Panaji Tourist : आठवडाभरात शॅक धोरण अधिसूचित ; सरकारची खंडपीठाला माहिती

अशी माहिती सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिल्याने ही याचिका खंडपीठाने निकालात काढली.
panaji tourist
panaji touristDainik Gomantak

Panaji Tourist : पणजी, राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाला असला, तरी अद्याप शॅक धोरणाची अधिसूचना जारी केलेली नाही. ही अधिसूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीस आली.

मात्र, शॅक धोरण येत्या आठवडाभरात अधिसूचित केली जाईल, अशी माहिती सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिल्याने ही याचिका खंडपीठाने निकालात काढली.

विद्याधर दाभोळकर आणि इतर दोघांनी शॅक धोरण अधिसूचित करण्यास विलंब होत असल्याची याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती. उच्च न्यायालयाने जून २०२३ मध्ये दिलेल्या निवाड्यात शॅक व्यवसाय वेळेत सुरू होण्यासाठी सरकारने करण्याच्या उपाय योजनांबाबत अनेक निर्देश दिले आहेत.

या निर्देशांची अंमलबजावणी पर्यटन खात्याकडून केलेली नाही. शॅक धोरण पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अधिसूचित करून त्याचे वितरण शॅकसाठी अर्ज केलेल्यांना वितरित केले जावे.

या शॅक व्यवसायासाठी आवश्‍यक असलेले दाखले तसेच परवान्यांसाठी एकखिडकी पद्धत अवलंबावी. त्यामुळे हे परवाने व दाखले मिळण्यास विलंब होणार नाही. ही पद्धत अजूनही सुरू केलेली नाही.

त्यामुळे शॅकचे वितरण झालेल्यांना यासाठी विविध खात्यांकडे धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे खंडपीठाने सरकारला हे शॅक धोरण अधिसूचित करून एकखिडकी पद्धत सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराच्या वकिलांनी केली.

सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बाजू मांडताना शॅक धोरणाची अधिसूचना आठवडाभरात काढण्यात येईल. विविध किनाऱ्यांवर शॅक्स निश्‍चित झाले आहेत.

मात्र, त्याचे वितरण झालेले नाही. याचिकादाराला शॅक अजून मिळालेला नाही. त्यामुळे ही याचिका सादर करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे सांगितले.

panaji tourist
Shack Policy in Goa - शॅक धोरणाची अधिसूचना या आठवड्यापर्यंत काढणार | Gomantak TV

याचिका अपरिपक्व

पांगम म्हणाले की, याचिकादार शॅकसाठी पात्र असल्याचा दावा करत असला तरी हे वितरण सोडतीने काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला शॅक मिळू शकते किंवा मिळूही शकणार नाही.

त्यामुळे त्याने सादर केलेली ही याचिका अपरिपक्व आहे. शॅक धोरण अधिसूचना अजून जारी करायची आहे. त्यापूर्वीच त्याने ही याचिका सादर केली आहे.

शॅकसाठी अर्ज केलेल्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. अखेर सरकारने दिलेल्या ग्वाहीच्या आधारे उच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com