शिरगावच्या जत्रेतील भयानक चेंगराचेंगरीत बळी जाण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आणि संपूर्ण गोवा शोकसागरात बुडाला. आता चूक कुणाची यासंबंधी तपास होणार आहे, सरकारने त्यासाठी समितीही नेमली आहे. पण शिस्तीचा अभाव, धांगडधिंगा हे प्रकार काही लपून राहिलेले नाहीत. वास्तविक शिरगावच्या जत्रेला तोबा गर्दी होते, हे सर्वांना माहीत होते, त्यामुळे तशी व्यवस्था प्रशासन आणि देवस्थान समितीने करायला हवी होती. व्यवस्थापन पूर्णपणे ढासळले, म्हणूनच तर हा ह्रदयद्रावक प्रसंग अनेक कुटुंबावर ओढवला. आता चौकशी समितीच्या नावावर ‘मेलेल्या म्हशीला किती लिटर दूध’ याचा लेखाजोखा घेतला जाईल, पण प्रत्येक जत्रोत्सवावेळी घ्यावयाची जबाबदारी यासंबंधी ठोस, असे नियम आधीच केले असते तर बरे झाले नसते का? ∙∙∙
शिरगावांत परवा जे काय घडले त्याचे नवनवे पैलू आता पुढे येऊ लागले आहेत. मंदिर समितीने सारा दोष बेफाम झालेल्या धोंडांच्या एका गटावरच ढकलला आहे. पण त्याच बरोबर ही समितीही अनेक बाबी गांभिर्याने विचारात घेण्यास कमी पडली, असे म्हटले जाऊ लागले आहे. ज्या जागी ही घटना घडली तो रस्ता उताराचा व अरुंद आहे. तेथे गतवर्षी छोटीशी घटना म्हणे घडली होती. ती लक्षांत घेऊन खरे तर यंदा संबंधितांनी तो रस्ता अडथळा मुक्त ठेवण्याबाबत खबरदारी घ्यायला हवी होती पण प्रत्यक्षात ते झाले नाही उलट त्या रस्त्याच्या कडेला फेरीतील दुकाने थाटण्यास परवानगी देऊन संबंधितांनी मोठी चूक केली. त्यातीलच एका दुकानाची वीजजोडणी तुटली व त्यांतूनही गोंधळ माजला व धावपळ उडाली, असे सांगितले जाते. खरे तर धोंडांची जा-ये असणारे सारे मार्ग प्रशस्त व अडथळामुक्त ठेवण्याची गरज होती. पोलिस यंत्रणेच्याही हे अडथळे कसे लक्षात आले नाहीत, हा मुद्दा उपस्थित होतो. ∙∙∙
शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नेहमीच तपासकामात आघाडीवर असलेले आणि सिंघम म्हणून परिचित पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी हेही तेथील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलिसांनी व्यूहरचना आखली होती. मात्र अपयशी ठरली. झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा संपूर्ण अपयशी ठरली. कधी नव्हे ती घटना घडल्याचे त्याचे पडसाद आंतरराज्य स्तरावर तसेच केंद्रातही उमटले व त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली. विरोधकांकडून होणारे आरोप व टीका याला पर्याय म्हणून सरकारने त्वरित जबाबदार असलेल्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. मात्र झालेले दुःख भरून येईलसे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली व त्याचा अहवालही ताबडतोब मागितला आहे. या जत्रेसाठी दरवर्षी देवीचे व्रत घेतलेले भाविक (धोंड) यांची संख्या वाढत आहे, त्या दृष्टीनेही सरकारकडून काही ठोस निर्णयाची गरज आहे, म्हणजे भविष्यात असे प्रकार कधी घडू नयेत.∙∙∙
तुये परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला शनिवारी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून जेरबंद केले. गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याने गायींची वासरे, म्हैशींची रेडके व कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे तुये परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण होते. वन खात्याने या बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांना हायसे वाटलेच. मात्र, वन खात्याच्या या कारवाईचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात आमदार जीत आरोलकर यांनी जी मुक्ताफळे उधळली त्याचीच सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. एक जबाबदार आमदार असलेल्या जीत आरोलकर यांनी वन खात्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना ‘सध्या राज्यात बिगर गोमंतकीय बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे’, असा जावई शोध लावला आहे. आता बोला... ∙∙∙
मडगावात नव्याने नियुक्ती झालेल्या पीआय साहेबांनी म्हणे चुकार ‘रेंट अ बाईक’ तसेच ‘मॅाडीफाईड’ बाईकविरुध्द कारवाई करताना त्या सरळ जप्त करण्याचे काम केले व त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मडगावात रेंट अ बाईकवाल्यांची दादागिरी नेहमीच त्रासदायक ठरत होती. ते सार्वजनिक पार्किंग जागेतच केवळ ही वाहने उभी करत नव्हते तर नगरपालिका इमारतीच्या वऱ्हांड्यांत ती पार्क करणे व तेथे खुर्ची टाकून त्यांचा व्यवसाय चालवत होते. आता त्यांचे हे धाडस कोणाच्या जीवावर चालत होते, त्याची खालच्या सुरांतील चर्चा कानावर पडत होती. पण नव्या साहेबांनी त्यांना आपला इंगा दाखवला आहे. तो असाच कायम रहावा, अशी मागणी होत आहे. साहेबांनी अशीच जरब सिटी बसेसवाल्यांवरही निर्माण करायला हवी. विशेषतः आके पांडव कपेलासमोर त्यांचे जे काय चालते, ते बंद करण्याचे आव्हान या साहेबांसमोर आहे. ∙∙∙
मटका जुगारावर आता पोलिसांनी धाड घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मटका किंगचे धाबे नाही, म्हटले तरी थोडे दणाणले आहेच म्हणा. मात्र मटकाप्रेमींनी घाबरून जाण्याचे तसे कारण नाही हां. शनिवारी कल्याण मटका चालू होता. मुंबई बाजार नेहमीप्रमाणे त्या दिवशी बंद होता. रविवारी या दोन्हीही मटका बाजाराला सुट्टी असते. तुम्ही बीट घ्या, मात्र जरा लपून, उघडपणे नव्हे हा हा प्रेमळ सल्ला पोलिसांनीच या मटकेवाल्यांना दिलाय. अहो वरची कमाई आहे, लक्ष्मी वर कोण बरे पाणी सोडेल? असा हा सारा मामला आहे. ∙∙∙
पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. ज्यांची पोलिस स्थानकात बदली झाली ते खुश होते तर ज्यांना ही पोलिस स्थानके सोडावी लागली त्यामुळे ते नाखुश होते. प्रत्येकाला पोलिस स्थानकात बदली झालेली हवी असते. कोलवाळ पोलिस स्थानकातील निरीक्षक विजय राणे यांची बदली क्राईम ब्रँचमध्ये झाली होती, मात्र ते समाधानी नव्हते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले होते. लईराई देवीच्या जत्रेदिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे डिचोलीच्या पोलिस निरीक्षकांना तेथून हलवण्यात आले व त्या जागी निरीक्षक राणे यांची वर्णी लावण्यात आली. एक महिनाही बदली होऊन झाला नाही, तोच ही बदली करण्यात आली. त्यामुळे नाखुश असलेले निरीक्षक राणे ही समाधानी झालेत. लईराई जत्रेच्या ठिकाणी ते ताबा घेतल्यापासून रात्रंदिवस काम करत आहेत. एसडीपीओ पदाचा ताबा म्हापशाच्या एसडीपीओंकडे देण्यात आला आहे. कितीतरी अनुभवी उपअधीक्षक आहेत मात्र त्यांची वर्णी लावली गेली नाही. त्यामुळे या बदल्यांचा निकष राजकारण्यांची मर्जी की ऐकणारा अधिकारी असा होतो का? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.