Comba Bridge : कोंब येथील पुलाला प्राधान्य का नाही : विजय सरदेसाई

Comba Bridge : मुख्यमंत्र्यांनी मडगावकरांना स्पष्टीकरण द्यावे
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Comba Bridge :

सासष्टी, मडगाव येथील कोलवा सर्कल ते आके पॉवर हाऊसदरम्यानच्या रिंग रोडवर मध्यभागी रस्ताच पूर्ण झालेला नाही.

आता हा रस्ता पूर्ण करण्यासाठी झोपडपट्ट्या व व्यापारी आस्थापनांना हात न लावता फोमेंतो कचेरी, ला फ्लोर हॉटेल ते व्हिक्टर हॉस्पिटलपर्यंतच्या उड्डाण पुलाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, कोंब येथील रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाला मान्यता का दिली नाही, अशी विचारणा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

कोंब येथील रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्र्वासन विधानसभेत एका प्रश्र्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला दिले होते. मी हा प्रश्न आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

जेव्हा कोंब येथील रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल व रिंग रोडवरील उड्डाण पुलाचा खर्च जवळपास एकच असल्याने अद्याप रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाच्या मान्यतेला कुठे माशी शिंकली, याचे स्पष्टीकरणसुद्धा मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Vijai Sardesai
Goa Statehood Day 2024: गोवा घटकराज्य दिन विशेष! समृद्ध वारसा, इतिहास आणि संस्कृती

विकासाला प्राधान्यक्रम नाही

सरदेसाई म्हणाले की, मडगावचा विकास केवळ आमदार दिगंबर कामत यांच्या व्होट बॅंकेचे हित लक्षात घेऊनच केला जातो. हा विकास आराखडा तयार करताना वाहतूक कोंडीचा विचार केला जात नाही. उड्डाण पुलाला मान्यता देताना वाहतूक आराखडा किंवा त्याचे वैज्ञानिक रस्ता व्यवस्थापन तत्त्वांचा विचारही केला नसल्याचे सरदेसाई यांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाने मडगावात जी कामे सुरू आहेत, त्यांना प्राधान्यक्रम नाही.

वर्दळीच्या ठिकाणीच दुर्लक्ष

रिंग रोडच्या उड्डाण पुलापेक्षा रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल महत्त्वाचा आहे. या परिसरात वाहनांची व लोकांची वर्दळ असते. रेल्वे फाटक बंद झाल्यावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे कोंब येथील रेल्वे फाटकावरून उड्डाण पुलाला प्राधान्य का नाही, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावकरांना द्यावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com