सासष्टी: म्हातारपण ही जीवनातील एक सुंदर भेट आहे. मात्र, म्हातारपणाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तरीही प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा विचार स्वत:च करावा. आपले म्हातारपण परस्वाधीन न होता जगा, असा मूलमंत्र प्रसिद्ध सिने अभिनेते तथा मानसशास्त्रज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी दिला.
समाजकल्याण खाते, ‘द हमसाथ ट्रस्ट गोवा’ आणि ‘गोवा लाईव्हलीहूड फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘टुगेदर इन टू द ट्विलाईट’ (एकत्र संधी प्रकाशात) वार्तालाप कार्यक्रमात डॉ. आगाशे बोलत होते. त्यांनी आपले विचार मांडताना ‘चंद सासें’, ‘ओढ’ या हिंदी आणि मराठी लघुपटांबरोबरच एका मोबाईल कंपनीची जाहिरात दाखवली.
हा कार्यक्रम गोमंत विद्या निकेतनच्या फोमेन्तो ॲम्फिथिएटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, ग्रामीण विकास मंडळाच्या संचालक दीपाली नाईक, गौरव हळदणकर, बेग, आशा वेर्णेकर आणि मान्यवर उपस्थित होते.
आयएएस अधिकारी दौलत हवालदार म्हणाले, आता म्हातारपण तीनपटीने वाढले आहे. म्हातारपणी शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्थिर असणे महत्त्वाचे आहे. म्हातारपणात प्रत्येकाने स्वत:ला क्रियाशील ठेवणे आवश्यक असते. आपल्या क्षमतेनुसार प्रवास करावा, आपली आवड-छंद जोपासावेत, असे हवालदार यावेळी म्हणाले. सूत्रसंचालन निकिता गुप्ता यांनी केले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, जेव्हा आपल्याला वाटते की, आपण आता दुसऱ्यावर पूर्णत: अवलंबून आहोत आणि त्याचा त्रास स्वत:ला व सभोवतालच्या व्यक्तींना होत आहे, तेव्हा इच्छा मरणाचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. प्रत्येकाचे म्हातारपण हे विलक्षण असते. म्हातारपणी एकाकीपणा जास्तीत जास्त टाळावा. सकारात्मक मानसिकता बाळगावी आणि आत्मविश्वासाने जगावे. मरण हा जगण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.