणी पुरवीत तो खालच्या भागातील मेस्तवाड्याला पाणी पुरवतो. पुढे महादेव मंदिराकडील शेतीला आणि बागायतीला पाणी पुरवून गोटावाड्याकडील भागाला पाणी देतो. भिण्णो परिसरातील वनस्पती, बागायती आणि लोकांची तहान भागवत तो पुढे जात राहतो. या पुढील प्रवासात तो कुमयेड परिसराला पाणी देऊन मामगेळ परिसरातून उभेवाळकडून कोडार गावात प्रवेश करतो.
बेतोडा आणि कोडार सीमाभाग हे वनक्षेत्र आहे. या डोंगराळ जंगल भागातून रात्रीच्या वेळी येऊन जाणारी हिंस्र जनावरे त्या ओहोळाचे पाणी पिऊन पुढील ओपा डोंगर, कुर्टीतल्या म्हाळशी भागातून खांडेपारचे केरये, पाचमे जंगल भागातून भल्या मोठ्या भूतखांब पठारावरील भागात प्रवेश करतात.
कोडारच्या कोसमसे भागातून ओहळ पूर्व बाजूने खांडेपार नदीच्या पात्रात सामील होण्यासाठी धावतो. वाटेत मामलेनान भागाला पाणी पुरवतो. तळे भागातील नागझऱीचे पाणी आपल्या पात्रात घेऊन वरच्या कुळागाराला पाणी देऊन मारुती देवळाकडील पिंपळ पेडाच्या सावलीत अंमळ थबकतो.
तिथली सुपारी, नारळ, आंबा, फणस, काजू आणि बाकी वनसंपदेला पाणी देतो. परिसरातील भातशेती भिजवतो. माणके बांध पार करून रायत भागातील जैवविविधतेला पाणी पुरवतो. दुधसागराकडून वाहत येणारी आणि कोडार गावात खांडेपार नाव धारण करणाऱ्या गोड्या पाण्याच्या नदीत संमिलीत होतो.
त्या ओहोळातून वाहणाऱ्या पाण्यावर बेतोडा आणि कोडार गावांतील स्थानिकांच्या पूर्वजांनी पावसाळ्यात उगवणारे कणकीचे कोंब, रान सुरण, सुळी, कुर्डुक, ताळखीळा, बिबा, शिरमडोळी, हरकूली, फागल या रानभाज्या खाल्ल्या. माळरानावर कुळीथ, उडीद, पाकड, वरी, नाचणी, कांगसावा आणि डोंगरीभात पिकवले. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर मे महिन्यात दोडकी, टरबूज, काकडी, भोपळा, पडवळ, दुधी भोपळ्याचे बियाणे मळे तयार करून पेरले.
त्या बियाण्याला ओहोळाचे पाणी घागरीने पुरवले. या बियाण्यांचे रूपांतर महिन्यानंतर मोठ्या रोपात होते. प्रथम मान्सून पावसाच्या थेंबाने भिजताच आठ दहा दिवसांत त्या रोपांना पिवळ्या रंगाची फुले येतात. त्या फुलातून पेरलेले बियाणे आपली भावी पिढी जन्मास घालते. त्या वेलींची फळे मानवाचे जीवन घडवते.
कष्टकरी शेतकरी आपला संसार चालवण्यासाठी त्या भाज्या बाजारात आणतात. प्रथम आलेल्या फळभाज्या पाहून माणसांना त्या आकर्षित करतात. शहरी लोक कितीही महाग असल्या तरी त्या विकत घेऊन घरी नेतात, कोडार आणि बेतोडा गावांना डोंगर जंगल आणि मैदानी भाग निसर्गाने दिला आहे. त्या डोंगर भागात पाळीव जनावरांचे कळप पठारी भागात गवत खाताना त्यांच्या गळ्यातील थोकरी, गळसर, घंटा, कोगळेचा आवाज दूरवर ऐकू येतो.
गाई गुरांचे मोठमोठे कळप चरताना त्यांच्यासोबत डोक्यावर घोंगडी आणि हातात काठी धरून त्यांचा गुराखी आपल्या बोलीभाषेत गाणी म्हणत मागे चालत फिरायचा. त्या गुरांचे शेणखत पठारावर पसरल्यावर शेती किंवा भाजीचे मळे करताना दुसऱ्या खताची गरज पडत नव्हती. निरंकाल, कोडार, ओपा, कोनशे, बेतोडा हे गाव जैवविविधतेचे आगर होते. पूर्वी या गावांना भेट देण्यास खांडेपार, फोंडा या ठिकाणाकडून पायी चालत जावे लागत होते. कोडारच्या ओहोळात गोडी मासळी भरपूर मिळायची. पावसाळा सुरू झाला म्हणजे ‘दिपावणी’ करून मासळी आणायचे. आमचे पूर्वज ते पिकवलेले धान्य खाऊन सुखी जीवन जगले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.