Panaji News : दोन मंत्र्यांना डच्चू? मंत्रिमंडळात फेरबदल

Panaji News : मंत्रिमंडळातून नुवेचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी,लोकसभा निवडणुकीत विशेषतः दक्षिण गोव्यात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम म्हणून मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असून दोन मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार प्रदेश पातळीवर सुरू झाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळातून नुवेचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दक्षिण गोव्यातील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा पराभव झाला. याची कारणमीमांसा भाजपच्या बैठकीत करण्यात आली आहे.

मंत्रिपद देऊनही पक्षाचे काम न करणाऱ्यांची गरज काय, असा पक्षाचा प्रश्न आहे. विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीवेळी काहीजणांनी भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला होता. २०२७ मध्ये तशी परिस्थिती आली तर याचा विचार करावा लागेल, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्लीत होणार खलबते

तानावडे म्हणाले की, मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे आणि मंत्रिमंडळातून कोणाला वगळायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यामुळे मी केलेल्या सूचनांविषयी जाहीरपणे सांगू शकत नाही.

त्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते तपशीलवार सांगू शकतील; पण पक्षाचे म्हणणे काय आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले आहे. दिल्ली दौऱ्यावेळी ते वरिष्ठांना याची कल्पना देतील, अशी अपेक्षा आहे.

संकल्प आमोणकरांना लॉटरी

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या आश्वासनाची पूर्ती या खेपेला केली जाणार असल्याचे कळते. यासाठी उत्तर गोव्यातून भाजपला अपेक्षित मताधिक्य न देणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती मिळाली.

प्रदेशाध्यक्षांकडून दुजोरा : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणी किती काम केले, याची माहिती पक्षाकडे आहे. मंत्रिपदी असतानाही निवडणुकीतील कामाला कोणी प्राधान्य दिले नाही, याचीही माहिती आहे. ती माहिती मुख्यमंत्र्यांना आम्ही दिली आहे.

मंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा

सासष्टीत मतांचे ध्रुवीकरण झाले आणि तसे होणे गृहीत असले तरी इतर मतदारसंघांत सासष्टीत कॉंग्रेसला मिळालेल्या मताधिक्याच्या तोडीस तोड असे मताधिक्य भाजपचे आमदार, मंत्री असलेल्या मतदारसंघांत (मडकई वगळता) का मिळू शकले नाही, याची कारणेही भाजपने शोधली आहेत. त्याआधारेच मंत्रिमंडळ फेररचनेचा निर्णय अंमलात आणला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Panaji
Goa Congress:...तर दोन दिवसांत गोव्यात काँग्रेसचे सरकार; विरोधीपक्षनेते आलेमाव यांनी सांगितले गणित

या मुद्यांवर झाली चर्चा

सभापती रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस एका बाजूने असूनही अपेक्षित मते का मिळाली नाहीत?

लोकसभा उमेदवारीवर दावा करणारे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर आपला ठसा दक्षिण गोव्यावर का उमटवू शकले नाहीत?

केपे मतदारसंघात बाबू कवळेकर भाजपला मताधिक्य का मिळवून देऊ शकले नाहीत?

२० पैकी १५ आमदार असून त्यातील ६ जण मंत्रिपदी असतानाही दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव का झाला?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com