Ponda: गोव्यातील बांदोडकर मैदानाची डागडुजीविनाच दुरवस्था! नूतनीकरणाचे काम कधी होणार?

Ponda: सुदिन ढवळीकर यांनी आठ दिवसांत या मैदानाचे नूतनीकरण सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते.
Ponda | Bhausaheb Bandodkar Maidan
Ponda | Bhausaheb Bandodkar MaidanDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda: काशीमठ-बांदोडा येथे असलेले भाऊसाहेब बांदोडकर मैदान हे फोंडा तालुक्यातील एक आघाडीचे मैदान. 2015 साली सुरू झालेल्या या मैदानावर खेळाडूंची तसेच वॉकिंग ट्रॅकवर चालणाऱ्यांची भरपूर गर्दी असते. पण सध्या डागडुजीविना या मैदानाची दुरवस्था झाली आहे. वॉकिंग ट्रॅकला भेगा पडल्यामुळे वरून चालणे कठीण होत आहे. या मैदानाचे नूतनीकरण कधी होईल, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यानंतर मैदानाची अधिकच दुरवस्था झाली आहे. मागे ‘दै. गोमन्तक’ने या समस्येचा पाठपुरावा केल्यानंतर वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आठ दिवसांत या मैदानाचे नूतनीकरण सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर वॉकिंगकरता दोन ट्रॅक करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ढवळीकरांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कामाचा मुहूर्तही करण्यात आला होता.

तसेच, हे काम 20 डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याचा फलकही लावलेला. पण या दिवशीही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली असून हे नूतनीकरणाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार यावर सध्या चर्चा सुरू झालेली आहे.

हे क्रीडा मैदान असूनही क्रीडा खात्याच्या अखत्यारित नाही. ढवळीकर साबांखा मंत्री असताना या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत ते साबांखाकडे आहे. म्हणूनच ढवळीकर या मैदानाचे पुनर्वसन करतील, अशी अपेक्षा लोक बाळगून आहेत. पण डिसेंबर महिना संपत आला तरी काम सुरू झाले नसल्यामुळे या अपेक्षांना तडा जातो की काय, असे वाटायला लागले आहे.

फलक लावूनही निराशा

20 रोजीपासून नूतनीकरणाचे काम सुरू होणार असल्यामुळे मैदान नागरिकांकरिता बंद राहील, अशी सूचना देणारा फलक मैदानाच्या गेटकडे लावण्यात आला आहे; पण प्रत्यक्षात असे काहीच झालेले दिसत नाही.

राम कुंकळकर, अध्यक्ष, फोंडा विकास समिती-

‘दै. गोमन्तकमध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नूतनीकरणाबाबतची चक्रे फिरायला लागली होती. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तशी कृतीही सुरू केली होती. पण आता हा प्रकार म्हणजे ‘बोलाची कढी व बोलाचा भात’ तर नसावा ना, असे वाटायला लागले आहे. २० डिसेंबरचा मुहूर्तही साधला गेलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com