New Zuari Bridge : नवा झुआरी पूल; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अद्भुत नमुना

झुआरी पूल यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतीय अभियांत्रिकी क्षेत्र जागतिक दर्जाचे ठरले आहे.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak

गोव्याच्या स्वरूपसुंदर प्रदेशांत अनेक नद्या वाहत असतात. त्यातील सगळ्यांत मोठ्या म्हणजे झुआरी व मांडवी. या दोन्हींचा उगम पश्चिम घाटात होऊन त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. झुआरी नदी जी पूर्वी ‘अघनाशिनी’ नावाने ओळखली जायची, ती गोव्याचे दक्षिण व उत्तर अशा दोन भागांत विभाजन करते. त्यामुळे उत्तर ते दक्षिण अंतर पार करायला झुआरी नदी पार करणे अपरिहार्य आहे.

गोव्याचा जो मुख्य हमरस्ता आहे, पत्रादेवी ते पोळे, ज्याला 1972 साली राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला गेला. (पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 आता 66) तो झुआरी नदीला कुठ्ठाळी येथे ओलांडत होता जिथे 1983 पर्यंत पूल नव्हता. त्यामुळे, सारी वाहतूक फेरीबोटीद्वारे होत असे. 1983 साली झुआरी पूल बांधण्यात आला. तेव्हाची रहदारी बघता तो फक्त दुपदरीच बनवला गेला होता.

अरबी समुद्रासमोर एकदम खारट अशा वातावरणात बांधलेला हा पूल अनेक कारणासाठी अकाली कमकुवत बनला व लगेच त्याची मोठी दुरुस्ती करायची गरज पडली. त्या दरम्यान या रस्त्यावरची रहदारी अतोनात वाढली व ती झेलायला जुना पूल एकदम अपुरा पडू लागला व दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली.

या सगळ्या कारणांमुळे नवा पूल बांधणे अनिवार्य ठरले व नव्या पुलाची मुहूर्तमेढ २०१६ साली झाली. हा पूल संपूर्ण वेगळा असा प्रकल्प नसून एकूण एक राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण योजनेखाली घेतला गेलेला आहे. त्यात हा 13.2 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाला प्राधान्याने मंजुरी दिली गेली. माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या गोव्याच्या बाबतीत असलेल्या उदारमतवादी धोरणामुळे हा 2,530 कोटीचा महागडा प्रकल्प एकदम ताबडतोब मंजूर झाला. माननीय गडकरीसाहेब हे आपल्या विषयावर प्रगल्भ ज्ञान ठेवून असतात व ते सतत अद्ययावत व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या शोधात राहतात व ते वापरण्यावर त्यांचा अतिशय कटाक्ष असतो.

बांबोळी येथे स्टेडियमजवळ चालू होऊन वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या अलीकडेपर्यंत असा एकूण 13.2 किमी लांबीचा हा प्रकल्प. त्यातील 8.54 किमी उभारीत पूल पद्धतीने, तर उरलेला 4.66 किमी जमिनीवरचा रस्ता या पद्धतीने संरचित करण्यात आला. पुलावरून वास्कोच्या दिशेने जायला व यायला दोन बगल पूल बांधण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारचे बगल पूल पिलार-जुने गोवे या रस्त्यावर जाण्या येण्यासाठी बांधण्यात आलेले आहेत. तसेच वाटेवरच्या स्थानिक गावांना जोडण्यासाठी अनेक बगल मार्ग बांधण्यात आलेले आहेत.

संपूर्ण प्रकल्प एकूण एक सहापदरी, पण फक्त झुआरी नदीवरचा मुख्य पूल तेवढा आठपदरी आहे. गोव्याच्या एकूण एक वाहतुकीची सध्याची परिस्थिती व भविष्यातील रहदारीची अतोनात वाढ लक्षात घेता, हा राज्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण असा प्रतिष्ठित पायाभूत प्रकल्प. या संपूर्ण प्रकल्पाची त्याप्रमाणे तीन भागांत विभागणी करून तीन वेगळ्या निविदा मागवण्यात आल्या. या तिन्ही निविदा दिलीप बिल्डकोन या इंदोर स्थित कंपनीने 1,403 कोटी रुपयांना प्राप्त केल्या.

या संपूर्ण प्रकल्पाचा झुआरी नदीवरचा पूल हा एक भाग. केबल स्टेड पद्धतीची संरचना वापरून हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अतिशय अद्ययावत पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण या पुलाची खास वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण लक्षांत घेऊ.

New Zuari Bridge
Mahadayi Water Dispute : सरकारच्या पापात सहभागी व्हायचे नाही; विरोधकांचा बैठकीवर बहिष्कार

लांब पल्ल्याच्या केबल स्टेड पुलाची संरचना व बांधकाम अतिशय कठीण, किचकट व आव्हानात्मक असते. त्याला अनुभवात्मक अशी मार्गदर्शक सूत्रे असत नाहीत. अशा पुलांची लांबी व उंची एकदम महाकाय असल्या कारणामुळे त्यांचा सांगाडा एकदम नाजूक, हलका व लवचीक बनतो व जोराने वाहणाऱ्या वाऱ्याचा भार व दबावामुळे हलू किंवा हेलकावे घेऊ शकतो. या कारणाने त्याची भूकंपविरोधी संरचना पण तंतोतंत करावी लागते.

