Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: हे तर ‘मनी ट्रॅप’!

Khari Kujbuj Political Satire: अलीकडेच सरकारी पातळीवर लखपती दीदी योजनेची घोषणा झाली होती. राज्यभरात स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न लाख रुपये करण्याचे उद्दिष्ठ सरकारने ठेवले आहे. ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून ही योजना मार्गी लावण्यात येत आहे. असे असतानाच नोकरी घोटाळा बाहेर आला.

गोमन्तक डिजिटल टीम

हे तर ‘मनी ट्रॅप’!

सौंदर्यवती महिलांनी आपल्या प्रेमजाळ्यात मोठमोठ्या राजकारण्यांना व अधिकाऱ्यांना ‘हनी ट्रॅप’लावलेले आपण ऐकले आहे. आपल्या छोट्याशा गोव्यातही सध्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा गाजत आहे. त्या सौंदर्यवतींमुळे देशात ‘हनी ट्रॅप’ गाजले आणि आता गोमंतकीय महिलांमुळे गोव्यात ‘मनी ट्रॅप’ गाजत आहे. यापूर्वी जे कधीच घडले नव्हते, ते गोव्यात घडत आहे. अंगावर दोन ते चार किलो वजनाचे सोन्याचे दागिने, हातात ॲपलचा फोन, महागड्या गाड्या व हायफाय लाईफ स्टाईल जगणाऱ्या प्रिया, पूजा, दीपश्री व श्रुती या महिलांनी ‘मनी ट्रॅप’ लावून अनेक बेरोजगारांना लुटले. यात आणखी अनेक रूपवती असण्याचे संकेत मिळत आहेत. लूटमार फक्त पुरुषच करू शकतात हा गैरसमज प्रिया, पूजा, दीपश्री व श्रुतीने खोटा ठरवला आहे, अशीच चर्चा आता रंगली आहे. ∙∙∙

असेही महिला सशक्तीकरण

अलीकडेच सरकारी पातळीवर लखपती दीदी योजनेची घोषणा झाली होती. राज्यभरात स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न लाख रुपये करण्याचे उद्दिष्ठ सरकारने ठेवले आहे. ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून ही योजना मार्गी लावण्यात येत आहे. असे असतानाच नोकरी घोटाळा बाहेर आला. त्यात अनेक महिलांना अटक होऊ लागली. त्यातून कोट्यवधींचे व्यवहार चर्चेला आले. सरकारच्या नावावर महिलांनी आपले असे सशक्तीकरण कसे करून घेतले अशी चर्चा रंगू लागली आहे. सरकार महिलांना लखपती बनवायला निघाले होते. महिला अक्कलहुशारीने कोट्यधीश झाल्याचे खोचकपणे सांगितले जात आहे. अलीकडे बसमधील प्रवासात हा विषय ऐकू येतोच. ∙∙∙

तो आवाज कोणाचा

नोकरीसाठी सहा लाख रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर एक लाख रुपये दिले. आता उर्वरित रक्कम दिली नाही, तर प्रोबेशन संपण्याच्यावेळीच कामावरून काढून टाकण्यास सांगेन अशी धमकी देणारी ध्वनिफीत सध्या समाज माध्यमावर फिरू लागली आहे. सध्या पैशाच्या बदल्यात नोकरी हा विषय गाजू लागला आहे. त्यामुळे या ध्वनिफितीतील आवाज कोणाचा अशी खोचक विचारणा केली जात आहे. तो आवाज कोणाचा असावा याचा अंदाज व्‍यक्त करताना अनेकजण सूचक वक्तव्ये करत आहेत. त्या व्यक्तीचे नाव कोणी घेतलेले नाही. मात्र, ती व्यक्ती सत्ताधारी असल्याचे उघडपणे सांगितले जात आहे. ∙∙∙

गुन्हेगार पतीला चिलखत!

सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणण्यासाठी जी सत्त्व परीक्षा दिली होती, ते आपण आपल्या पुराण कथांत ऐकलेच असेल. आधुनिक युगात मडगाव नगरपालिकेच्या एका माजी उपनगराध्यक्ष महिलेने गुन्ह्यात सापडलेल्या आपल्या पतीला अभय देण्यासाठी नामी शक्कल लढविली याची चर्चा मठग्रामात रंगत आहे. या नगरसेविकेने दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमात नगरसेविकेने मान्यवरांच्या हस्ते मडगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह दोन पोलिस अधीक्षकांच्या व दोघा पत्रकारांचा सत्कार घडवून आणला. पत्रकारांचा सत्कार समजू शकतो. मात्र, पोलिसांचा सत्कार आपल्या गुन्हेगार पतीला पोलिसांकडून वाचाविण्यासाठी केला का? असा प्रश्न स्थानिक विचारायला लागले आहेत. मॅडमच्या पतीवर एका वकिलाची गाडी फोडल्याप्रकरणी व एकावर दगडाने हल्ला केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार नोंद आहे. मॅडमच्या या पतिव्रतेची मडगाव उड्डाण पुलाखाली जोरदार चर्चा होत आहे. ∙∙∙

