Mining Dainik Gomantak
गोवा

Goa: मयेवासीय स्थलांतरित मालमत्तेच्या जोखडात

गोवा (Goa) मुक्तीनंतर 60 वर्षांनीही भेडसावतेय समस्‍या, जमीनदारीचा पाश तोडणे काळाची गरज.

दैनिक गोमन्तक

डिचोली: खाण व्यवसाय (Mining) आणि जमीन मालकी हक्काच्या विळख्यात अडकलेला मतदारसंघ, अशी मये (Mayem) विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी आतापर्यंत खूप प्रयत्‍न झाले, पण बहुतांश समस्‍या जैसे थे आहेत. (Even 60 years after the liberation of Goa, there are problems in Mayem village)

गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर गोव्यात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. 1989 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यावेळच्या डिचोली आणि पाळी विधानसभा मतदारसंघातील काही भाग एकत्रित करून स्वतंत्र ‘मये’ मतदारसंघाची रचना करण्यात आली. कालांतराने तिसवाडी तालुक्यातील चोडण पंचायतीचा या मतदारसंघात समावेश करण्यात आला. मये मतदारसंघात चोडण-माडेलसह, शिरगाव, मये-वायंगिणी, पिळगाव, नार्वे, कारापूर-सर्वण आणि वन-म्हावळिंगे या सात पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 27 हजार 97 मतदार आहेत.

जमीन मालकीहक्क अधांतरी

मतदारसंघातील महत्त्वाची पंचायत असलेल्या मये गावातील जनता मात्र ‘स्थलांतरित मालमत्ते’च्या जोखडात अडकलेली आहे. गोवा मुक्तीला साठ वर्षे होत असतानाही हा प्रश्न कायमचा निकालात कधी येईल, घरांचा आणि जमिनींचा मालकीहक्क कधी मिळणार, या प्रतीक्षेत मयेवासीय आहेत. हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी 2014 साली विधानसभेत विशेष कायदा संमत करण्यात आला. मात्र ज्या गतीने या कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती तशी ती होत नाही. परिणामी आजपावेतो मयेवासीयांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

याच मतदारसंघातील म्हावळिंगे गावही जमीनदारीच्या विळख्यात अडकलेला आहे. जमीनदारीच्या पाशामुळे या गावातील कष्टकरी नागरिकांचा तसेच साधनसुविधात्मक विकास होत नाही. गावातील रस्ते तर उध्दाराची वाट पाहत आहेत. एवढेच नव्हे, तर पंचायत घर यासारख्या सरकारी प्रकल्पांची पूर्तताही करणे सरकारला शक्य होत नाही. या गावाची ही शोकांतिका. हा गाव अजूनही मागासलेपणाचा शिक्का घेवून वावरत आहे. हा शिक्का कधी पुसला जाईल, याची मयेवासीय वाट पाहत आहेत. पर्यटनाला चालना हवी.

जगप्रसिद्ध मये तलाव, चोडण येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्य तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नार्वे गावातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर ही मये मतदारसंघातील स्थळे म्हणजे पर्यटकांचे आकर्षण आहे. यामुळे या भागात पर्यटन व्यावसायाला मोठी संधी आहे. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नियोजनाची गरज आहे.

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मये तलावाचा विकास करण्यात आला आहे. ‘बंजी जम्पिंग’ हा थरारक धाडसी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे सध्या सौंदर्यीकरण करण्याचे काम चालू आहे. चोडण येथील पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसह अन्य पर्यटकांना मये तलावाकडे आकर्षित करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष नियोजन करणे ही भविष्याची गरज आहे.

खाण व्यवसायाचे संकट

मये मतदारसंघातील मयेसह शिरगाव आणि पिळगाव या तिन्ही पंचायती खाणपट्ट्यात येतात. या गावांना खाण व्यवसायाचे ग्रहण लागलेले आहे. खाण व्यवसायामुळे मये, शिरगाव भागातील शेती-बागायती व्यवसाय धोक्यात आला असून, या गावांना मोठी झळ बसली आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे अस्तित्वही संकटात आले आहे. खाण व्यवसायाची समस्या असूनही खाणपट्टा भागांचा अपेक्षित विकास झालेला नाही. कृषी विकासासाठी ठोस नियोजन करण्यात आलेले नाही.

चोडण पुलाची प्रतीक्षा

केवळ मये मतदारसंघातीलच नव्हे तर डिचोली भागातील जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलेला आणि राजधानीला जोडणारा मांडवी नदीवरील नियोजित चोडण पूल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी कधी लागणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. चोडण ते साल्वादोर-दी-मुंदपर्यंत पूल बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. बारा वर्षांपूर्वी या पुलाची घोषणाही झाली आहे. तो होणार की घोषणा कागदोपत्रीच राहणार, याचे उत्तर अजूनही मिळत नाही. बेरोजगारीवर मात करण्यासाठी मतदारसंघात मोठा उद्योग प्रकल्प आणावा, अशी जनतेची मागणी आहे. म्हावळींगे-कुडचिरे परिसरात सरकारी जमीन आहे. तिथे प्रकल्प साकारता येईल.

विकास आराखडा हवा

मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या मतदारसंघाची भौगोलिक रचना, नैसर्गिक स्रोत आणि मानवी संसाधन यांची माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक पंचायतीच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळा विकास आराखडा तयार करावा लागेल. हे करताना शेती, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यांना प्राधान्य द्यावे लागेल. येथील युवकांना त्यांच्यातील उपजत गुणवत्ता पाहून कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विकास म्हणजे केवळ भौतिक विकास नव्हे तर माणसांचा ‘माणूस’ म्हणून उत्कर्ष व्हावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मतदारसंघातील प्रत्येक घराचा आणि घरांतील प्रत्येकाचा विचार करण्याची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असल्याचे पिळगावचे सरपंच रामचंद्र गर्दे यांनी सांगितले

स्थलांतरित मालमत्ताप्रश्नी उपेक्षा

रस्ते, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध असल्या म्हणजे विकास नव्हे. जनतेसाठी दूरदृष्टीचे नियोजन हवे तेवढेच जनतेलाही स्वातंत्र्य हवे. गोवा मुक्तीदिनाची षष्ट्यब्दी साजरी होत असताना मये गाव आजही पारतंत्र्यात आहे. आपल्या हक्कासाठी मयेवासीय संघर्ष करीत आहेत. हा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत नाही. हा प्रश्न म्हणजे राजकारण्यांचे निवडणुकीतील ‘भांडवल’ बनले असल्याचे मत मये भू-विमोचन नागरिक समितीचे सरचिटणीस प्रा. राजेश कळंगुटकर यांनी व्यक्त केले

जमीनदारीतून मुक्ती हवी

मतदारसंघातील म्हावळिंगे गावाला एक मागासलेला भाग म्हणून ओळखण्यात येते. हा गाव जमीनदारीच्या विळख्यात अडकलेला असल्याने मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कष्टकरी लोक संकटात आहेत. बेरोजगारी हा एक ज्वलंत प्रश्न आहे. मतदारसंघात मोठ्या उद्योगप्रकल्पांची गरज आहे असे माजी जिल्हा पंचायत सदस्य सौ. मेघना येंडे म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT