Panaji Smart City Rain : स्‍मार्ट सिटीला ‘अवकाळी’ ग्रहण! कामे रखडली

Panaji Smart City Rain : जागोजागी चिखल; त्रुटी दूर करण्यास ‘आयपीएससीडीएल’ला संधी
Panaji Smart City Rain
Panaji Smart City Rain Dainik Gomantak

Panaji Smart City Rain :

पणजी, राजधानी पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना काल शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्‍हा एकदा ग्रहण लागले.

गटारांमध्‍ये पाणी साचल्याने आणि जमीन भुसभूशीत होण्याची भीती असल्याने अवजड वाहनांचा कामासाठी वापर करण्याचे टाळण्यात आले. त्‍यामुळे ही वाहने एका ठिकाणी उभी करण्याशिवाय कंत्राटदारांकडे पर्याय राहिला नाही.

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पणजीत कामे सुरू आहेत. ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची सरकारने निश्‍चित केले होते. त्‍यात आता वाढ होऊ शकते. त्यातच अवकाळी पावसाने काल पणजी शहराला झोडपून काढले. त्यामुळे फक्त दीड- दोन तासांत पणजीतील रस्ते जलमय झाले.

स्मार्ट सिटीच्या कामासाठी वापरण्यात आलेली खडी, वाळू गटारात पडलेली असल्याने त्याचाही अडथळा पाणी वाहून जाण्यास झाला. शिवाय आल्तिनो टेकडीवरून वाहून आलेली माती, कचरा आणि पालापाचोळ्यामुळे गटारे तुंबली. रस्ते पाण्याखाली गेले आणि पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामांबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागले.

Panaji Smart City Rain
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

ज्या ठिकाणी खोदकाम करावयाचे आहे, त्याठिकाणी जेसीबी व अवजड वाहने वापरण्यात येतात, अशा ठिकाणचे रविवारी काम बंद ठेवण्यात आले होते. सांतिनेजमध्ये गटार कामही पूर्णपणे थांबले होते. पावसामुळे पदपथ खचले गेले. शिवाय मलनिस्सारण चेंबरभोवतालच्या खचलेल्या जागांची दुरुस्ती आयपीएससीडीएलला करावी लागणार आहे.

दरम्‍यान, या पावसामुळे नक्की कोठे जमीन खचत आहे, कोणत्या ठिकाणी भराव कमी झाला आहे, याबाबीही समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ही मजबूत दुरुस्ती कंत्राटदारांकडून आयपीएससीडीएलला करून घ्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी काही कर्मचाऱ्यांना घेऊन काम सुरू होते.

कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

पावसामुळे गटारे आणि रस्त्यांवरून वाहून आलेला कचरा हटविण्याचे काम आज रविवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे सुरू होते. आत्माराम बोरकर मार्गावरील गटारांची सफाई करण्याचे काम करण्यात आले. गटारावरील आच्छादने काढून तेथील साफसफाई केली जात होती. त्यासाठी जेसीबीचेही सहकार्य घेतले गेले. पुढील दोन दिवसांत रस्‍त्‍यावर आलेला कचरा, माती, दगडधोंडे काढण्‍यात येतील व नंतर कामे पुन्‍हा पूर्ववत सुरू केली जातील.

संजित रॉड्रिगीस यांनी केली पाहणी

आयपीएससीडीएलचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिगीस यांनी अधिकारी, कामावरील सुपरवायझर यांना घेऊन आज रविवारी सायंकाळी सांतिनेजमधील कामांची पाहणी केली. सांतिनेजमध्ये काँक्रीटीकरणाचा रस्ता निर्माण केला जात असल्याने यठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.

कालच्या पावसाने याठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे कोणत्या ठिकाणी जागा खचल्या आहेत, कोणत्या ठिकाणी केलेल्या कामात चुका राहिल्या आहेत, याबाबत त्‍यांनी माहिती जाणून घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com