Goa Drama  Dainik Gomantak
गोवा

Goa Drama : एका रात्रीतील कहाणीचे नाटक : ‘सगळी रात’; प्रभावी संहितेला गालबोट

Goa Drama : सुमार दिग्दर्शन, कला मंदिरातील रसिकांची गर्दी ओसरली

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Goa Drama :

‘सगळी रात’ हे सिद्धिविनायक क्रिएशन सांतीनेज प्रस्तुत नाटक कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेतील शेवटचे पुष्प असल्यामुळे भरपूर गर्दीची अपेक्षा होती, पण ही अपेक्षा फोल ठरली. कला मंदिरातील अर्ध्याहून अधिक खुर्च्या खाली दिसत होत्या.

या नाटकाची संहिता बंगाली लेखक बादल सरकार यांची. बादल सरकार म्हटले म्हणजे त्यांच्या त्या ‘ऑफ बीट संहिता’ आठवतात. ‘सगळी रात’ ही त्यापैकीच एक. या संहितेचे मराठी रूपांतर प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी केले होते.

कोकणीत याचे रूपांतर केले आहे ते वसंत सावंत यांनी. रूपांतर करताना त्यांनी कोकणी भाषेला पुरक असा बदल केल्याचे दिसून आले. कोकणीचा साज चढवल्यामुळे त्याला एक वेगळीच नजाकत प्राप्त होऊ शकली.

या नाटकाची कथा एका रात्रीची. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे एक जोडपे एका घराचा आसरा घेते. ते घर एका वृद्ध माणसाचे असते. तो माणूस त्यांना चहा व फराळ देतोच, त्याचबरोबर तो त्यांच्या खासगी जीवनातही डोकावतो आणि त्यांचे जीवन अस्वस्थ करून टाकतो. खासकरून ती महिला जास्त अपसेट होते.

एवढेच नव्हे, कल्पनेतील रंजन समजून त्या वृद्ध माणसाकडे आकर्षितही होते. हे बघून तिचा नवरा बिथरतो आणि बायकोला सोडून निघून जातो. नंतर भावनांचे विविध कंगोरे दाखवीत हे नाटक संपते.

या नाटकाला थोडी रहस्यमय डुबही आहे. काही वाक्यांचे उमटणारे पडसाद नाटकाला रहस्यमय वातावरणात नेते. अंधाऱ्या रात्री एका अनोळखी घरात येणारे ते जोडपे व त्यांना त्यांच्या घरात आसरा देणारा तो साताच्या पाढ्याची महती सांगणारा वृद्ध, त्याचे रहस्यमय बोलणे यातून नाटकातील वातावरण गुढ होत जाते.

स्पर्धेला पुरक असे हे नाटक. या नाटकात फक्त तीन पात्रे. यामुळे दिग्दर्शनाची कसोटी लागणे साहजिकच, पण याबाबतीत दिग्दर्शक विजय कांबळे बरेच कमी पडल्याचे जाणवले. तीनच पात्रे असल्यामुळे मुव्हमेंटना बराच वाव होता, पण पात्रांना संयुक्तिक मुव्हमेंट देण्यात दिग्दर्शक कांबळे थोडे मागे पडले.

खास करून ती बाई त्या वृद्ध माणसाला कल्पनेतील रंजनाबद्दल सांगते त्यावेळी तिची पाठ व वृद्ध माणसाचे त्याच जागेवर राहून बोलणे यासारख्या प्रसंगामुळे नाटक रेंगाळल्यासारखे झाले. मुख्य म्हणजे त्यांचे दिग्दर्शन संहितेने गाठलेली उंची पकडू शकले नाही आणि त्यामुळेच बऱ्याच प्रसंगात नाटक ढिले पडले. तीनच पात्रे असल्यामुळे अभिनयाच्या जुगलबंदीची अपेक्षा होती, पण पुरुष झालेले धीरज नायक व वृद्ध झालेले स्वतः दिग्दर्शक विजय कांबळे या अपेक्षांच्या कसावर उतरू शकले नाहीत.

खासकरून वृद्ध झालेले विजय कांबळे गरज नसताना वेगाने आपले संवाद म्हणत होते. काही ठिकाणी ते चुकलेही. खरं तर ही भूमिका थोडीफार रहस्यमय व कल्पनेला खाद्य देणारी असल्यामुळे पॉज घेऊन संवाद म्हणणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे ते मुद्राभिनयातही बरेच कमी पडले. तीच गोष्ट धीरज नायक यांची. त्यांचा ‘पुरुष’ ही हवा तसा रंगू शकला नाही.

