Goa Agriculture: खाणकाम बंद झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या तातोडी - धारबांदोडा येथील महेश गावकर यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंपूर्ण होण्यासाठी आधुनिक शेती तंत्रात पाऊल टाकले आहे. त्यांनी आपल्या नापीक बनलेल्या जमिनीत सातारा जातीच्या आल्याची लागवड केली असून याद्वारे हंगामाच्या शेवटी लाखो रुपयांचा परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे.
महेश गावकर खाण (Mine) उद्योगात पूर्णवेळ कर्मचारी होते, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचे तीन ट्रकही त्यांनी खाणकामात उतरविले होते, पण 2012 मध्ये राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने त्यांचे उत्पन्नाचे स्रोत ठप्प झाले. त्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी गावात दुकान चालवण्याचा प्रयत्न केला, पण भरमसाठ भाड्यामुळे ते चालवता आले नाही. त्यामुळे त्यांनी शेती व्यवसायात उतरण्याचे ठरविले.
महेश गावकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने क्लस्टर बीन, नोखोल, स्थानिक मिरची, टरबूज, पालेभाज्या, वांगी, स्वीट कॉर्न, वाल इत्यादींची लागवड धारबांदोडा कृषी अधिकारी नागेश कोमरपंत व कृष्णनाथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या कामी त्यांच्या पत्नीचेही त्यांना सतत सहकार्य मिळाले.
स्कूटर इंजिनचा वापर पॉवर ट्रिलरसाठी!
महेश गावकर यांनी त्यांच्या जुन्या स्कूटरचे दोन स्ट्रोक इंजिन वापरून पॉवर टिलर मशीन विकसित केले आहे. जे ते त्यांच्या शेतीसाठी वापरतात. जेव्हा त्यांनी 2019 मध्ये शेती करण्यास सुरवात केली, तेव्हा त्यांच्याकडे ट्रॅक्टर (Tractor) घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या जुन्या स्कूटरच्या इंजिनवर काम केले आणि मिनी पॉवर टिलर विकसित केले.
विविध पिकांद्वारे भरघोस उत्पन्न
गेल्या वर्षी त्यांनी सुमारे 60 रुपये किलोप्रमाणे 12 टन आल्याचे उत्पादन घेतले. 15 हजारांच्या टरबूजांची विक्री केली. 2 टन क्लस्टर बीन्सद्वारे 55 हजार रुपये कमावले. 3 टन भेंडीद्वारे 1 लाख 10 हजार रु., 3 टन हिरव्या मिरचीद्वारे 1.8 लाख आणि 1 टन स्थानिक भाजीपाला मिळून 50 हजार रुपये उत्पन्न मिळवले.
कृष्णनाथ गावस, साहाय्यक कृषी अधिकारी-
फलोत्पादन महामंडळाला दररोज 1 टनपेक्षा जास्त आले आवश्यक असते. जर ते महेश गावकरांकडून विकत घेतले गेले, तर त्यांना आले शेती सुरू ठेवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळू शकते. फलोत्पादनाची राज्यभरात सुमारे एक हजार दुकाने आहेत. या सर्व दुकानांत गावकरांचे सेंद्रिय आले पोहोचू शकेल. गावकर हे अतिशय कल्पक आणि कष्टाळू शेतकरी (Farmer) आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.