anand Dimati.jpg
anand Dimati.jpg 
गोवा

"आम्हाला मृत्यू समोर दिसत होता"; गोव्यात परतल्यावर आनंदने सांगितली आपबीती

योगेश दिंडे

हळदोणे: तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) इशारा पी 305 बार्जचा (Barge 305) कॅप्टन राकेश बल्लव व एफकॉन इन्चार्ज यांनी गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. याला सर्वस्वी कॅप्टन बल्लव जबाबदार असल्याचा गंभीर आरोप या दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमन आनंद डिमट्टी (22वर्षे, हळदोणे) याने दै. ‘गोमन्तक’शी बोलताना केला. (Anand Vadatti, who returned safely from Barge-305, shared his experience)

अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम त्याच्याच शब्दात...
तौक्ते चक्रीवादळ व पावसामुळे मध्यरात्रीपासूनच आमची बार्ज अधिक गतीने समुद्रात हेलकावत होती. कुठल्याही क्षणी बार्ज अजस्र लाटांच्या माऱ्यात समुद्राच्या पोटात जाईल, याचा नेम नव्हता. सर्वांची एकप्रकारे बोबडी वळली होती, प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके गतीने धडधडत होते. आम्हा सर्वांना मृत्यू समोर दिसत होता. मात्र तरीही आम्ही एकमेकांना धीर देत होतो. बार्जवरील रुम क्रमांक 129 मधून तिघा सहकाऱ्यांसह बार्जवर येऊन मीही कॅप्टन काय सूचना करतात, याकडे लक्ष देऊन होतो. 17 मे दिवस उजाडला खरा पण आमच्यासाठी काळरात्रच होती. आकाशात काळेकुट्ट ढग, मुसळधार पाऊस, ताशी 180 ते 200 किलोमीटर वेगाने चक्रीवादळाने घातलेले थैमान आमच्या काळजाचा थरकाप उडवत होते. पहाटे अंदाजे पाच-साडेपाचच्या सुमारास बार्जचे दोन ॲँकर तुटले. त्यानंतर काही वेळाने उरलेले सहा ॲंकर तुटले. त्यामुळे बार्ज भरकटली. अजस्र लाटांच्या प्रवाहाबरोबर ती ओएनजीसीच्या अनमॅन आॅईल प्लॅटफार्मला आदळताच मोठा आवाज झाला. आम्ही एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला आदळलो. मूळ ठिकाणापासून बार्ज अनेक नॉटीकल मैल भरकटत फिरत होती. बार्जच्या मागील भागाला (स्टार बोर्ड साईड) मोठा तडा गेला होता. त्यामुळे बार्ज बुडणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे कॅप्टनने सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास बार्ज बुडण्याची शक्यता व्यक्त केल्यावर अनामिक भीतीची शिसारी अंगात संचारली. माझ्या इतर सहकाऱ्यांचीही भीतीने गाळण उडाली. तरीही बार्जवरील मुख्य अभियंता शेख साहेब यांनी आम्हाला धीर दिला. काही होणार नाही. सर्वजण सुखरुप वाचू, असा विश्वास दिला. माझे डोके बधीर झाले होते. आता जी परिस्थिती येईल, त्याला तोंड देण्याचा निश्चय सर्वांनी केला. 

Yaas:चक्रीवादळाचा गोव्याच्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?
सर्वांनी लाईफ जॅकेट घालून तयार राहावे, असे आदेश कॅप्टननी दिले. त्याप्रमाणे आम्ही जॅकेट घालून पुढील आदेशाची वाट पाहत होतो, देवाचा धावा करत होतो, कुठूनतरी मदत मिळेल, या आशेवर होतो. बार्जवरून आपत्कालीन व्यवस्थेस संदेश पोहोचले होते. मात्र चक्रीवादळ, चमकणाऱ्या वीजा, अजस्र लाटा व पावसाचे तांडव या  प्रतिकूल परिस्थितीमुळे भारतीय नौदल व हवाई दल यांना मदत करण्यात मोठे अडथळे येत होते. निसर्गाच्या रौद्र रुपापुढे सारी यंत्रणा हतबल झाली होती. घराच्यांचे चेहरे डोळ्यांपुढे येत होते. सर्वांची आठवण येत होती. आपला आज मृत्यू होणार याची खात्री पटली. मात्र मनात अजूनही आम्हाला कोणीतरी वाचवेल, हा आशेचा किरण होता. मात्र वादळी स्थितीपुढे तो अशक्यही वाटत होता.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाच्या तडाख्याने जेव्हा बार्ज बुडू लागली तेव्हा कॅप्टनने सर्वांना आदेश दिले. जीव वाचवायचा असेल तर लगेच उड्या मारा. आदेश येताच माझ्या जवळच्या सहकाऱ्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे बघितले. आमच्यासमोर अन्य कुठला पर्यायच नव्हता. बार्ज जवळजवळ ऐंशी टक्के बुडाली होती. जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारणे हा एकच पर्याय होता. देवाचे नाव घेतले आणि आम्ही साऱ्यांनी अजस्र लाटांनी उसळलेल्या समुद्रात एका मागोमाग उड्या मारल्या. संपले सारे... असे वाटले. अजस्र लाटा जणू आम्हा सर्वांना गिळण्याच्याच तयारीत होत्या. आमच्या मागोमाग बार्जवरील इतर सर्व सहकाऱ्यांनीही उड्या मारल्या. बोटीवर एकूण 273 लोक होते. बार्जवरून उड्या मारल्यानंतर सगळेच समुद्रात गडप झाले होते. समुद्राच्या लाटा आम्हाला जणू मिठीतच घेण्यासाठी आमच्यावर आदळत होत्या. सुमारे वीस ते तीस मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. लाटांसह आम्ही सर्वजण वरखाली पाण्यावर आपटत होतो. तेवढ्यात पुन्हा एकदा कसलातरी आवाज झाला. कॅप्टनच्या आदेशानुसार, लाईफ राफ्ट टाकण्यात आला. मात्र पाण्यात पडून उघडल्यावर तो बार्जला आपटून फुटला. लाईफ राफ्टवर किमान पंधरा ते वीसजण वाचू शकले असते. त्यामुळे उरली-सुरली आशाही मावळली. अजस्र लाटा आम्हाला मृत्युच्या दारात खेळवत होत्या. आम्ही गटांगळ्या खात होतो, देवाचा धावा करत होतो.                       Goa: आगोंद, पाळोळे किनाऱ्यांची होतेय झीज; संरक्षक भिंत उभारण्याची गरज

