Goa Panchayat Election News
Goa Panchayat Election NewsDainik Gomantak

Panchayat Election: धारबांदोडा तालुक्यात पाच पंचायतींत चुरस

124 जण रिंगणात: खाणबंदी, बेरोजगारीसह विविध समस्यांनी ग्रस्त
Published on

धारबांदोडा : धारबांदोडा तालुक्यात धारबांदोडा, दाबाळ, कुळे -शिगाव, मोले व साकोर्डा अशा पाच पंचायतीचा समावेश आहे. यापैकी धारबांदोडा पंचायत ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धारबांदोडा ,दाबाळ व कुळे -शिगाव पंचायतीत प्रत्येकी नऊ प्रभाग आहेत तर साकोर्डा व मोलेत सात प्रभाग आहेत .सर्व पंचायती मिळून 41 प्रभाग असून 124 उमेदवार रिंगणात आहेत.दरम्यान, या तालुक्यातील मतदार तथा खाण बंदीमुळे व्यवसायावर अवलंबून असलेले घटक सध्या आर्थिक संकटात असून बेरोजगारीही वाढली आहे.

बहुतेक खाण अवलंबित सध्या शेतीकडे वळल्याचे चित्र असून वन्यजीवांच्या उपद्रवामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. सध्या या भागात पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असून कुळे व साकोर्डा पंचायती त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत .तालुक्यातील कुळे- शिगाव पंचायत ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असून दूधसागर पर्यटन व्यवसायामुळे ही पंचायत कात टाकत आहे. रेल्वे दुपदरीकरणामुळे ही पंचायत चर्चेत होती. रेल्वे दुपदरीकरणावेळी येथील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याला धक्का बसेल, अशी भीती दूध सागर पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या मध्ये होती.

Goa Panchayat Election News
Goa School: राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता मूल्‍यवर्धित शिक्षण सुरू करणार

साकोर्डा पंचायत क्षेत्रामध्ये तांबडी सुर्ला येथे पुरातन महादेव मंदिर आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या पंचायतीला महत्त्व आहे. शिवाय येथे घनदाट जंगलात असलेला धबधबा सध्या वर्षा पर्यटनाचे आकर्षण ठरत असून हल्लीच गोवा पर्यटन महामंडळातर्फे येथे साहसी पर्यटन सुरू करण्यात आले आहे.

शिक्षणाची गंगोत्री !

तालुका मुख्यालय हे धारबांदोडा याच पंचायतीत असून संजीवनी साखर कारखाना याच पंचायतीत समाविष्ट आहे. गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजही या तालुक्यात असून न्यायवैद्यक महाविद्यालय व राष्ट्रीय कायदा महाविद्यालय याच पंचायतीमध्ये स्थापन होणार आहे. भविष्यात ही पंचायत शिक्षण ‘गंगोत्री’ म्हणून गणली जाण्याची शक्यता आहे.

Goa Panchayat Election News
Goa's soil for Sansad Bhavan: गोव्याची संस्कृती पोचवूया संसद भवनात

तम्नारमुळे मोले चर्चेत

मोले पंचायत मधून पणजी बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग जातो. सध्या होऊ घातलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण व तम्नार वीज प्रकल्पामुळे ही पंचायत राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. पंचायतीसाठी सध्या गट बाजी सुरू आहे.

खाण अवलंबित नाराज ?

किर्लपाल- दाबाळ पंचायत क्षेत्रात वेदांता ही प्रसिद्ध खाण कंपनी आहे. 2012 पासून खाणबंदीने खाण अवलंबित संकटात आहेत. खनिज महामंडळ स्थापून खाणी सुरू करणार असे मुख्यमंत्री सावंत यांनी अधिवेशनात म्हटले आहे. तरीही खाण अवलंबितात नाराजी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com