National Sports Competition: यजमान संघाच्या संभाव्य पदकाला धोका! तनिशा क्रास्टोच्या माघारीने गोव्याला धक्का

देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूही स्पर्धेबाहेर
37th National Games Goa 2023
37th National Games Goa 2023Dainik Gomantak

गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वी यजमान संघाच्या संभाव्य पदकाच्या शक्यतेला धक्का बसला आहे. भारताची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिने आपण राज्याचे प्रतिनिधित्व करू शकणार नसल्याचे गोवा बॅडमिंटन संघटनेला कळविले आहे. महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत तनिशा पदकासाठी दावेदार होती.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धा खेळली जाईल. मात्र इतर आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा बॅडमिंटन स्पर्धांमुळे भारतातील प्रमुख बॅडमिंटनपटूंनीही राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली असून भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अगोदरच्या पात्र खेळाडूंची यादी बदलून नव्याचे यादी जाहीर केली आहे.

37th National Games Goa 2023
Hockey: मध्य प्रदेशकडून गोव्याचा 23-0 गोलने पराभव, स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

जागतिक क्रमवारीतील सातव्या क्रमांकाचा एच. एस. प्रणॉय, १३व्या क्रमांकावरील लक्ष्य सेन, २१व्या क्रमांकावरील किदांबी श्रीकांत, २८व्या क्रमांकावरील प्रियांशू राजावत हे पुरुष गटात खेळणार नाहीत.

दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीतील सुवर्णपदक विजेत्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांचाही राष्ट्रीय संघटनेच्या यादीत समावेश नाही.

राष्ट्रीय स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेच्या कालावधीत सिडनी, डेन्मार्क, अबुधाबी, चेक प्रजासत्ताक, फ्रेंच ओपन, इंडोनेशिया ओपन या स्पर्धा होत आहेत. प्राप्त माहितीनुसार, यावर्षी जागतिक स्पर्धेत पुरुष एकेरीत ब्राँझपदक जिंकलेला प्रणॉय जायबंदी आहे, तर इतर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळतील.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा गुण महत्त्वाचे

राष्ट्रीय स्पर्धेच्या कालावधीत महिला दुहेरीत निष्णात असलेली तनिशा अबुधाबी मास्टर्स या स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मानांकन गुण खेळाडूंसाठी महत्त्वाचे असतात.

त्यामुळे आपल्या दुहेरीतील नियमित सहकारी खेळाडूची साथ सोडून तनिशा गोव्यात खेळू शकत नाही. एक मात्र खरं, तिच्या अनुपस्थितीचा गोव्याचा बॅडमिंटन संधीवर मोठा परिणाम झाला आहे,’’ असे गोवा बॅडमिंटन संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा तनिशाची नियमित सहकारी आहे.

या खेळाडूंवर असेल लक्ष

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये इंडोनेशिया मास्टर्स विजेता जागतिक क्रमवारीतील ३९व्या स्थानावरील किरण जॉर्ज (केरळ), सध्याचा राष्ट्रीय विजेता जागतिक क्रमवारीत ४६व्या स्थानावरील मिथुन मंजुनाथ (कर्नाटक), माजी राष्ट्रीय विजेता सौरभ वर्मा (मध्य प्रदेश) हे पुरुष गटात, तर महिलांत जागतिक क्रमवारीतील ३८व्या क्रमांकावरील आकर्षी कश्यप (छत्तीसगड), ४७व्या क्रमांकावरील मालविका बनसोड (महाराष्ट्र), ४९व्या क्रमांकावरील अश्मिता चलिहा (आसाम) या प्रमुख खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com