शिक्षकांना ‘संदेश’

शिक्षक समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्याकडून उच्च नैतिक मूल्ये आणि आदर्श वर्तन अपेक्षित असते. मात्र, नुकतीच समोर आलेली काही प्रकरणे या अपेक्षांना धक्का लावणारी आहेत. सोमवारी समोर आलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात एक शिक्षक संशयित असल्याचे उघड झाले. यापूर्वीही काही शिक्षक आमदारांशी जवळीक साधून खंडणी घेण्याच्या प्रकरणांची चर्चा होती. शिक्षकांचा पगार उत्तम असूनही, काही शिक्षक अधिक पैसे कमावण्याच्या लालसेपोटी अशा गैरव्यवहारात गुंतले आहेत. हे प्रकरण शिक्षकांच्या प्रतिमेला काळिमा फासणारे आहे. शिक्षण क्षेत्रात अशाप्रकारचे गैरव्यवहार वाढत आहेत. अनेक शिक्षक अशाच प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये गुंतले आहेत आणि त्यांची प्रकरणे लवकरच उघडकीस येतील असा ‘संदेश’ राज्यात शिक्षकांना लोक देत आहेत. हे सर्व शिक्षकवर्गाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत का किंवा प्रत्यक्षात असे प्रकार घडत आहेत? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ∙∙∙

महिलांची यादी वाढतेय...

राज्यात सध्या गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात सहभागी महिलांची यादी वाढतच आहे. तसे पाहिले तर अशा प्रकरणात सहसा महिला दिसत नाहीत, पण गोव्यातील माणसेच लई भारी. आता तेही खरे म्हणा पुरुषांपेक्षा महिला एक पाऊल पुढे असल्याचे सांगण्यात येते, पण अशा प्रकरणात या महिला पुढे आहेत, म्हटल्यावर आणखी काय बोलणार. खरे म्हणजे बाई माणसावर लोक लगेच विश्‍वास ठेवतात, आणि या विश्‍वासाला तडा जाणारे या घटना पाहिल्या तर आणखी कितीतरी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे, फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे देणारा आणि घेणारा हे दोघेही तसे दोषीच असतात. त्यामुळेच कदाचित तक्रारदार घाबरत असतील, नाही का? ∙∙∙

हिस्ट्री शीटर खरा सूत्रधार..?

कुचेली कोमुनिदाद जागेत सरकारने काही हजार चौरस मीटर जागा स्मशानभूमी बांधण्यासाठी संपादीत केली आहे. या जागेतील तब्बल ३६ घरांवर मंगळवारी प्रशासकीय बुलडोझर फिरविण्यात आला. कारण या जागेत संबंधितांनी अतिक्रमण केले होते, परंतु या गोरगरिबांना जागा दिली कोणी व यामागचा खरा सूत्रधार कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. दुसरीकडे यामागे एक ‘हिस्ट्री शीटर’ व त्याचा एक नातेवाईक हा खरा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जाते, परंतु लोकांनी या सूत्रधाराचे नाव घेतले नाही. कारण संबंधितांना धमकी मिळाली आहे? अशी चर्चा सुरू होती. या ‘हिस्ट्री शीटर’ने देखील या जागेत बेकायदा घर बांधले होते. संपादीत जागेत या घराचा अर्धा भाग येत होता, तो अर्धा भाग आज जमीनदोस्त करण्यात आला आहे. ∙∙∙

व्यवस्थापनाची पोलखोल

कला अकादमीच्या ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेत कोणतेही अडथळे येऊ नयेत, म्हणून मंत्री गोविंद गावडे यांनी कलाकारांसमवेत बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत आश्वासन दिले. मंत्री गावडे यांचे आश्वासन मिळाल्याने अनेकजण नाटकांच्या तयारीला लागले असतीलही. परंतु तत्पूर्वी कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावरून गोंधळ उडाल्याने त्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली. या दलाच्या आत्तापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. परंतु आज झालेली बैठक महत्त्वाची ठरली, त्यात प्रख्यात ध्वनी संयोजक रॉजर ड्रेगो, प्रकाश संयोजक शीतल तळपदे यांनी केलेल्या पाहणीचा विषय महत्त्वाचा ठरला. ही पाहणी करण्यासाठी म्हणे एक तियात्र सादर झाले. त्यावेळी ड्रेगो व तळपदे यांना दोष पाहता आले. एरव्ही रंगमंचावर सहा माईकमध्ये ध्वनी यंत्रणेचे काम होत होते, परंतु कालच्या कार्यक्रमाला म्हणे बारा माईकचा वापर करावा लागला आणि व्यवस्थापनाचा पोलखोल झाला. तपासणी करणाऱ्यांना तो मुख्य दोष दिसून आल्याने, पुढे काय अहवालात असणार हे सांगायला नको. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT