मैत्रीतून साधला डाव; गोमेकॉतून पळविले एक महिन्याचे बाळ!

Goa Medical College hospital
Goa Medical College hospital

पणजी: बांबोळी(Bambolim) येथील गोवा वैद्यकीय(Goa medical Collage) महाविद्यालयाच्या मोकळ्या आवारातून एका अज्ञात महिलेने एका महिन्याच्या बालकाला पळविण्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली. या घटनेची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बालकाच्या शोधार्थ विविध पोलिस पथके स्थापन करून यंत्रणा गतिमान झाली. रात्री उशिरापर्यंत बालकाला घेऊन पसार झालेली संशयित महिला करासवाडा- म्हापसा येथे अखेर दिसल्याचे धागेदोरे हाती लागल्याने उत्तर गोव्यातील पोलिसांचे या भागात झडतीसत्र व नाकाबंदी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या घटनेमुळे या आवारातील सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पोलिस गुप्तचर यंत्रणेला कामाला लावून विविध पोलिस पथके स्थापन केली आहेत.(Abducted a one month old baby from the Goa Medical College hospital)

गोमेकॉ परिसरात असुरक्षितता   
गोमेकॉ इस्पितळातील काही रुग्ण इमारतीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र इस्पितळाच्या आवारातील मोकळ्या जागेत ते नाहीत. या जागेत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो काही कारणास्तव बारगळला होता. तेथे असलेल्या नेस कॅफे व सोडेक्सो आऊटलेटच्या परिसरात कॅमेरे नाहीत. या घटनेमुळे हा परिसर असुरक्षित बनला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भात डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याशी रात्री उशिरा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे  मूल पळवले गेलेले नाही. ते मूल गोमेकॉतील रुग्णही नव्हते. केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे गोमेकॉतून मुलाचे अपहरण झाल्याचा आरोप केला जात आहे.

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

मैत्री करून साधला डाव
मूळ ओडिशा येथील महिला एका महिन्याच्या बालकाला घेऊन ‘पोलिओ डोस’साठी गोमेकॉ इस्पितळात आली होती. येथे आवारात असलेल्या नेस कॅफे आऊटलेटच्या ठिकाणी ती बालकाला घेऊन उभी होती. ती बालकाला घेऊन एकटीच असल्याचे हेरून संशयित महिलेने तिला लक्ष्य केले. तिच्याशी तिने मैत्री केली. बालकाच्या मातेला नेस कॅफे आऊटलेटमध्ये खाद्यपदार्थ आणण्यास या महिलेने पाठवले व मुलाला तोपर्यंत सांभाळते, असे सांगितले. 
या अनोळखी महिलेशी तिची ओळख नसताना बालकाला महिलेकडे देऊन माता खाद्यपदार्थ आणण्यास गेली. काही वेळाने परतली असता ती अनोळखी महिला दिसली नाही. त्यामुळे तिने या परिसरात बालकासह तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. बालकाच्या मातेने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले व या घटनेची माहिती आगशी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय राणे पोहोचले व ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलिसांनी बालकाच्या मातेचे जबाब नोंदविले. त्यामध्ये तिने त्या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले. तिच्या अंगावर गुलाबी व पांढऱ्या रंगाचा चुडीदार होता, अशी माहिती दिली.

धक्कादायक प्रकार 
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या आवारातून एका महिन्याचे बालक पळवण्याची घटना धक्कादायक असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेनंतर राज्यातील इस्पितळेही सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे. बाळ पळविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी त्वरित अटक करावी, असे त्यात नमूद केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com