बेरोजगारी वाढली, खाणबंदीने कंबरडे मोडले, ‘अपरान्‍त’, ‘श्रुतिक इस्पात’नेही गाशा गुंडाळला; सांगेतील विदारक स्थिती

सांगेत रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्‍पच नाही!
Sanguem
Sanguem Dainik Gomanatak

मनोदय फडते

दहा वर्षांपूर्वी सांगे तालुक्‍याचा विकास होणार असे वाटू लागले होते. परंतु अचानक मरगळ आली. सांगेची बाजारपेठ फुलून जायची ती कष्टी-काले येथील ‘अपरान्‍त’ या लोह प्रकल्पामुळे. खाणबंदीचा फटका बसण्यापूर्वीच हा प्रकल्प बंद पडला.

त्‍यामुळे शेकडो कर्मचारी, कामगार, व्यावसायिक बेकार झाले. सांगेची बाजारपेठ फुलण्याआधीच कोमेजू लागली. त्या पाठोपाठ खाणबंदीमुळे ‘तिंबलो’सारख्‍या मोठ्या कंपनीने आपले आस्थापन बंद केले.

शेळपे औद्योगिक वसाहतीत आलेला ‘श्रुतिक इस्पात’ हा पोलाद प्रकल्पही बंद पडला. आता एकमेव ‘वरुण ब्रेव्हरिज’ हा शीतपेय प्रकल्प आहे. त्याचीही स्थिती दयनीय झालेली आहे.

जिथे औद्योगिक वसाहत निर्माण केली आहे, तेथे जाण्यासाठी चांगल्या प्रकारे वाहतुकीची सोय नाही. त्‍यामुळे प्रकल्पाच्या वाहतुकीबाबत निर्माण होणारी अडचण पाहता अन्य व्यावसायिक शेळपे वसाहतीत येण्यास मागे-पुढे होत असतात. याचा विचार न करता वसाहत निर्माण केली आहे. खासगी क्षेत्रात काम करून आपली उपजीविका करणारा मोठा वर्ग सांगे भागात होता.

ऊसशेतीलाही खाणबंदीसारखे ग्रहण

सांगेचा आर्थिक कणा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहिले जायचे, तो खाण व्यवसायच बंद झाल्‍यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणजे ऊसशेती.

पण त्या व्यवसायालासुद्धा खाणबंदीसारखेच ग्रहण लागले आहे. ‘संजीवनी’ यावर्षी सुरू होणार, पुढील वर्षी सुरू होणार असे वारंवार सांगितलं गेलं. आता पाच वर्षे झाली तरी अजून तो काही सुरू होण्‍याचा मागमूस नाही.

कृषी क्षेत्रातील अन्य पिकांतून रोजीरोटी मिळण्यासारख्‍या बागायती, माळरानावर तयार होणारी पिके. पण त्या क्षेत्रातही वन्यजीव त्रासदायक ठरू लागल्याने, हा व्यवसायसुद्धा धोक्यात आला आहे.

‘संजीवनी’ बंद, पर्यटन ठप्‍प, मग खायचे काय?

1. वास्तविक सांगे हा कृषीप्रधान भाग. तेथे मोठ्या प्रमाणात साधनसुविधा उपलब्ध असताना, खाणबंदीनंतर दुसरा मोठा धक्का दिला तो ‘संजीवनी’ बंद करून. त्‍यामुळे बेकारीत अधिक भर पडली. खाणव्यवसायाला साधारणत: तोंड देण्यारा तिसरा व्यवसाय म्‍हणजे पर्यटन. पण आता त्‍यालाही बाधा लागली आहे.

2. पर्यटक बुडू लागले म्हणून सर्व धबधबे बंद करून टाकण्यात आले. वास्‍तविक त्यावर उपाययोजना करून लागलीच व्यवसाय सुरू करता आला असता. पण ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती झाली आहे.

3. पर्यटकांना पाण्यात उतरण्यास बंदी घाला, पण पर्यटनस्‍थळी येण्‍यास बंदी घालणे म्‍हणजे तो व्यवसाय संपुष्टात आणणेच होय. याची फळे आता नेत्रावळीवासीय भोगू लागले आहेत.

‘वरुण ब्रेव्हरिज’ची स्‍थिती दयनीय

‘वरुण ब्रेव्हरिज’ हा प्रकल्‍प सुरू असला तरी तो कधी गाशा गुंडाळेल हे सांगता येणार नाही. कधी कामगार आत तर कधी बाहेर अशी स्‍थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प सांगेतील लोकांना खूप काही देतो असे नाही तर जेमतेम पगारावर आणि पूर्णतः आशेवर काम करून घेतले जात आहे.

त्या बाजूला असलेला गोव्यातील शीतपेय कंपनीचा प्रकल्प अद्याप सुरूच झालेला नाही. या व्यतिरिक्त शेळपे औद्योगिक वसाहतीत मासे डबा बंद करण्याचा प्रकल्प आहे. त्यात परप्रांतीय लोकच काम करू शकतात. साहजिकच सांगेवासीयांना रोजगार मिळावा असा कोणताही प्रकल्प तालुक्‍यात नाही.

Sanguem
कौतुकास्पद ! कृषी क्षेत्रातील पदवीधर 'श्‍‍वेता' करतेय ताडी काढण्‍याबरोबरच माड पाडण्याचं काम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com