त्यामानाने त्यांची ‘बायको’ झालेल्या लक्ष्मी सातोर्डेकर यांनी बरीच बाजी मारली. मनातील अस्वस्थता, नंतर होणारी मनाची घालमेल, ‘रंजन’बद्दलचे स्वप्नरंजन यासारख्या बाबी समर्थपणे व्यक्त करून त्यांनी प्रयोगात रंजकता आणली. त्यांचा मुद्राभिनयही अफलातून होता. या नाटकाचे यापूर्वी बऱ्याच ठिकाणी प्रयोग झाल्यामुळे तुलना होणे अपरिहार्य होते आणि तशी तुलना ऐकूही येत होती.

गर्दीचे गणितः

आज सादर झालेल्या सगळी रात या नाटकाला मागच्या काही नाटकांच्या मानाने गर्दी कमी होती. या स्पर्धेच्या नाटकांना होणाऱ्या गर्दीचा चढउतार हा या स्पर्धेतील एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. सगळ्या नाटकाचा आढावा घेतल्यास सगळ्यात जास्त ‘गर्दी बर्थ ऑफ डेथ’ या नाटकाला तर सर्वात कमी गर्दी ‘मिशन आपालिपा’ या नाटकाला झाली.

राजीव गांधी कलामंदिराची पाच वर्षे

कला अकादमीच्या या कोकणी नाट्यस्पर्धेला यंदा फोंड्याच्या राजीव गांधी कलामंदिरात पाच वर्षे पूर्ण होत आहेत.

फोंडा ही गोव्याची सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे कला अकादमीची ही महत्त्वाची स्पर्धा फोंड्यात होणे ही गौरवास्पद बाब असली तरी कला अकादमीने त्याचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे. अर्थात पुढील वर्षी ही स्पर्धा फोंड्यात होणार की काय हे सांगणे कठीण असल्यामुळे नियोजनाबाबत आताच बोलणे म्हणजे ‘शीतापुढे मीठ’ खाण्याचा प्रकार ठरू शकतो.

वसंत सावंत यांची पाच नाटके

या स्पर्धेत प्रख्यात लेखक वसंत सावंत यांची एकूण पाच नाटके होती. त्यातली चार अनुवादित व एक स्वतंत्र होते. हयवदन व आज सादर झालेले सगळी रात ही त्यांनी लिहलेली दोन नाटके लक्षणीय होती.

गिरीश कर्नाड व बादल सरकार यांच्या मूळ संहितेचा अनुवाद केलेल्या या कलाकृती संहितेच्या दृष्टीने ‘क्लिक’ ठरल्या. मात्र, त्यांनी स्वतंत्र लिहिलेले ‘दोन फुल शीतकढी’ हे नाटक प्रश्‍नचिन्हे उभे करून गेले. काही का असेना पाच नाटके स्पर्धेत असल्यामुळे त्यांचा स्पर्धेवर ठसा उमटला हे नक्की.

वेळ पूर्ण व्हावी म्हणून तडजोडी

‘सगळी रात’ या नाटकाचा जीव लहान असल्यामुळे स्पर्धेच्या वेळेची मर्यादा पाळण्याकरिता संस्थेला धडपड करावी लागत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. सुरवातीला श्रेय नामावली सांगण्यातच बराच वेळ खर्ची घालण्यात आला. एवढे होऊनही दोन तास पूर्ण होत नाही हे पाहून शेवटी ती ‘बाई’ खुर्चीखाली हात लांब करून बसते तो शेवटचा प्रसंग ताणण्यात आला.

त्यामुळे बराच वेळ कलाकाराला ‘त्या’ स्थितीत बसावे लागले. शेवटी वेळेची मर्यादा पूर्ण होते हे पाहूनच पडदा सरकवण्यात आला. याला पूर्वनियोजनाचा अभाव हेच कारण दिसत होते. दहा पंधरा मिनिटांचा जास्त वेळ शिल्लक ठेवल्यास अशा तडजोडी कराव्या लागल्या नसत्या. त्यामुळे नाटकाचा रसभंग झाला हा भाग वेगळाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT