Ranmale Mahotsav Goa: गोवा ही नाट्य कलाकारांची भूमी असून, रणमालेसाठी लोकनाट्य अकादमी स्थापन करावी- भूषण भावे

Ranmale Mahotsav Goa: रणमाले हा विशिष्ट लोककला प्रकार असून, गोवा सरकारने लोकनाट्य अकादमी स्थापन करायला हवी.
Ranmale Mahotsav Salcete, Goa
Ranmale Mahotsav Salcete, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Ranmale Mahotsav Goa: रणमाले हा विशिष्ट लोककला प्रकार आहे. लोकनाट्याचाच हा भाग आहे. यामुळे येणाऱ्या काळात रणमालेबाबत अधिक संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. गोवा ही नाट्य कलाकारांची भूमी आहे. यामुळे लोकनाट्य प्रकारामध्ये अत्याधुनिक संशोधनाचे काम होण्याची गरज आहे. यासाठी सरकारने लोकनाट्य अकादमी स्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. भूषण भावे यांनी केले.

ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था वाळपई व गोवा कला व सांस्कृतिक खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 12व्या रणमाले महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात प्रा. भावे बोलत होते. चरावणे येथे आयोजिलेल्या रणमाले महोत्सवाचा थाटात समारोप झाला.

यावेळी केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी, संस्थेचे सचिव प्रकाश गावकर, स्थानिक पंच सदस्य विनायक गावस, रणमाले अभ्यासक झिलू गावकर, संस्थेचे सल्लागार रघुनाथ धुरी, समितीचे कार्याध्यक्ष अभिषेक गावस, प्रशांत नाईक यांची उपस्थिती होती.

प्रा. भूषण भावे यांनी सांगितले, की सत्तरी तालुक्याला 450 वर्षांचा इतिहास आहे. अनेक दस्तऐवज पूर्वजांनी राखून ठेवलेले आहेत. गोव्याच्या भूमीत 250 पेक्षा जास्त लोककला प्रकार आहेत. पैकी रणमाले हा महत्त्वाचा लोककला प्रकार असून तो संवर्धीत होणे ही काळाची गरज आहे.

देवयानी गावस म्हणाल्या, आपल्या पूर्वजांनी ही कला टिकवून ठेवली आहे. आता तरुणांच्या खांद्यावर ही कला संवर्धन करण्याची जबाबदारी आहे. रणमाले महोत्सवात तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा. यावेळी लोककला कलाकार पार्वती गावस व लक्ष्मी गावस यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गावस यांनी केले. कृष्णा गावस यानी आभार व्यक्त केले.

नवीन पथके तयार...

गेल्या बारा वर्षांपासून रणमाले महोत्सवातून गावागावांमध्ये नवीन पथके तयार होऊ लागली. सत्तरीची लोकसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव वेळोवेळी आयोजित केले पाहिजे.

रघुनाथ धुरी, संस्थेचे सल्लागार-

रणमाले हा सत्तरी तालुक्यातील जनतेच्या सांस्कृतिक संचिताचा महत्त्वाचा ठेवा आहे. हा ठेवा हळूहळू लुप्त होऊ लागल्यामुळे रणमाल्याची कला ग्रामीण भागातून हद्दपार होऊ लागली. ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्थेने ही पालखी आपल्या खांद्यावर घेतली व पुन्हा एकदा या लोककला प्रकाराला उर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी रणमाले महोत्सवाचे आयोजन करण्यावर भर दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com