Goa News Update 18 December 2023: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी घ्या जाणून...

राजकारण, क्राईम यासह राज्यातील दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा
Goa Live News Update 18 December 2023
Goa Live News Update 18 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले; 6 लाखाचा ऐवज लंपास

साखळीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाली आहे. शहरातील दोन फ्लॅट भर दुपारी चोरट्यांनी लक्ष्य केले. या दोन्ही घटनांमध्ये मिळून एकूण सहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चारचाकीतून हे चोरटे बिनधास्त आल्याची माहिती आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत.

उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी जाहीर! 

उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी पुरस्कारांची घोषणा. उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र- विनायक च्यारी (मेरशी पंचायत), सागर गावडे (मडकई पंचायत),आग्नेल डिसोझा माचादो (नादोडा पंचायत), सतीश वाघोणकर (हरवळे पंचायत).आयशा वायंगणकर आणि मिनेश तार या दोघांना उत्कृष्ट नोडल अधिकारी पुरस्कार. 19 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव.

शिवोलीत ड्रग्ज तस्करीप्रकरणी केरळच्या तरूणाला अटक; 16.44 लाखाचे ड्रग्ज जप्त

शिवोली येथील फुटबॉल मैदानाजवळ अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने केरळच्या तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे 16.44 लाख किंमतीचे एक्टसी व एलएसडी अंमलीपदार्थ जप्त केले. गेल्या आठवड्यात मोरजी येथे रशियन नागरिकाकडून 1 कोटीचे ड्रग्ज जप्त केले होते. त्याच्या चौकशीतून ही कारवाई करण्यात आली.

पोलिस खात्यातर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठीचे पुरस्कार जाहीर, डिचोली पोलिस स्थानक अव्वल, कुडचडे दुसऱ्या तर केपे तिसऱ्या स्थानी 

पोलिस खात्यातर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार डिचोली पोलिस स्थानक (प्रथम), कुडचडे पोलिस स्थानक (दुसरे) तर केपे पोलिस स्थानक (तिसरे) याला जाहीर झाले आहे. याशिवाय ५१ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक इनसिग्निया फॉर एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कामुर्लीत लहान मुलीचा चावा घेणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला अटक

कामुर्ली येथील दहा वर्षाच्या मुलीचा चावा घेणाऱ्या रॉटविलर कुत्र्याच्या मालकाला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ उर्फ रोशन श्रीपाद खोर्जुवेकर (वय 29) असे मालकाचे नाव आहे. याबाबत पांडुरंग खोर्जुवेकर यांनी तक्रार दिली होती. रविवारी (ता. 17) ही घटना घडली होती.

झुवारी पेट्रोलियम पाईपलाईन मुरगाव नगराध्यक्षांनी केली पाहणी

झुवारी पेट्रोलियमने ( ZIOL) कोणतेही काम करण्यापुर्वी आधी आम्हाला त्याची कल्पना द्यावी. लोकांची सुरक्षा सर्वात प्रथम प्राधान्य आहे. देस्तेरो येथे झुवारी पेट्रोलियमच्या पाईपलाईनची पाहणी केल्यानंतर मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकरांचे प्रतिपादन. या वेळी उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत उपस्थित होते.

99 जणांना सरकारी नोकऱ्या बहाल!

अनुकंपा तत्वावर 71 जणांना तर स्वातंत्र्यसैनिकांच्या 28 मुलांना गृह विभागामार्फत शासकीय नोकऱ्या बहाल करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे सोमवारी एकूण 99 जणांचा सरकारी नोकऱ्यात समावेश.

यात एलडीसी 17, एमटीएस 33, इन्व्हेस्टीगेटर 15, फिल्ड वर्कर 22, ज्युनियर स्टेनो 4, ड्रायव्हर 3, लॅब टेक्निशन 2, लॅब एसिस्टंट 1, फिशरीज सर्व्हेयर 1 आणि सर्विलन्स वर्कर 1 अशा नोकऱ्यांचा समावेश.

अ‍ॅप्रेंटिसशिप केली तरच सरकारी नोकरी - मुख्यमंत्री

सरकारी नोकरीसाठी अ‍ॅप्रेंटिसशिप करणे यापुढे सक्तीचे राहिल. अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या उमेदवारालाच सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दहावी नापास असाल तरीही मिळणार नोकरी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दहावी नापास होऊन एक वर्ष आय.टी.आय कोर्स पुर्ण केल्यास दहावी उत्तीर्ण म्हणून गृहित धरले जाईल. तसेच दहावी उत्तीर्ण होऊन दोन वर्षांचा आय.टी.आय कोर्स पुर्ण केल्यास बारावी उत्तीर्ण म्हणून गृहित धरले जाईल.

सरकारी नोकरीसाठी हे उमेदवार पात्र ठरतील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

हात सोडून सायकलिंग, गोव्याच्या वैभवची गिनीज वर्ल्ड रिकॉर्डला गवसणी

गोव्याच्या वैभव राजामनीचा नवा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड. हॅण्डलला हात न लावता सलग 7 तास 18 मिनिटे चालवली सायकल. 17 डिसेंबर रोजी 5.32 केली सुरुवात, 18 डिसेंबरला 12.50 वा साध्य केले रिकॉर्ड.

विश्वजीत राणे आणि देविया राणे यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला अपघात

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि आमदार देविया राणे यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला धडकली खासगी बस. बाणस्तारी पुलाजवळ झाला अपघात. कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती.

धक्कादायक! डिचोलीतील 24 वर्षीय मुलीला तीन पुरुषांकडून अमानुष मारहाण

डिचोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 वर्षीय मुलीला तीन पुरुषांकडून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोव्यात 48 तासांत सात अपघातबळी

गोव्याला लागलेले अपघातांचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. गेल्या 48 राज्यात झालेल्या विविध अपघातात सात जणांनी आपला जीव गमावला आहे, तर तीनजण जखमी झाले आहेत.

सातपैकी सहा जणांचा बळी रस्ते अपघातात झाला असून, एकजण ट्रेन अपघातात मृत्यूमुखी पडला आहे. सर्वाधिक बळी सासष्टी तालुक्यातील आहेत.

जुनासवाडा - मांद्रे येथे होणार पोलीस स्थानक, अधिसूचना जारी

जुनासवाडा - मांद्रे येथे नवीन मांद्रे पोलीस स्थानकाची घोषणा व त्याची अधिसूचना जारी. या पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात केरी, तेरेखोल, पालये, किरणपाणी, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, चोपडे, पार्से व तुये हे गावे असतील.

धारगळ येथे चारचाकीच्या धडकेत पदचारी जागीच ठार

धारगळ पंचायती समोर राष्ट्रीय महामार्गावर कारची धडक बसून पदचारी चंद्रकांत कांबळी (50) जागीच ठार. कांबळी राष्ट्रीय महामार्गावरून रस्ता ओलांडताना जीए. 07 टी 0907 या कारची धडक बसली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com