Goa News: वडाकडे-उसगाव बाराजण सर्कलची दुर्दशा!

अक्षम्य दुर्लक्ष : वाहनांच्या धडकेने स्थिती बनलीय धोकादायक; परिसर विकासाच्‍या प्रतीक्षेत
Usgaon Circle Area
Usgaon Circle Area Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा महत्त्वाच्या उसगाव परिसराकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले असून वडाकडे बाराजण तिठ्यावरील सर्कल तर केवळ जाहिरात फलकांसाठीच बांधले आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

गेली अनेक वर्षे या सर्कलचे सुशोभीकरण झालेले नाही. त्यातच वाहनांच्या धडकांमुळे या सर्कलची दुर्दशा झाली आहे. एकंदर उसगाव परिसरच सध्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

उसगाव-गांजे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या वडाकडे येथील सर्कलची दयनीय अवस्‍था झालेली आहे. या ठिकाणी फोंडा, तिस्क, वाळपई तसेच डिचोली असे चार रस्ते एकत्रित येतात. हा मुख्य रस्ता असला तरी मागच्या काळात या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने बराच वेळ घेतला.

Usgaon Circle Area
Rain Water Harvesting: रेन वॉटर हार्वेस्‍टिंगसाठी घरांना मिळेल अनुदान

उसगावातील आदिनाथ देवाच्या कालोत्सवावेळी घाईगडबडीने या सर्कलवरील खड्डे बुजवण्यात आले, पण तोपर्यंत अनेक अपघात या ठिकाणी झाले होते. हे खड्डेही व्यवस्थित बुजवण्यात आले नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. निदान रस्ते तरी व्यवस्थित करा, अशी उसगाववासीयांची मागणी आहे.

तिस्क-उसगावातही हीच स्थिती असून फोंड्याचे उपनगर म्हणून नावारुपाला येणारा हा परिसर अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणी तीस वर्षांपूर्वी बांधलेले पीडीए मार्केट संकुल कोसळण्याच्या स्थितीत असूनही सरकारी यंत्रणेने डोळेझाक केली आहे.

त्यामुळे भविष्यात तिस्क - उसगाव परिसराबाबत सरकारचे विकासाच्या दृष्टीने नेमके नियोजन काय आहे, असा सवाल उसगाववासीय विचारत आहेत.

वडाकडे-उसगावातील चार रस्त्यांच्या तिठ्यावरील सर्कलला अनेक अवजड वाहनांनी धडका दिल्याने या सर्कलची दुर्दशा झालेली आहे. आठवडाभरापूर्वी याच सर्कलला अठरा चाकी अवजड कंटेनरने ठोकर दिल्याने लोखंडी कठड्याचा एक भाग मोडला गेला.

कसेबसे हे अवजड वाहन तेथून हटविण्यात आले असले तरी अजून कठड्याची दुरुस्ती झालेली नाही. या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे कायम अपघात होत असून त्यातील काही जीवघेणेही ठरले आहेत.

मासळी, भाजीबाजार भरतो रस्त्यावर

उसगाव-वडाकडे येथे मासळी व भाजीचा बाजार भर रस्त्यावर भरत आहे. या ठिकाणी मासळी बाजार भरवण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला मासळीच्या टोपल्या ठेवून मासेविक्री केली जाते. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली असते.

त्यातच मासे व भाजी विकत घेण्यासाठी ग्राहक रस्त्यावरच गर्दी करीत असल्याने अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. या मासे व भाजीविक्रेत्यांना याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत स्थलांतर केले किंवा योग्य शेड बांधून दिली तर विक्रेते व ग्राहकांची योग्य सोय होऊ शकते.

Usgaon Circle Area
Goa Environment: पेडणेतील ‘धवरूख’च्‍या तरुणांची कृतिशील मोहीम

तिस्क मार्केट संकुल धोकादायक

उसगाव भाग फोंडा मतदारसंघात होता त्यावेळी आमदार व मंत्री रवी नाईक यांच्या कारकिर्दीत थोडाबहुत विकास झाला होता. तिस्क- उसगावातील मार्केट संकुलही त्याचवेळी साकारले गेले. पण आता या मार्केट इमारतीची रयाच गेली असून धोकादायक ठरलेल्या या तिस्क येथील मार्केट संकुलात ग्राहक व विक्रेत्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते.

या संकुलाची एकतरी पूर्णपणे दुरस्ती करायला हवी, अन्यथा ते पाडून त्या ठिकाणी नवीन अद्ययावत सुविधांनी युक्त संकुल उभारणे आवश्‍यक आहे. पण त्यादृष्टीने कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com