काणकोण, सोलये - खोला येथे काल ‘माटवेकारांच्या देवाच्या भोवंडीला’ (शिकारीला) गेलेल्या खुशाली वेळीप (वय ५३) यांचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले खुशाली वेळीप हे गोवा दूरदर्शनचे कर्मचारी होते.
काणकोण पोलिसांनी खुशाली वेळीप यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिकारीला गेलेल्या पाचजणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक केलेली नाही.
सोला - खोला येथील नागरिक देवाच्या भोवंडीला गेले असता, तेथे रानडुक्कर दिसताच खुशाली वेळीप यांनी डुकरावर निशाणा साधून बंदुकीची गोळी झाडली. त्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या साथीदारांनीही जखमी डुक्करावर गोळ्या झाडल्या.
त्यापैकी एक गोळी चुकून खुशाली वेळीप यांना लागून ते जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत मडगाव येथील एका खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल केले, त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, ही घटना ज्या भागात घडली ते क्षेत्र कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते की काणकोण पोलिस ठाण्याच्या हद्दीत यावरून पोलिसांमध्ये संभ्रम आहे. तो संभ्रम दूर झाल्यावर कारवाई सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले.
जत्रोत्सवातील प्रथा
गावच्या देवालयाच्या जत्रोत्सवापूर्वी किंवा नंतर गावभोवंडी काढण्याची प्रथा काणकोणातील काही गावांत आहे. मात्र, काही गावांतून या प्रथेला पूर्णविराम देण्यात आला आहे, तर काही गावांत ही प्रथा सुरू आहे.
काही वर्षांपूर्वीही अशाचप्रकारे शिकारीवेळी चुकून बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू झाला होता. पैंगीण, लोलये येथे ही प्रथा बंद करण्यात आली आहे. खोला पंचक्रोशीतील रहिवाशीही सध्या या प्रथेचा पुनर्विचार करण्याच्या मानसिकतेत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.