"मुक्तीच्या साठाव्या वर्षात गोव्यासमोरील आर्थिक समस्यांमध्ये वाढ" : प्राचार्य डॉ. मनोज कामत

Even after sixty years of liberation Goa is facing economic problems
Even after sixty years of liberation Goa is facing economic problems

पणजी :  गोव्याला मुक्ती मिळाल्यास साठ वर्षे झाली असून या साठ वर्षांत गोव्याने गरिबी निर्मूलन, दरडोई उत्पन्न, पर्यटन याबाबतीत इतर राज्यांहून चांगली कामगिरी केलेली असली, तरी वाढती बेकारी, आर्थिक पेचप्रसंग, घटलेला महसूल अशा गोव्यासमोरील विविध आर्थिक समस्याही वाढल्या आहेत. या समस्यावर तोडगा काढणे आवश्यक असून हा तोडगा आम्हालाच काढावा लागेल, असे काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी सांगितले. ''मुक्तीच्या साठाव्या वर्षी गोवा आणि भविष्यातील वाटचाल'' या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना डॉ. कामत हे ''गोव्यासमोरील महत्त्वपूर्ण आर्थिक प्रश्नांना समजताना'' या विषयावर बोलत होते. गोव्याची अर्थव्यवस्था एकेकाळी खाण व्यवसायावर अवलंबून होती.

मात्र आता खाण व्यवसाय बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात त्यापासून मिळणारा महसूल गोव्याला गमवावा लागला आहे आणि पर्यटनावरच अवलंबून राहण्याची पाळी आली आहे, याकडे कामत यांनी यावेळी लक्ष वेधले. केंद्राकडून अपेक्षेइतका आधार नाही. गोव्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार अशी परिस्थिती अनेकदा पाहायला मिळाली. तरीही त्याचा हवा तितका फायदा मिळालेला नाही. गोव्याला केंद्राकडून आवश्यक तितका आधार मिळालेला नाही. केंद्राकडून अजूनही आवश्यक त्या प्रमाणात निधी आणि ''जीएसटी''तील वाटा मिळत नाही, असे मत कामत यांनी व्यक्त केले.

साठाव्या वर्षात गोव्यासमोरील आर्थिक पेचप्रसंग वाढले असून करांमध्ये आणि महसुलात घट, त्याचबरोबर सरकारी पातळीवर गोंधळलेली स्थिती अशा समस्या समोर उभ्या राहिल्या आहेत. तसेच बेरोजगारीही वाढत चालली आहे, असे कामत यांनी सांगितले. गोवा सरकारकडून सामाजिक योजना राबविल्या जात असल्या, तरी त्या राबविण्यापूर्वी नीट सर्वेक्षण केले गेले नाही, असे ते म्हणाले. गोव्यातील सहकारी बँकांची स्थिती एकेकाळी खूप चांगली होती, मात्र आता ती तितकी चांगली राहिलेली नाही, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. यावेळी प्रश्‍नोत्तराचाही कार्यक्रम होऊन त्यात गुगल मीटच्या माध्यमातून सहभागी झालेल्या अनेकांनी प्रश्न विचारले आणि डॉ. कामत यांनी त्यांना समर्पक उत्तरे दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com