"15 मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. मात्र बार्जच्या कॅप्टनने व एफकॉन इन्चार्ज यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळे 17 मे रोजी बार्जवरील 270 जणांचा जीव संकटात सापडला. आतापर्यंत दुर्घटनेतील 70 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. माझे दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो, नाहीतर या मृतांच्या यादीत माझेही नाव आले असते. सतरा रोजी सकाळी सातच्या सुमारास बार्जचे ऑटो अँकर तुटल्याने बार्ज भरकटली व ती सुमारे दहाच्या सुमारास ओएनजीसीच्या ऑईल प्लॅटफार्मला धडकली. संध्याकाळी पाचच्या सुमारास बार्ज ऐंशी टक्के बुडाल्याने आम्हाला नाईलाजाने समुद्रात उडी घ्यावी लागली. उडी मारल्यानंतर बार्जचे साहित्य हाता-पायाला, पाठीला लागून थोडी दुखापत झाली. सलग पंधरा तास अजस्र लाटांशी झुंज देत होतो. चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे बचाव मोहिमेस मर्यादा येत होत्या. तीन ते चारवेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले. अखेर नौदलाच्या बचाव पथकाने सातत्याने शर्थीचे प्रयत्न करून आमचा जीव वाचविला. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, ऑफशोअर एनर्जी यांनी बचाव मोहीम अखंडपणे सुरू ठेवली होती. बार्जवरील फायरब्रिगेड टीममध्ये आम्ही एकूण तेराजण होतो. त्यातील योगेश नावाच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातून मी एकटाच होतो. ऑफशोअर एनर्जी जहाजातून स्क्रंबल नेटच्या साहाय्याने मला व माझ्या काही सहकाऱ्यांना वर ओढण्यात आले. आम्हाला वाचवल्यानंतर सुमारे आठ ते -नऊ तास शोधमोहीम राबवण्यात आली. 19 तारखेला यलो गेट येथे आम्हाला आणण्यात आले. पोलिसांनी आमचा जबाब लिहून घेतला व नंतर आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 20 मे रोजी मला बसने गोव्याला पाठवण्यात आले."

आनंद म्हणाला, आम्ही सारेजण हेलिपॅडवर एकत्र आलो होतो. कॅप्टनने उडी मारण्याचे आदेश येताच समुद्र पातळीपासून सुमारे पन्नास मीटर उंचीवरील बार्जवरून आम्ही सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या. उड्या मारताना काहींजणांचे डोके हेलकावणाऱ्या बार्जला आपटले. त्यामुळे काहींचा त्यात मृत्यू झाला असावा. आपल्यालाही उजव्या पायाला, हाताला व पाठीला जखम होऊन दुखापत झाल्याचे आनंदने सांगितले.        

दहा ते पंधरा जणांचा डोळ्यांदेखत मृत्यू
माझ्या डोळ्यासमोरच उसळत्या लाटांवर पाण्यावर आपटणाऱ्या दहा ते पंधरा सहकाऱ्यांचा नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटून मृत्यू झाल्याचे आनंदने सांगितले. उत्तर प्रदेशमधील अमित सिंग नावाचा माझा सहकारी माझ्याशेजारी तरंगत होता. सलग तेरा ते चौदा तास पाण्यात राहून तो दमला होता. अजस्र लाटांचा मारा त्याला सहन झाला नाही. त्यातच दुर्दैवाने त्याच्या लाईफ जॅकेटची क्लिप सुटून तो लाटेसह पाण्यावर आदळून पाण्याखाली गेला तो वर आलाच नाही. त्यामुळे मी रडकुंडीला आलो. माझ्या डोळ्यांदेखत माझे सहकारी बुडत होते. पण मी पाहण्याखेरीज काही करू शकलो नाही, अशी खंत आनंदने व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT