Ashoka's Flowers
Ashoka's Flowers Dainik Gomantak
ब्लॉग

अशोकाच्या फुलांचा बहर

दैनिक गोमन्तक

रस्त्याच्या कडेला पोर्तुगिजांनी लावलेल्या उंच आणि दाट पाने असलेल्या झाडांना आपण गैरसमजाने अशोक म्हणतो पण ती अशोकाची झाडे नव्हेत. खरा अशोक किंवा सीता अशोक थोडासा दुर्मिळ आहे. सदाहरित जंगलांमध्ये मोठ्या वृक्षांच्या सावलीमध्ये आढळणारा आणि सौंदर्याची खाण असलेला मध्यम आकाराचा वृक्ष म्हणजेच रक्ताशोक किंवा सीता अशोक. वसंत ऋतुच्या आगमनासाठी याचीही लगबग सुरू झालेली असते. मुळात ‘कडक ऊन्ह’ हीच या फुलांच्या बहरण्यासाठीच्या मागची मूळ प्रेरणा असते. शिशिरामुळे झालेली पानगळ आणि हवेतल्या उष्णाव्यामुळे जमिनीतील कमी झालेला गारवा, संपूर्ण सृष्टीला गर्भधारणेसाठी प्रेरक होतो. तोच हा वसंतोत्सव. कडक उन्हाळ्यात फलधारणा होणारे अनेक वृक्ष फुलांनी बहरतात. फुलांचे हे बहरणे या प्रक्रियेचा पहिला भाग असतो.

रक्ताशोक, पुष्पशोभिवंत असला तरी तो तितकाच पर्णशोभिवंतही आहे. पुष्पधारी फाल्गुनात हाही फुलू लागतो. वसंतोत्सवामध्ये त्याचा बहर वाढतच जातो. तपकिरी रंगाचे खोड आणि गुळगुळीत साल हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य. पाने लंबाकार, संयुक्त प्रकाराची असतात. या झाडाची पालवी देखील अविस्मरणीय आनंद देते. त्या नवपालवीचे सौंदर्य अवर्णनीय आहे. सध्या काही झाडांना पालवीही फुटत आहे. सुरूवातीला शेंड्यावर गुच्छधारी गुच्छ बाहेर येतात. पांढऱ्या करड्या रंगाची अतिनाजूक, मुलायम मग जांभळट , लाल गुलाबी आणि शेवटी पोपटी असा हा नव-पालवीचा सोहळा डोळ्यांचा पारणे फेडणारा असतो.

वसंत ऋतु, अशोकाचा फुलण्याचा मुख्य काळ असतो. बहरलेला अशोक डोळे भरून पाहणे म्हणजे एक लावण्य पर्वणीच असते. भगव्या पिवळसर, नारंगी, लाल फुलांचे मोठे फुलोरे हिरव्याशार पर्णसंभारात जणू पाचूचा कोंदणात माणके बसल्यासारखे भासतात. फुलांना पाकळ्याच नसतात तरीही रंगांची डोळे दिपवणारे उधळण, रक्ताशोक हे नाव सार्थ ठरवतात. सांतईनेझ चर्चच्या समोरच्या बाजूला एक जुना वृक्ष आहे. एनआयओ सभागृहाच्या समोर अशोकाची अनेक झाडे आहेत. दोन झाडे महावीर गार्डनमध्ये आहेत तर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येही अशोकाची अनेक झाडे आहेत.

चोर्ला घाटात, केरी ओलांडून वर गेल्यानंतर अशोकाचे बहरलेली अनेक झाडे सध्या दिसत आहेत. हिंदू आणि बौद्ध धर्मात या झाडाला पवित्र मानले जाते. अशोकवनात सीता याच झाडाखाली बसून होती असे म्हणतात- म्हणूनच हा सीता अशोक. स्त्रियांच्या विविध आजारांवर या झाडाची पाने, साल वापरली जाते. अशोकारिष्ट, अशोकाल्प ही या अशोकाच्या सालीपासून बनवलेली औषधे आहेत. त्यामुळे अशोक आयुर्वेदात बहुगुणी मानला जातो. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव ‘साराका इंडिका’ आहे. मूळचा भारतातील म्हणून हा इंडिका, तर त्याची फॅमिली सिसालपीनेसी आहे. सध्या तो बहरत असल्याने त्याला बारकाईने न्याहाळण्याची संधी सोडू नका.

-अनिल पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT