ताळगावात का वाढतेय गुन्हेगारी ?

टोळ्या सक्रीय : व्यावसायिकांची होतेय सतावणूक
Crime in Goa
Crime in Goa Dainik Gomantak

पणजी : राजधानी पणजीला लागून असलेला ताळगाव परिसर हा आता ग्रामीण राहिला नसून त्याला शहरीकरणाचे स्वरुप आले आहे. काही वर्षांपूर्वी तेथे गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय असायच्या. मात्र बाबूश मोन्सेरात यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्या टोळ्यांच्या दहशती मोडून काढण्यात आल्या. ही गुन्हेगारी संपुष्टात येत असल्याचे वाटत असताना आता ती पुन्हा डोके वर काढू लागली आहे असे दिसते.

Crime in Goa
वाडी-शिवोलीत झाडांची सर्रासपणे कत्तल

ताळगावात सांताक्रुझ व मेरशी येथील गुन्हेगारी टोळ्या कार्यरत झाल्या असून परप्रांतीय छोट्या व्यावसायिकांकडून हप्ते वसुली सुरू आहे.

गुन्हेगारांकडून ताळगावात हाणामारीचे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र त्याची नोंद पोलिस स्थानकापर्यंत होत नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असे वाटत असले तरी अंतर्गत गुन्हेगारी कारवाया सुरूच आहेत. ताळगाव, सांताक्रुझ व मेरशी या परिसरातील हे गुन्हेगार परप्रांतीय व्यावसायिकांना दमदाटी करून हप्ते घेऊन जातात. या परिसरात जागोजागी अनेक लहानसहान गाळे परप्रांतियांनी विकत तसेच भाडेपट्टीवर घेतले आहेत. व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मटका जुगार सुरू आहे. या गाळ्यांवर खरेदीसाठी नव्हे तर मटका खेळणाऱ्यांची रात्रीपर्यंत गर्दी असते. या परप्रांतियांना हे गुन्हेगार संरक्षणाच्या नावाखाली लुटत आहेत.

ताळगावात शेतजमिनी बळकावण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मालकाने जमीन विकण्यास नकार दिला तर विकासक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून त्यांची सतावणूक करतात. पोलिस वा न्यायालयात जाण्याइतपत त्‍यांची ऐपत नसल्याने ते गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडतात. गुन्हेगारांच्या सहकार्याने अनेक बेकायदा कृत्यांना प्रोत्साहन मिळत आहे. पोलिसांचेही लागेबांधे असल्याने दखल घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Crime in Goa
किनारी भागात स्पाच्या नावे ‘देहव्यापार’

ताळगावात बंद असलेली घरे व फ्लॅटमध्ये चोरीचे प्रकार घडले आहेत. पोलिस स्थानकात नोंद असलेल्या तक्रारींमध्ये फक्त 30 टक्के गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. पोलिसांकडून सुरूवातीला या गुन्ह्यांचा तपास सुरू असतो व कालांतराने त्यात काही धागेदोरे सापडत नसल्याने बंद करण्यात येतो. यात टोळ्यांचा हात नसला तरी परप्रांतीय गुन्हेगार ताळगावातच भाड्याने राहून चोऱ्या करून पसार होतात, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

व्‍यावसायिकांना धमकावून हप्‍तेवसुली

ताळगावात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी काही विकासक संरक्षणासाठी गुन्हेगारांची मदत घेत आहेत. त्यामुळे काही लोक बेकायदेशीर बांधकामांविरोधात या गुन्हेगारांच्या भीतीने तक्रारी दाखल करण्यास पुढे येत नाही. यावरून ताळगावमध्ये गुन्हेगारांची दहशत वाढल्याचे दिसून येते. काही गुन्हेगारांनी ताळगाव परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या काही परप्रांतीय व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून दर महिना हप्तेवसुली चालविली आहे. या वसुलीमध्ये काही राजकारण्यांचे कार्यकर्तेही सामील असल्याने कोणीच वाच्यता करत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com