Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

Ponda News : गतवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला फोंडा मतदारसंघातून ३८८८ मतांची आघाडी प्राप्त झाली होती. त्यावेळी विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक हे कॉंग्रेसमध्ये होते. तसेच ‘मगो’ने भाजपविरोधी भूमिका घेतली होती.
bjp
bjp Dainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

Ponda News :

फोंडा, ‘दिल को देखो चेहरा न देखो चेहरोंने लाखों को लुटा’ सच्चा झुठा या जुन्या चित्रपटातील या गाण्याचा प्रत्यय यावेळी फोंड्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येत होता.

निवडणूक जरी लोकसभेची असली तरी येत्या विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून भाजपचे स्थानिक नेते कार्य करताना दिसले. मतांची आघाडी वाढण्याची शक्यता गृहित धरून भाजप नेत्यांचे मताधिक्यावर लक्ष आहे.

गतवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला फोंडा मतदारसंघातून ३८८८ मतांची आघाडी प्राप्त झाली होती. त्यावेळी विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक हे कॉंग्रेसमध्ये होते. तसेच ‘मगो’ने भाजपविरोधी भूमिका घेतली होती.

असे असूनही भाजपने फोंड्यात बाजी मारली होती. यावेळी रवी नाईक भाजपमध्ये असल्यामुळे तसेच ‘मगो’ सरकारात घटक असल्यामुळे फोंड्यातून जास्तीत जास्त आघाडी मिळण्याची अपेक्षा भाजप नेते व्यक्त करत आहेत. हे जाणूनच फोंड्यातील भाजपचे स्थानिक नेते काम करताना दिसत होते. यातून आपला प्रभाव कसा सिध्द करावा, याची रणनीती आखली जात होती.

bjp
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

लोकसभा निवडणुकीच्या तव्यावर हे स्थानिक नेते विधानसभा उमेदवारीची पोळी भाजून घेताना दिसत होते. तसे फोंड्यात भाजपच्या उमेदवारीकरिता अनेक दावेदार आहेत.

पुढच्या वेळी रवी नाईक हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमी असल्याने आपली वर्णी लागू शकते. हे लक्षात घेऊन रितेश यांनी पालिका कक्षेत आपला व्याप वाढवला असून त्याचे फळ त्यांना काय मिळते, हे बघावे लागेल.

एकंदरीत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक जर तरची समीकरणे उदयास येत असून आगामी विधानसभा निवडणूकीत फोंड्यात भाजपच्या उमेदवारीकरिता रस्सीखेच होऊ शकते, असे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत.

सावईकर, दळवी, रितेश दावेदार

गतवेळी उमेदवारी हुकलेले फोंड्याचे गटाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्‍वनाथ दळवी हे उमेदवारीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

त्यांचा प्रभाव असलेल्या प्रभाग नं. ६ व ७ मध्ये भाजपला आघाडी मिळावी या प्रयत्नात ते दिसत होते. उमेदवारी मिळाली नाही तरीही यावेळी फोंड्यातून निवडणूक लढविणार, असा त्यांचा इरादा असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजते. दुसऱ्या बाजूला लोकसभा उमेदवारी न मिळालेले माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर हेही या स्पर्धेत असल्याचे समजते. उमेदवार पल्लवी धेंपे यांच्याकरिता नेटाने काम केल्यामुळे ते प्रमुख दावेदार ठरू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. त्यांना श्रेष्ठींकडून आश्‍वासन मिळाल्याचीही चर्चा आहे. कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र तथा फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांचाही उमेदवारीवर डोळा असून ते ही तयारीला लागले आहेत.

भाटीकर ‘कानामागून येऊन तिखट होणार’ ?

गतवेळी केवळ ७७ मतांनी पराभूत झालेले डॉ. केतन भाटीकर हेही ‘कानामागून येऊन तिखट’ होऊ शकतात. लोकसभेच्या निवडणूकीत सुरुवातीला प्रचारापासून अलिप्त असलेल्या डॉ. भाटीकरांनी शेवटच्या काही दिवसात भाजपकरिता नेटाने प्रचार केल्याचे दिसत होते. फोंडा येथे झालेल्या जाहीरसभेतही त्यांचे दर्शन झाले होते.

मुख्यमंत्र्याशी निकटचे संबंध असल्यामुळे ते सुध्दा भाजपच्या उमेदवारीकरिता एक प्रमुख दावेदार ठरू शकतात असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास फोंड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com