Kundaim Theft Case: कुंडई चोरी प्रकरणातील मुख्‍य सूत्रधारावर मंगळुरुतही गुन्हा दाखल; आतापर्यंत पाच संशयित गजाआड

Goa Crime News: कुंडई येथील जबरी चोरी प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असलेला मडगावातील भंगार अड्डाचालक अशोक पांढरेकर याच्‍यावर मंगळुरु पोलिस स्‍थानकातही गुन्‍हा नोंद झाला आहे.
Theft Case
Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Kundaim News: कुंडई येथील जबरी चोरी प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असलेला मडगावातील भंगार अड्डाचालक अशोक पांढरेकर याच्‍यावर मंगळुरु पोलिस स्‍थानकातही गुन्‍हा नोंद झाला आहे. मंगळुरु येथे झालेल्‍या एका चोरी प्रकरणातील साहित्य पांढरेकर याने विकत घेतले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

या प्रकरणातील अन्‍य एक संशयित राजू रेगी हाही गुन्‍हेगारीशी जवळीक ठेवणारा असून यापूर्वी वास्‍को येथे झालेल्‍या एका खुनाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या प्रकरणात त्‍याला अटक झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केलेली असून त्‍यांचा आणखी काही गुन्‍हेगारी प्रकरणात हात आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

९ ऑक्‍टोबर रोजी या पाच संशयितांपैकी पवन यादव व नागराज तलवार या दोघांनी चौधरी ट्रेडर्स या आस्‍थापनासाठी व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करणाऱ्या चर्तुभूज घिंटल या मूळ राजस्‍थानी पण गोव्‍यात स्‍थायिक असलेल्‍या व्‍यक्‍तीवर हल्‍ला करून त्‍याच्‍या स्कूटरच्या डिक्‍कीत असलेली १.५० लाखाची रक्कम घेऊन पळ काढला होता. घिंटल हा चौधरी ट्रेडर्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता.

Theft Case
Bicholim Theft Case: चोरट्यांचा धुमाकूळ; डिचोली बाजारातील दुकान फोडले

पांढरेकर हा भंगार विकणारा असून चौधरी ट्रेडर्स या कंपनीला तो भंगार पुरवायचा. वास्‍तविक हे भंगार कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्‍या फर्नेस कारखान्‍यासाठी वापरण्‍यात येत होते. मात्र हे भंगार कुंडई येथील अड्ड्यावर जमा केले जायचे. हे भंगार घेऊन येणाऱ्या व्‍यावसायिकांना पैसे देण्‍याचे काम घिंटल करायचा. त्‍याच्‍याकडे नेहमी तीन ते चार लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम असायची. तो ही रक्‍कम स्कूटरच्या डिकीत ठेवायचा. पांढरेकरला ही माहिती होती.

अशी केली लुटमार

1) ९ ऑक्‍टोबर रोजी हा दरोडा घालण्‍यापूर्वी संशयितांनी ७ ऑक्‍टोबर रोजी जाऊन त्‍या सर्व भागाची पाहणी केली होती. दुपारी १२.३० च्‍या सुमारास घिंटल हा जेवण्‍यासाठी आपली स्कूटर घेऊन औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडतो याची माहिती पांढरेकर याला होती. त्‍यावेळी त्‍याच्‍याकडे पैसे असतात हेही त्‍याला माहीत होते. मात्र त्‍या गाठायचे कुठे हे पहाण्‍यासाठी दोन दिवस आधी रेकी केली होती.

2) ज्‍या ठिकाणी ही लूटमार झाली त्‍या ठिकाणी चिंचोळा रस्‍ता असून तिथे एका वळणावर बरीच झाडी असल्‍यामुळे या वळणावर वाहन चालक गाडीची गती कमी करतात हे त्‍यांना कळून चुकले. त्‍यामुळे त्‍यांनी हीच जागा दबा धरुन बसण्‍यास योग्‍य अशी ठरवली.

3) ९ ऑक्‍टोबर रोजी दुपारी १२ वाजण्‍याच्‍या सुमारास त्‍यांनी गाडी त्‍या वळणाजवळ ठेवून आपल्‍या सावजाची ते वाट पाहू लागले.

4) १२.३० वाजण्‍याच्‍या सुमारास घिंटल स्कूटरवरून येत असल्‍याचे पाहिल्‍यावर तो जवळ आल्‍यावर अकस्‍मात त्‍यांनी आपल्‍या गाडीचे दार उघडले. त्‍यामुळे घिंटलने गाडी थांबवली. त्‍याचाच फायदा घेऊन संशयितांनी त्‍याच्‍या डोळ्‍यावर तिखट औषधी स्‍प्रे फवारला पण त्‍याच्‍या डोळ्‍यावर चष्‍मा असल्‍यामुळे त्‍या स्‍प्रेचा त्‍याला असर होऊ शकला नाही. त्‍यामुळे नागराज याने खाली उतरून त्‍याचे तोंड दाबून धरुन त्‍याला झाडीत झोकून दिले.

5) पवनने डिकीतील पैसे काढून घेऊन दोघांनीही गाडीत बसून पोबारा केला. हा सर्व घटनाक्रम केवळ दोन ते तीन मिनिटात घडला, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com