Cash For Job Goa DGP Alok Kumar
पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ पोलिसांनी शुक्रवारपर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. या प्रकरणांचा तपास करणाऱ्या पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसून, राज्य पोलिस योग्य दिशेने तपास करीत आहेत. या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्याचा किंवा गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचा कोणताही मानस नाही, तशी स्थिती निर्माण झाल्यास ते अधिकृतरित्या जाहीर केले जाईल, असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.
दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सावंत म्हणाल्या, कॅश फॉर जॉब प्रकरणात दक्षिण गोव्यात आतापर्यंत १२ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यात २० जणांना गजाआड केले आहे. त्यात सहा महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. शिवाय यात दोन सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु अद्याप या प्रकरणात कोणाचाही राजकीय कनेक्शन समोर आलेले नाही. २०१५ पासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगत सावंत म्हणाल्या, काही प्रकरणांत कारवारपर्यंत नाळ जोडल्याचे समोर आले आहे. एकूण पाच कोटींच्या वर ही फसवणूक झाल्याचे तक्रारीतून दिसून येते.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्यातील नोकरी घोटाळ्याची कबुली दिल्याबद्दल डीजीपींचे कौतुक केले; परंतु राज्यातील तरुणांना सत्य जाणून घ्यायचे आहे. राज्यात १२ वर्षे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य उघड करणे गरजेचे आहे. या घोटाळ्यात ‘गॉडफादर्स’, ‘गॉडमदर्स’, ‘बाबा’ यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. कारण राजकारणी सहभागी नसतील तर त्याब्यात घेतलेल्या संशयितांचा सहभाग नसावा. या प्रकरणाविषयीचे गांभीर्य ओळखून त्यांची सखोल चौकशी होण्यासाठी चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलिसांनी तपास पूर्ण होण्याआधीच नेत्यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी काही नेत्यांची नावे घेतली आहेत, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे, असे पालेकर यांचे म्हणणे आहे. आवाजाच्या रेकॉर्डिंगचे फॉरेन्सिक विश्लेषण झाले आहे का? ज्या पुराव्यांवर राजकीय नेत्यांना निर्दोष घोषित केले गेले, त्यावर योग्य तपास झाला आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.
महासंचालक म्हणाले, राज्यभर काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरण गाजत आहे, याप्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. ज्या तक्रारी येत आहेत, त्यानुसार अटक होत आहे. मी आणि पोलिस महानिरीक्षक या प्रकरणावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे एसआयटी स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ताब्यात घेतलेल्या प्रमुख संशयितांनी कोणाला सरकारी नोकरी दिल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.
उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक कौशल यांनी सांगितले की, उत्तर गोव्यात १७ फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी १३ संशयितांना अटक केली आहे. प्रिया यादव प्रकरणात ११६ ग्रॅम सोने जप्त केले आहे. डिचोलीतील एका प्रकरणात एका पोलिस शिपायाचे नाव पुढे आले असून, त्याला तात्काळ निलंबित केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.