पूर्ण पुलाची एकदम छोटी प्रतिकृती करून ती कृत्रिम वाऱ्याच्या प्रवाहात, बोगद्यात (विंड टनल) घालून तिचे परीक्षण करावे लागते. त्या अभ्यासात जो काही निष्कर्ष येतो तो घेऊन त्याचे किचकट विश्लेषण करून, संगणकावर एकदम अद्ययावत व खास असे तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर वापरून संरचना पूर्ण करावी लागते.

असल्या संरचनेत अनुभवी असलेले फारच थोडे तज्ज्ञ अभियंते जगात आहेत. भारतात असल्या पुलाची स्वतंत्र पद्धतीने संरचना करू शकणारे कोणीही अनुभवी अभियंते २०१६ साली आढळून आले नाहीत. त्यामुळे इर्वान वायके या फ्रान्सिसी अभियंत्याला आमंत्रित करून त्याला ते काम देण्यात आले. अत्यंत मोठा व महत्त्वाचा प्रकल्प असल्याने त्याचे काम तपासण्यासाठी दीवाय चेन या चिनी तज्ज्ञाला नियुक्त केले गेले. भारतीय औद्योगिक संस्थानाची(आयआयटी)ही मदत घेण्यात आली. त्याशिवाय प्रकल्पावर इतर काम बघायला नियुक्त केलेल्या अभियंत्यांची भरपूर जंत्रीच होती.

या पूर्ण पुलाला नदीत फक्त चार मनोरे (प्रत्येक बाजूला जोडीने दोन) आहेत, जे शंभर मीटर उंच आहेत. त्यामुळे ते वेर्णा असो किंवा बांबोळी, कुंडई असो किंवा मडकई, कुठूनही त्यांचे मनोहारी दर्शन होते. ते प्रत्येकी चौऱ्याऐंशी पाइल्स असलेल्या प्रचंड पायावर उभारले गेलेले आहेत. त्यांच्यामधले अंतर आहे तीनशे साठ मीटर, जेणेकरून हा कमानीच्या लांबीच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पूल ठरतो. पहिला मान जातो कोलकाता येथील विद्यासागर सेतू ज्याच्या कमानीची लांबी आहे चारशे सत्तावन्न मीटर.

झुवारी पुलाला मनोऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने दोन्ही बाजूला एकशे चाळीस मीटर लांब कॅन्टीलीवर कमानी आहेत, ज्यामुळे पुलाची एकूण लांबी होते सहाशे चाळीस मीटर. रुंदीच्या बाबतीत हा पूल भारतातील सगळ्यांत रुंद पूल आहे कारण तो अष्टपदरी असून सत्तावीस मीटर रुंद आहे. प्रत्येक दोन मनोऱ्यांवर चार चार पदरी वेगळे रस्ते आहेत जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांचा फक्त नदीतील पाया एकत्र आहे. प्रत्येक रस्त्याचे वजन घ्यायला केबलच्या दोन जाळ्या अशा एकूण चार जाळ्या आहेत. रस्त्याचे वजन घेणाऱ्या ज्या लोखंडी तुळया आहेत त्या पूर्णपणे यंत्रमानवाद्वारा बनवल्या गेल्या आहेत.

अशा तर्‍हेने शेवटी हा पूल अर्धा बांधून तयार झालेला आहे, जेणेकरून पूर्वेकडचा चौपदरी रस्ता वाहतुकीस खुला होत आहे. इतर सगळा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. त्यामुळे जुन्या झुआरी पुलावरचा तसाच बोरी पुलावरचा वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतुकीची दररोज होणारी कोंडी बंद होईल व वेर्णा नाक्यांवर कोंडी झाली नाही तर अर्ध्या तासांत पणजी मडगाव अंतर आरामात कापता येईल.

या पुलाच्या दोन्ही मनोऱ्याच्या मधोमध 125 मीटर उंच असा आणखी एक मनोरा (एकूण दोन) बांधून, त्यांच्यावर फिरते उपहारगृह किंवा गॅलरी घालण्याची व वर जाण्यासाठी कॅप्सुल लिफ्ट घालण्याची योजना आहे, जेणेकरून ही गॅलरी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरू शकते व भरपूर महसूल मिळू शकतो. ते बांधून घेण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत.

अशा पद्धतीचे व संरचनेचे पूल भारतात कमी संख्येने आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात हे पूल सगळ्यांत अद्ययावत मानले जातात व त्यांची संरचना व बांधणी सर्वांत किचकट, कठीण व आव्हानात्मक समजली जाते. याशिवाय सगळ्यांत आधुनिक स्थापत्य अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा (स्टेट ऑफ आर्ट) वापर करून बांधल्यामुळे नवा झुआरी पूल हा एक अभियांत्रिकीचे- मार्वल ऑफ इंजिनिअरींग- समजला जातो.

त्यामुळे असा हा झुआरी पूल यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतीय अभियांत्रिकी क्षेत्र जागतिक दर्जाचे ठरले आहे. देशाचे नवे पुल, रस्ते, पायाभूत व मूलभूत सुविधा एकदम प्रगत पाश्चिमात्य देशाशी स्पर्धा करणाऱ्या ठरल्या आहेत. आपला देश असल्या प्रकल्पांद्वारे या क्षेत्रात दिवसेंदिवस नेत्रदीपक प्रगती करत आहे, जी भारतीयांसाठी एक अत्यंत समाधानाची व अभिमानाची गोष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com